अमरावती : बँकेशी संबंधित कोणतेही कामकाज मोबाईल फोनवर करत असतांना अनावधानाने किंवा नकळतपणे झालेली लहानशी चुकही किती महागात पडू शकते हे दर्शवणारी घटना नुकतीच उजेडात आली आहे. मोबाईल फोनवर स्टेट बँक ऑफ इंडियाची ’योनो’ (yono) ही मोबाईल बँकिंग अँप स्थापीत (install)) करीत असतांना खातेधारकाकडून नकळतपणे झालेल्या चुकीमुळे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शहरातील एका प्रतिष्ठीत खातेधारकाच्या बँक खात्यातून चौपन्न हजार रुपयांची रक्कम एका सायबर भामट्याने दुसरीकडे वळती करून खात्यातील रक्कम गायब केली. खात्यातून चौपन्न हजार रुपयांची रक्कम कमी झाल्याचे खातेधारकाला दिसून आल्यावर अशा परिस्थितीतही भांबावून न जाता सुज्ञ खातेधारकाने सायबर भामट्याचा डाव वेळीच ओळखल्याने आणि संयम व समयसूचकता दाखवित केलेल्या कारवाईमुळे खात्यातून निघालेली पूर्ण रक्कम दोन तासातच परत खात्यात जमा झाली.
यासाठी स्टेट बँक ऑफ इंडीयाचे उपप्रबंधक शशांक खोब्रागडे (डीजीटल अँण्ड ट्रॅन्झॅक्शन बिझनेस) यांनी मोलाची भूमिका पार पाडली व त्यांना या कामात उपप्रबंधक प्रणव सोनटक्के यांनी सहकार्य केले. आता जाणून घेऊ या ऑनलाईन गंडा घालण्यासाठी सायबर भामट्याने लढविलेली शक्कल नेमकी काय होती ?
दि. 23 ऑगस्ट 2022 रोजी सायं. 6 चे सुमारास शहरातील एसबीआयच्या एक बँकखातेधारक स्वतःच्या मोबाईलवर स्टेट बँकेची ’योनो’ ही मोबाइल प स्थापित करण्यासाठी नकळतपणे बनावट संकेतस्थळावर माहिती भरत होता. यावेळी यूजर आयडी, पासवर्ड, खातेधारकाचे नाव व जन्मतिथी इ. माहिती भरण्यात आली. नंतर थोड्याच वेळात खातेधारकाला 9748223824 या क्रमांकावरून फोन झाला व त्याने स्वतःची ओळख स्टेट बँकेचा अधिकारी अशी करून दिली. फोनवरून त्याने खातेधारकाला विचारले की, तुम्ही आता कोणता व्यवहार केला आहे का? खातेधारकाने मी कोणताही व्यवहार केलेला नाही असे उत्तर दिले असता मग तुमच्या खात्यातून 54,000 कोणी तरी काढून घेतल्याचे दिसत आहे असे सांगितले. जेव्हा खातेधारकाने ऑनलाइन रक्कम तपासली असता खरोखरच खात्यातून 54000 रु.ची रक्कम कमी झाल्याचे आढळून आले. यादरम्यान ट्रु कॉलरवर या व्यक्तिचा क्रमांक चेक केला असता त्याचे नाव जयकुमार ऑफिसर एम्प्लॉइ असे लिहलेले होते व तेथे बँकेचा लोगों लावलेला होता. हा व्यक्ति पुन्हा पुन्हा फोन करून सांगत होता की मी तुमची रक्कम परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो. हा व्यक्ति बँकेचा अधिकारी असण्यावर संशय आला असता या अज्ञात व्यक्तिने फोनवरून खातेधारकाचा खाते क्रमांक, शहराचे नाव अचूकपणे सांगितले. खातेधारक संभ्रमावस्थेत असताना फोनवरील कथीत बँक अधिकारी व्यक्तीने एस एम एस टु मी (SMS TO ME) अॅप डाऊनलोड करण्यासाठी सांगितले. अन् खातेधारकाचा संभ्रम मिटला आणि हा फोन करणारा व्यक्तिच सायबर भामटा असल्याची खात्री झाली.
