मेट्रो ३ प्रकल्प पर्यावरण पूरक ठरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    * मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कुलाबा सिप्झ मेट्रो लाईन-३ ची यशस्वी चाचणी

    मुंबई, :“ राज्य शासन पायाभूत सुविधांना प्राधान्य देत आहे. त्याअंतर्गत मुंबईकरांसाठी नव्याने जीवन वाहिनी ठरणारा मेट्रो ३ प्रकल्प सार्वजनिक वाहतुकीची सुविधा देण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करणारा ठरेल,” असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्यावतीने कुलाबा-वांद्रे-सिप्झ कॉरिडोर (एक्वा लाईन) मुंबई मेट्रो ३ च्या पहिल्या भूमिगत ट्रेन चाचणीचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सारिपुत नगर, आरे कॉलनी येथे झाला. यावेळी आमदार दिलीप लांडे, अतुल भातखळकर, जपान सरकारचे डेप्युटी कौन्सुल जनरल तोशीहिरो कानेको, मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे आदी उपस्थित होते.

    मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, “राज्य शासन सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन राज्याला प्रगतीपथावर नेणाऱ्या कामांना प्राधान्य देत आहे. मेट्रो ३ च्या पूर्णत्वानंतर सुमारे १७ लाख प्रवासी प्रवास करू शकणार असून यामुळे रस्त्यावरील सुमारे सात लाख खासगी वाहनांची वरदळ कमी होईल. याप्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होण्याबरोबरच वायू आणि ध्वनी प्रदूषण देखील कमी होईल. तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासही मदत होईल. ”

    ज्या राज्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उत्तम असते तेथील नागरिक त्याचा वापर करतात, पर्यायाने रस्त्यावरील खाजगी वाहतूक कमी होते असे सांगून हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा सुद्धा शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले. या प्रकल्पामुळे नागपूर ते मुंबईपर्यंतच्या अनेक जिल्ह्यांना लाभ होणार असून लवकरच या मार्गाच्या नागपूर-शिर्डी या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे,” असे श्री.शिंदे यांनी यावेळी सांगितले. “प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे जनहिताच्या प्रत्येक प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या पाठीशी असून राज्य आणि केंद्र सरकार मिळून विविध महत्त्वाचे प्रकल्प गतीने पूर्ण करू,” असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. मेट्रो ३ च्या यशस्वी चाचणीसाठी त्यांनी श्रीमती अश्विनी भिडे आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन करून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.