- * मोर्शी तालुक्यातील आंबिया बहाराला अज्ञात रोगाच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे !
- * संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना समस्या सोडवण्यासाठी रुपेश वाळके यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे !
मोर्शी तालुका प्रतिनिधी : मोर्शी तालुक्यात यंदा आंबिया बहाराचे उत्पादन चांगले होण्याची आशा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना होती. उत्पादनाला चांगला भाव मिळून पैसा हातात येईल, या आशेवर असलेला शेतकरी संत्र्याच्या गळतीमुळे हवालदिल झाला आहे. मोर्शी तालुक्यातील आंबिया बहाराला अज्ञात रोगाच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. याचा तालुक्यातील संत्रा उत्पादकांना जबर फटका बसणार असल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आंबियाच्या गळतीचे सर्वेक्षण करून तात्काळ नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
मोर्शी तालुक्यात शेकडो हेक्टर क्षेत्रावर संत्रा झाडे आहेत. संत्रा उत्पादक शेतकरी दोन बहारात उत्पादन घेतात. यामध्ये आंबिया मृग बहाराचा समावेश आहे. या वर्षी सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने मृग बहार हातचा गेला, तर दुसरीकडे योग्य वातावरणामुळे खुललेला आंबिया बहार मात्र, सततचा संतधार पाऊस आणि अज्ञात रोगाने गळू लागला आहे. यामुळे तालुक्यातील काही भागातील संत्रा बागांमधील आंबिया बहाराला मोठ्या प्रमाणात फटका बसला असल्याने संत्रा उत्पादक शेतकरी चिंतातुर झाले आहेत. कृषी विभागाने तातडीने सर्वेक्षण करून उपाययोजना करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी शासनाकडे केली आहे.
- शेतकरी गुरफटला दुष्काळात !
एकेकाळी तालुक्यात संत्राचे भरघोस उत्पादन होत असे परंतु अलीकडे या ना त्या कारणाने संत्रा उत्पादकांवर संकट कोसळत आहे. कधी गारपीट तर कधी कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ अन् आता अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव, यामुळे तालुक्यातील संत्रा उत्पादक पुरते हैराण झाले आहेत. एकेकाळी विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जाणारा हा भाग आणि या भागातील संत्रा उत्पादकांची आजची स्थिती फारच वाईट आणि दयनीय झाली आहे. आंबिया संत्राला काही कारणांमुळे गळती लागली आहे. यामध्ये नैसर्गिक वातावरण, देठाला बुरशी लागणे, अन्नद्रव्यांची कमतरता, फळमाशी यांचा परिणाम फळ गळतीवर होऊ शकतो.
- ———
- कृषी विभागाला देणार सर्वेक्षणाचे निर्देश
मोर्शी वरुड तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्रा पिकांची लागवड केली जाते. बहुतांश शेतकऱ्यांचा वार्षिक खर्च हा संत्रा बागांच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. मात्र, सध्या आंबिया बहाराला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. त्यामुळे संत्रा उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबत नुकसानाच्या सर्वेक्षणाचे निर्देश कृषी विभागाला देणार आहे.
- – देवेंद्र भुयार आमदार मोर्शी विधानसभा.
- ——
- राज्य शासनाने आता आर्थिक मदत द्यावी
सिंचनाची सुविधा नसतानाही शेतकऱ्यांनी जीवाचे रान करुन संत्रा बागा जगवल्या. यंदा चांगली फळधारणा झाली असता अचानक अज्ञात रोगामुळे गळती सुरू झाली आहे. त्याचा शेतकऱ्यांना जबर फटका बसत आहे. सततच्या नैसर्गिक संकटांचा सामना करताना शेतकरी हैराण झाला असून, शासनाने आता त्वरित आर्थिक मदत द्यायला हवी.
- -रुपेश वाळके उपाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष.
- ——
- संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी आता करावे तरी काय?
दरवर्षी शेतकऱ्यांना या ना त्या संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी करावे तरी काय, हाच प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यायला हवा.
- -उमेश गुडधे संत्रा उत्पादक शेतकरी.
- ——
- नुकसानीचे त्वरित व्हावे सर्व्हेक्षण
आंबिया बहारावर निसर्गाने रोगाच्या रूपाने घाला घातला आहे. त्यामुळे संत्रा उत्पादकांसमोर आज मोठी समस्या निर्माण झाली आहे. यामुळे मोठे नुकसान होऊ लागले आहे. या नुकसानाचे त्वरित सर्वेक्षण व्हायला हवे.
- -प्रकाश विघे संत्रा उत्पादक शेतकरी.
- ——
- फवारणीचा कोणताच फायदा झाला नाही
आंबियावर आलेल्या रोगावर प्रतिबंध म्हणून फवारणी केली. परंतु, हजारो रुपये खर्च करूनदेखील काहीही फायदा झाला नाही. याविषयी कृषी अधिकाऱ्यांनीच मार्गदर्शन करावे.”
-अंकुश घारड शहर अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस.
- ——
- संत्रा उत्पादकांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय मदत देणार ?
अमरावती जिल्ह्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्यासह अनेक राजकीय नेते अमरावतीत दाखल होणार आहेत. त्यामुळे काही ना काही मदत मिळेल, अशी मोर्शी वरुड तालुक्यामधील शेतकरी आशा बाळगून आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मोर्शी वरुड तालुक्याला काय देणार याकडे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
- ——