• Tue. Jun 6th, 2023

मुख्यमंत्री साहेब मोर्शी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा’ !

    * तालुक्यातील शेतकरी शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत !
    * सततच्या पावसामुळे मोर्शी तालुक्यातील शेतकरी हवालदिल !

    मोर्शी तालुका प्रतिनिधी : अतिवृष्टीमुळे मोर्शी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांचे नुकसान झाले असून शासनाने मोर्शी तालुक्यातील शेतीचं नुकसान, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान पाहून मोर्शी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना कागदी घोडे न नाचवता तसेच कुठलेही निकष व अटी, शर्ती न लावता सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी व ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्याकडे करण्यात आली.

    यावर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सरासरी पर्जन्यमानापेक्षा जास्त प्रमाणावर पाऊस झाला असल्याने शेतकऱ्यांचे संत्रा, कपाशी, मिरची, तूर, भुईमूग, सोयाबीन, यासह सर्व पिके तसेच फळबाग पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. त्यामुळे पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होणार असून, फक्त २५ टक्के पिके हातात येतील की नाही अशी शंका बळीराजाला येत आहे.

    ओला दुष्काळ ही दुष्काळाच्या विरुद्ध परिस्थिती असते. एखाद्या विशिष्ट क्षेत्रात काही काळ सतत पाऊस पडल्यास त्यामुळे होणारं शेतीचं नुकसान म्हणजेच ओला दुष्काळ होय. शासनाच्या निकषानुसार एखाद्या भागात दिवसभरात 65 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्यास आणि या पावसामुळे 33 टक्क्यांहून अधिक पिकांचं नुकसान झाल्यास त्या भागाचा समावेश ओला दुष्काळग्रस्त भागात केला जातो.

    मोर्शी तालुक्यामध्ये झालेल्या सततच्या संतधार पावसामुळे संत्राच्या आंबिया बहाराला मोठ्या प्रमाणात गळती लागली असून ५० टक्के संत्राची गळती झाली असून कपाशी, तूर, मिरची, सोयाबीन, ज्वारी यासह ईतर सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व शेती खरडून गेलेली आहे त्यामुळे शासनाचा दिवसभरात ६५ मिलिमीटर पावसाचा निकष चुकीचा असून या निकशामध्ये दुरुस्ती करून मोर्शी तालुक्यात सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्यामुळे मोर्शी तालुक्यातील शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आहे.

    ६५ मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झाल्यास या अंतर्गत कोरडवाहू शेतीसाठी जवळपास १३ हजार रुपये प्रति हेक्टर आणि बागायती शेतीसाठी १८ हजार रुपये प्रती हेक्टर नुकसान भरपाई दिली जाते. याच धर्तीवर मोर्शी तालुक्यात झालेल्या सततच्या संतधार पावसामुळे झालेल्या नुकसानीला विशेष बाब म्हणून मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना फळबागांसाठी हेक्टरी १ लाख रुपये व कोरडवाहू ईतर पिकांसाठी हेक्टरी ५० हजार रुपये मदत तात्काळ जाहीर करावी. सततच्या पावसामुळे बळीराजावर प्रचंड आर्थिक नुकसानीचा बोजा पडणार असून बळीराजाच्या साहाय्यासाठी कुठलेही निकष न लावता सरसकट नुकसान भरपाई मिळावी तसेच ओला दुष्काळ जाहीर करून त्याप्रमाणे नुकसान भरपाई दिली जावी तसेच पीक विम्याची रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासंदर्भात सूचना देण्यात याव्यात तसेच मोर्शी तालुक्यातील एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहिल्यास हजारो शेतकरी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष नरेंद्र जिचकार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश विघे, उमेश गुडधे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी तालुका अध्यक्ष सौ वृषालीताई विघे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष अंकुश घारड, रुपेश मेश्राम, विलास ठाकरे, अतुल उमाळे, विलास राऊत, अमोल सोलव, निखिल फलके, समीर विघे, सुनील केचे, यांच्यासह आदी शेतकऱ्यांनी दिला आहे.

    * मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोर्शी तालुक्याला दिलासा देणार का ?

    “सततच्या पावसाने मोर्शी तालुक्यात शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेली पीकं नष्ट झाली आहेत. त्यामुळे केवळ घोषणा न करता शेतकऱ्याला शासनाकडून मदत मिळणं गरजेचं आहे. पण सरकारकडून फक्त पंचनाम्याचे आदेश दिले जात आहेत, यापलीकडे काही केलं जात नसल्याची खंत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोर्शी तालुका ओला दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करून कुठलेही निकष व अटी शर्ती न लावता सरसकट नुकसान भरपाईची आर्थिक मदत देणार का याकडे मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *