Header Ads Widget

द मेलोडीयस जर्नी ऑफ किशोर कुमार मैफल रंगली

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : सिंफनी ग्रुप ऑफ म्युझिक, कल्चरल अँड वेल्फेअर ट्रस्ट अमरावती द्वारा आयोजित "द मेलोडीयस जर्नी ऑफ किशोर कुमार" ही मैफल रंगली. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृह येथे झालेल्या या मैफिलीला रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. जयंत वाने यांनी काढलेल्या किशोरकुमार यांच्या चित्राचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी बुलडाना अर्बन कोआॅपरेटीव्ह केडीट सोसायटीचे अनंत देशपांडे, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल कुरळकर, ॲनिमेशन कॉलेजचे संचालक विजय राऊत, गुरुमूर्ती चावली, महिंद्रा जनरेटर्सच्या जनरल मॅनेजर सुचिता खुळे, सिंफनीचे संचालक सचिन गुडे व मान्यवर उपस्थित होते. यावेळी अनंत देशपांडे आणि शिवराय कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त करीत शुभेच्छा दिल्यात.

    दिये जलते है, राह पर रहते आणि जीवन के दिन छोटे सही या गीतांनी अनिल घाडगे यांनी मैफलीचा आरंभ केला. मैफलीचे अभ्यासपूर्ण निवेदन नासिर खान यांनी केले. हमे तुमसे प्यार कितना आणि खिलते है गुल यहा हे दोन गीत सादर करून प्रमोद ढगे यांनी मैफलित रंग भरला. सा रे ग म प लिटिल चॅम्प विजेती वैष्णवी भालेराव हिने आपकी नजरोने समझा हे बहारदार गीत पेश केले. तेरे मेरे मिलन की ये हे युगलगीत प्रमोद ढगे आणि शितल भट यांनी सादर केले. कोरा कागज था ये मन मेरा हे गीत घाडगे आणि भट यांनी सादर केले. आखो मे हमने आपके हे गीत घाडगे आणि वैष्णवी यांनी प्रस्तुत केले. या मैफलीचे विशेष आकर्षण अनंत देशपांडे राहिले. त्यांनी लता मंगेशकर यांच्या आवाजात किस लिये मैने प्यार किया, सलामे इश्क मेरी जान, बेताब दिल की तमन्ना ही गीते सादर केलीत. बुलढाणा अर्बन बँकेचे अनंत देशपांडे यांनी सिंफनी ग्रुपचे कौतुक केले. सोबतच संस्थेला 11000 रुपये रोख मदत केली. घाडगे आणि वैष्णवी यांनी क्या यही प्यार है आणि कहे दू तुम्हे या चुप रहु ही दोन गीते पेश केलीत. आपल्या खास शैलीत नखरेवाली हे गीत गाऊन ढगे यांनी समा बांधला. ऐसा समा ना होता, तुम मिले प्यार से ही गीते अनुक्रमे वैष्णवी भालेराव, घाडगे आणि शीतल भट यांनी सादर केलीत.

    एक मै और एक तू हे गीत घाटगे आणि डॉ. नयना दापूरकर यांनी पेश केले. पिया पिया पिया हे युगलगीत ढगे आणि डॉ. नयना दापूरकर यांनी सादर केले. आपल्या वेगळ्या शैलीच्या गायनाने डॉ.नयना दापूरकर यांनी रसिक मनावर छाप पाडली.अपने प्यार के सपने हे गीत घाडगे आणि वैष्णवी यांनी प्रस्तुत केले. ढगे यांनी गायलेल्या पलभर के लिए या गीतानंतर घाडगे यांनी सागर किनारे हे गीत गायले. ढगे आणि सुचिता खुळे यांनी गायलेल्या हाल कैसा है जनाब का या गीताने मैफलित रंग भरला. सुचिता खुळे यांनी आपल्या गायनाने रसिकांची मने जिंकली. पडोसन या चित्रपटातील एक चतुर नार हे गीत गाऊन ढगे आणि राहुल तायडे यांनी धमाल केली. घाटगे आणि वैष्णवी यांनी जाने जा धुंडता फिर रहा हू हे गीत सादर केले. ढगे आणि शितल यांनी अश्विनी येना हे गीत प्रस्तुत केले. ढगे यांनी झुमरू चित्रपटातील झुमरू हे गीत सादर केले. घाटगे यांनी गायलेल्या चलते चलते या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

    संगीत संयोजन आणि कीबोर्डची साथ सचिन गुडे यांनी केली. लीड गिटारची साथ मोहित चौधरी, बेस गिटारची साथ फ्रान्सिस, ऑक्टोपॅडची साथ राजेंद्र झाडे, कोंगोची साथ राजदीप चावरे, तबल्याची साथ विशाल पांडे, बासरीची साथ चेतन वानखडे यांनी केली. उद्घाटन सोहळ्याचे संचालन हरीश काले यांनी केले. या मैफिलीतून उभा झालेला निधी विविध सामाजिक कार्यांमध्ये देण्यात येईल असे सिंफनी ग्रुपचे अध्यक्ष सचिन गुडे यांनी कळविले. ध्वनी व्यवस्था रॉयल साऊंड सर्व्हिसेसचे रईस भाई यांनी सांभाळली. या मैफलीचे व्यवस्थापन जयंत वाने, गुरुमूर्ती चावली, सुचिता खुळे, डॉ. नयना दापूरकर आणि सुनीत बोरकर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या