• Mon. May 29th, 2023

मी भारत माता बोलतेय………

  नाही हो पटत मनाला,
  आज मी पंचाहत्तरी ओलांडतेय.
  करोडो अबालवृद्धांना
  मी अंगा खांद्यावर खेळतेय.
  वृक्षवल्लीने नटलेल्या
  वसुंधरेचे नवरूप बघतेय.||
  प्रत्येक क्षेत्रात महिलांना
  शिखरावर पाहतेय
  कोरोना सारख्या महामारीत
  एकोपाही अनुभवतेय||
  कानाकोपऱ्यात तिरंगा
  डौलाने फडकताना पाहून,
  खरंच, आज मी भरून पावतेय. ||
  नाहीच पटत मला, मी पंचाहत्तरी ओलांडतेय……

  होय मी भारत माता बोलतेय……आज माझा आदर्श नागरिक प्रत्येक क्षेत्रात अव्वल आहे. क्रीडा क्षेत्रात सानिया, पी टी उषा, सचिन तेंडुलकर… यासारखे नवरत्न अनुभवतेय. अवकाशात झेपावणारी कल्पना चावला, सुनीता विल्यम्स.. या माझ्या मुलींना स्मरतेय. आरोग्य विभागात जागतिक पातळीवरचं संशोधन माझे देशवासीय करत आहेत. अभियांत्रिकी आणि कृषी क्षेत्रात तर माझ्या देशवासीयांचा हात जगात कोणीच पकडू शकणार नाही. एवढेच नव्हे तर दहशतीने धगधगत्या सीमेवरचा तडफदार जवान पाहिला की माझी छाती इंचभर मोठी होते.

  सीमेवरचा एकोपा मला कोरोनाच्या काळात घराघरात दिसून आला. कोरोनासारख्या महामारीत कोरोना योद्धा म्हणून लढलेल्या माझ्या वैद्यकीय, आरोग्य, शिक्षण, पोलीस, सफाई या सर्व कर्मचाऱ्यांना पाहताना अभिमानाने ऊर माझा भरून येतोय. एकेकाळी जगाच्या कोपऱ्यात सुप्त असणाऱ्या या भारत मातेला खरंच आज जागतिक पातळीवर एक अभिमानाचं स्थान निर्माण झाले आहे याचा मला फक्त गर्वच आहे असं नाही तर सार्थ अभिमान देखील आहे. मी याच सारे श्रेय तुम्हा सर्व देशवासीयांना देते.

  आज मी स्वतंत्र होऊन पंचाहत्तरी ओलांडत आहे. तुमचा एकोपा, तुमची प्रगती, माझ्यामध्ये नांदणारी सुख समृद्धी हेच माझं खरं वैभव आहे. आजही 75 वर्षापूर्वीचे दिवस आठवले तरी डोळ्यात पाणी भरून येतं. दीडशे वर्ष इंग्रजांनी तर लुटलच होतं. परंतु त्याचबरोबर होणारी इतर परकीय आक्रमणाने देखील मी घायाळ झाले होते. अंतर्गत असणारे तंटे,कलह, अंधश्रद्धा, जातीय तेढ, दारिद्र्य, अशिक्षित, इत्यादी समस्यांनी मला ग्रासून टाकलं होतं. त्या काळचं बरंचसं वैभव परक्यांनी लुटून नेलं. माझ्या देशवासीयांना रक्ताच्या थारोळ्यात पाहताना माझा जीव तीळ तीळ तुटत होता. कित्येक क्रांतिकारकांचे प्रपंच उघड्यावर पडले होते. बाबू गेनू, भगतसिंग, सुखदेव यासारख्या तरुणांना आपलं रक्त सांडावं लागलं होतं. सावरकरांसारख्या निस्सीम देशभक्ताला काळ्यापाण्याची शिक्षा भोगावी लागली. जालियनवाला हत्याकांड आठवला की आजही अंगावर सरसरून काटा येतो. खरंच केवढा हा त्याग आणि केवढी ही देशभक्ती!

