- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : शहरात मान्सूनपूर्व पावसामुळे अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. आरोग्य विभागाने डासनिर्मिती न होण्यासाठी काळजी घेत असले तरी प्रत्येकाच्या घरात जाउन हे कर्मचारी डास उत्पत्तीची ठिकाणे शोधू शकत नसल्याने नागरिकांनी आगामी साथरोग टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याची गरज भासत आहे. नागरिक व आरोग्य विभागाच्या एकत्रित कार्याने साथरोगावर मात केली जाऊ शकते.
सांडपाणी साठून राहणे, पावसाचे पाणी साठून राहिल्यास त्यात मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत असते. त्यामुळे मलेरिया, डेंग्यूच्या डासांची निर्मिती होते व याचा परिणाम म्हणून साथरोगांना सुरुवात होते. शहरातील विविध परिसरातही मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी परिसर असून या भागात साथरोगाची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होते. याशिवाय मोठमोठ्या हाउसिंग सोसायटी, इमारतींचे सुरु असलेल्या कामांच्याठिकाणी पाणी साठून राहिल्यास डेंग्यू, मलेरियाचा उद्रेक होउ शकतो. पावसाच्या दिवसात पाणी साठत असलेल्या ठ़िकाणे नष्ट करण्याचे प्रयत्न आरोग्य विभागाकडून सुरु असते. आरोग्य कर्मचाऱ्यांकडून स्थानिक वसाहत भागासह हाउसिंग सोसायटी किंवा सरकारी इमारती असतील, त्याठ़िकाणी पाणी साठवणूक होणाऱ्या जागांची पाहणी केली जात आहे.
डासांपासून वाचण्यासाठी फॉगिंग केले जाते. विविध संस्था व लोकांच्या बैठका घेउन जनजागृती केली जाते. मात्र, लोकांनीही साथरोग न पसरण्यासाठी काळजी घेण्याची गरज असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. रुग्ण आढळलेल्या भागातील रुग्णांवर उपचार करण्यात येत असतांनाच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून लोकांना डेंग्यूच्या अळ्या उत्पन्न होणाऱ्या ठिकाणांची माहिती दिलेली आहे. साठलेले पाणी काढून टाकण्याच्या सूचनाही केलेल्या आहेत. पावसाचे पाणीही साठून राहिल्याने डेंग्यूच्या अळ्यांची निर्मिती होण्यास अनुकूल वातावरण तयार झालेले आहे. काही इमारतीवरील पाणी जाण्यासाठी ठेवलेल्या वाटा बंद झालेल्या दिसून आल्या. तर काहींच्या एसीचे पाणी जाण्यासाठी योग्य नियोजन न केल्याचेही आरोग्य कर्मचाऱ्यांना दिसून आलेले आहे. नागरिकांनी आपल्या घराच्या परिसरातील पाणी साठलेल्या ठिकाणांचा शोध घेउन ते काढून टाकण्याची गरज आहे. पाणी कमी येत असल्याने काहीजण पाण्याची बॅरल भरुन ठेवताता. ती पाण्याची बॅरलही ठराविक अंतराने रिकामी करण्याची गरज आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रत्येकाच्या घरात जाउन पाणी साठत असलेली ठिकाणे शोधणे कठीण जाते. प्रत्येकाने साठलेले पाणी काढून टाकल्यास डेंग्युचे प्रमाण कमी होईल. लोकांच्या घरात काचेची भांडी, फ्लॉवरपॉट अशा वस्तूंमध्ये पाणी टाकून ठेवण्यात येते. या जागांची माहिती प्रत्येकाला असते, त्यांनी त्या ठिकाणी आता पाणी साठवणूक करुन ठेवू नये.
दरवर्षी डेंग्यू व मलेरियाचे रुग्ण आढळणाऱ्या भागात आरोग्य विभागाकडून नियमित अंतराने पाहणी करुन लक्ष ठेवण्यात येते. या भागात पाणी साठून राहणार नाही यासाठी प्रयत्न केले जात असल्याने यावर्षी साथरोगाचे प्रमाण कमी आहे. तरीही बांधकामाच्या ठ़िकाणी डासांच्या अळ्यांची निर्मिती होउ नये. आरोग्य विभागाकडून सर्व सूचना व काळजी घेण्यात येत असले तरी नागरिकांनी आपल्या आरोग्य जपण्यासाठी डासांच्या निर्मितीची सर्व ठिकाणे नष्ट करण्यासाठी पुढाकार घेतल्यास सार्वजनिक आरोग्यही चांगले राहणार आहे.
- (Images Credit : Lokmat)