तुम्ही बँकेत गेले किंवा सायबर पोलिसांकडे गेले तरी तुमचे पैसे परत येऊ शकत नाही असे पुन्हा पुन्हा हा सायबर भामटा फोनवर सांगत होता. खात्यातून पैसे कमी झाले असले तरी या सायबर भामट्याची कुठेतरी खुटी अटकली आहे हे सुज्ञ खातेधारकाच्या लक्षात आल्यावर खातेधारकाने क्षणाचाही विलंब न करता संध्या 7.00 चे सुमारास श्याम चौकातील स्टेट बैंक ऑफ इंडीया शाखा गाठली. तेथे उप प्रबंधक शशांक खोब्रागडे (डिजीटल व्यवहार कामकाज) यांनी संपूर्ण घटनाक्रम समजुन घेतला आणि सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला व त्यांनी तात्काळ कारवाईला सुरुवात करत खातेधारकाचे खाते रोखून धरले. पाहणीत त्यांच्या लक्षात आले की, या सायबर भामट्याने खातेधारकाची 54000 रु.ची ऑनलाईन इ-आर.डी. काढली होती. त्यामुळे खात्यातून रक्कम कमी झाली होती. परंतु रक्कम बँकेतच इ-आर डी मध्ये जमा झाली होती. परंतु जर ’एसएमएस टु मी’ ही अँप डाउनलोड केली असती तर ही रक्कम बँकेतुन निघून गेली असती व नंतर काहीही करता आले नसते.
याबाबत माहिती देतांना उपप्रबंधक शशांक खोब्रागडे यांनी सांगितले की संबंधित खातेधारक मोबाईलमध्ये 'योनो' प स्थापित करण्यासाठी संकेतस्थळावर माहिती भरत असताना अनावधानाने तो बनावट संकेतस्थळावर कधी पोहोचला हे त्याला कळलेच नाही. त्यामुळे या संकेत स्थळावर बैंक खातेधारक जी-जी माहिती भरत होता ती सर्व माहिती जयकुमार असे बनावट नाव असलेल्या सायबर भामट्याला प्राप्त होत होती. या माहितीच्या आधारे खाते धारकाचे बँक खाते त्याने ऑनलाइन चालू केले होते व पैसे लंपास करण्यासाठी इ-आर. डी काढली होती, परंतु बँक खातेधारकाने संकेतस्थळावर माहिती भरण्याचे मधात थांबविल्याने त्याला माहिती मिळणे बंद झाले व पैसे काढणे शक्य झाले नाही. म्हणून मग शेवटचा हतकंडा म्हणून त्याने खातेधारकाला फोन करून तुमच्या खात्यातील रक्कम लंपास झाल्याची माहिती देऊन प्रथम घाबरविले व नंतर पैसे परत आणून देतो असे आमिष दाखवून ’एसएमएस टुमी’ प डाउनलोड करण्यासाठी खातेधारकाला प्रवृत्त केले. या पच्या मदतीने बँकेचा ओटीपी त्याला थेट आला असता व त्याने इ-आरडी मधील रक्कम उडविली असती. परंतु खातेधारकाने त्याच्या शब्दात न येता सजगता दाखवून बँकेशी संपर्क केल्याने व बँकेचे उपप्रबंधक शशांक खोब्रागडे यांच्या तत्पर कारवाईमुळे खात्यातून निघालेली रक्कम परत दोन तासात खात्यात जमा झाली. यासाठी बँकेने प्रथम खातेधारकाचे खाते काही वेळेसाठी रोखुन धरले व नंतर इ-आरडी वर ताबा घेत ती रद्द केली व रक्कम पूर्ववत खात्यात जमा केली.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या