- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण सोहळा सोमवार दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 वा. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.
जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजारोहण सोहळा सकाळी 8 वा. होईल. यावेळी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.
- हर घर तिरंगा मोहिमेला मोठा प्रतिसाद
‘हर घर तिरंगा’ मोहिमेत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी होऊन घराघरांवर राष्ट्रध्वज फडकविण्यात आले आहेत.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ मोहिम आजपासून दि. 15 ऑगस्ट पर्यंत राबविण्यात येत आहे. याबाबत जनजागृतीसाठी प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात आले. शासकीय, निमशासकीय कार्यालयांबरोबरच विविध आस्थापना, उद्योग, दुकाने, घरोघरी राष्ट्रध्वज फडकविण्यात आले आहेत. घरोघरी तिरंगा कार्यक्रमात दि. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरी तिरंगा फडकविताना दररोज झेंडा खाली उतरवायची आवश्यकता नाही. मात्र, आस्थापना व कार्यालयांना ध्वजसंहितेनुसार नियमाचे पालन करावे लागेल, असे ग्रामविकास विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील महापालिका, नगर पालिका, व पंचायत समिती मिळून 5 लक्ष 73 हजार घरांना 17 पुरवठादारांनी तिरंगा ध्वज पुरवले आहेत. इतर स्वयंसेवी संस्थांकडुन 18 हजार 500 ध्वज वितरीत करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्याद्वारे गोळा करण्यात आलेल्या निधीतुन 5 हजार ध्वज चिखलदरा तालुक्यातील ग्रामस्थांकरीता पाठविण्यात आले. शासनाकडुन प्राप्त 1 लक्ष दहा हजार ध्वज जिल्हा परिषद, महानगर पालिका व नगर पालिकांना विक्रिकरीता वितरीत करण्यात आले असुन त्यांच्या स्तरावरुन विविध विक्री केंद्रावरुन ध्वजविक्री सुरु असल्याची माहिती श्री बिजवल यांनी दिली.