Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

चिखलदरा तालुक्यातील 15 गावांत नवीन रास्त भाव दुकाने संस्थांनी अर्ज करण्याचे पुरवठा अधिका-यांचे आवाहन

  गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

  अमरावती (प्रतिनिधी) : चिखलदरा तालुक्यातील 15 गावांमध्ये नवीन रास्त भाव दुकाने सुरू करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. नवीन रास्त भाव दुकानांसाठी इच्छूक संस्था व गटांनी 9 सप्टेंबरपूर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी डी. के. वानखेडे यांनी केले आहे.

  नवीन दुकानांची क्षेत्रे

  चिखलदरा तालुक्यातील टेटू, मेमना, लवादा, पांढराखडक, मोझरी, रामटेक, बागलिंगा, कुलंगणा बु., चौऱ्यामल, लाखेवाडा, भांडुम, सलिता, सुमिता, खुटिदा, कुही या 15 गावांतील रास्त भाव दुकानांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

  निवडीचा प्राथम्यक्रम

  नवीन रास्तभाव दुकानांसाठी संस्थेची निवड करताना ग्रामपंचायत किंवा तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, सार्वजनिक संस्था किंवा न्यास यांना अर्ज करता येईल व याच प्राथम्यक्रमाने अर्जाचा विचार होईल. वैयक्तिक अर्जाचा विचार केला जाणार नाही.

  अर्जाची प्रक्रिया

  इच्छूक संस्था, गटांना विहित नमुन्यातील अर्ज तहसील कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजता दरम्यान प्राप्त होऊन दाखल करता येतील. अर्जाची विक्री व स्वीकृत करण्याची अंतिम मुदत 25 ऑगस्ट ते दि. 9 सप्टेंबर पर्यंत राहील. त्यानंतर प्राप्त अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे जिल्हा पुरवठा अधिका-यांनी कळवले आहे.

  रास्त भाव दुकानाचा परवाना मंजूर करण्याची कार्यवाही जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती करेल. समितीच्या निर्णयानुसार ग्रामीण क्षेत्रात स्वयंसहायता गटास परवाना देण्यापूर्वी प्रस्ताव महिला ग्रामसभेकडे पाठविला जाणार आहे व महिला ग्रामसभेच्या शिफारशीनंतर अंतिम निर्णय होईल. अर्जासोबत संस्थांना नोंदणी प्रमाणपत्र, तीन वर्षांचे लेखे, हिशोब, कर्ज, परतफेड, बँकेची कागदपत्रे आदी सर्व कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

  (छाया : संग्रहित)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code