  मला स्वातंत्र्य रूप येण्यासाठी अशा अनेक अबालवृद्ध देशवासीयांच्या रक्ताने इतिहास लिहिला गेला आहे. तेव्हा कुठे लाल किल्ल्यावर इंग्रजांचा झेंडा उतरवून तिरंगा चढला गेला. हा तिरंगा इतक्या सहजतेने लाभलेला नाही, याची जाणीव फक्त जवानांना नव्हे तर देशातील प्रत्येक नागरिकाला असणे गरजेचे आहे. हे सारे अनुभव कळू द्या उद्याच्या पिढीला. आज पंचाहत्तरी साजरी करत असताना या सर्व क्रांतिकारी देशभक्तांचे अनंत उपकार आहेत हे विसरून चालणार नाही.

  म्हणूनच जात, धर्म, पंथ, लहान, थोर, गरीब, श्रीमंत हे सारे भेद विसरून एकत्र या. जगाच्या पाठीवर अभिमानाने डोलणाऱ्या तिरंगा ध्वजाच्या छायेखाली एकत्र येऊन राष्ट्रीय सण घराघरात साजरा करा. तिरंगा लाल किल्ल्यावर जेवढ्या डौलाने फडकतो तितक्याच उत्साहाने, गर्वाने आणि अभिमानाने प्रत्येकाच्या घरावर, बंगल्यावर, वाडीवस्तीवर, कार्यालयावर नव्हे नव्हे झोपडीवर देखील फडकला पाहिजे.

  मला माहित आहे तिरंग्याच्या रूपाने माझा सन्मान देशभर होत असतो. परंतु ही पंचाहत्तरी ओलांडताना मात्र हा सन्मान शासकीय कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था या पुरताच मर्यादित न राहता तो देशवासियांच्या प्रत्येक घरातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचणार आहे. माझा प्राण, माझा आत्मा,माझा गर्व, माझा स्वाभिमान, माझा रक्तरंजीत इतिहास, त्याग, शौर्य, शांती, पवित्रता, समृद्धी, इ.त लपलेले माझे साक्षात रूप म्हणजेच तुमचा, माझा लाडका तिरंगा. म्हणूनच तो तुमच्या प्रत्येकाच्या घरावरच नवी तर प्रत्येकाच्या हृदयात असला पाहिजे. मला माहित आहे ध्वजारोहण करताना जो आनंद अधिकारी,पदाधिकारी याच प्रमाणे सन्माननीय अतिथींना होतो त्याहून कितीतरी पटीने आनंद झोपडीत असेल. कारण आज त्या वंचितांच्या दारात माझा तिरंगा सन्मानाने फडकणार आहे.

  म्हणूनच जिथे जिथे तुम्ही तिरंगा फडकवाल तिथे मला त्या ध्वजामध्ये पहाल. तुमच्यामध्ये असलेल्या प्रत्येक जाती-धर्माच्या मर्यादे पलीकडे मी उभी आहे. तुमच्यामध्ये असलेल्या अनेक विविध पक्षाच्या सेमी पलीकडे माझे अस्तित्व आहे. तुम्ही रोज पूजन करीत असलेल्या तुमच्या श्रद्धास्थानाहून पुढे अंतकरणातल्या शेवटच्या बिंदूपर्यंत व्यापून राहिले आहे.

  म्हणूनच “हर घर तिरंगा” हा भारतीय सण व्हावा हीच माझी इच्छा आहे. हा तिरंगा माझा अलंकार आहे, माझं वैभव आहे, माझा प्राण आहे. तुमच्या परमेश्वरा इतकच त्याचंही पावित्र्य राखा. शासकीय इतमामात बंदिस्त असणार वैभव आज तुमच्या ओंजळीत येत आहे. त्याचा पुरेपूर सन्मानाने लाभ घ्या, आनंद घ्या, आणि रक्तरंजीत इतिहासाला स्मरण करून या मातीला नतमस्तक व्हा.

तुमची भारत माता !

  -सौ आरती अनिल लाटणे.
  मोबाईल नंबर.99 70 26 44 53

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *