• Wed. Jun 7th, 2023

माझी अमरावती..!

  श्रीकृष्णाची सासूरवाडी
  आपणांस ठाऊक आहे काय?
  लाखांमध्ये एक आहे
  आमची अमरावती माय ||
  भिष्मकाची कन्या रुख्मिणी
  पळवून नेली श्रीकृष्णाने
  मुलाची नाराजी बाजूला ठेवून
  कन्यादान केलं भिष्मकाने ||
  कापूस, ज्वारी, भाज्या अन् कपडा
  दळणवळणाला येथे जाग
  कुणावरही अवलंबून नाही
  अमरावतीचा महसूल विभाग ||
  कपड्यांचा व्यापार इथला
  मनामध्ये घालतो रुंजी
  बिझिलॅंड, सिटीलॅंडला जातांना
  सांभाळाहो आपली पुंजी ||
  अमरावतीच्या तलावाची
  वेगळीच आहे त-हा
  पाऊस लागु नये म्हणून
  छत्रीचा घेतला आसरा ||
  “सरोज” नसता, “प्रभात”
  बोले “चित्राला” एकटं गाठून
  तूच माझी “राजलक्ष्मी”,
  तूच माझी “प्रिया”*
  पड़ने नही दूँगा तुझपर
  ई-ऑर्बिट या कार्निवल का साया. ||
  जवाहर रोडच्या विजय क्लॉथला
  गाडगेबाबांचा आशिर्वाद
  गि-हाईकांशी घालत नाही
  कासट सेठ कधीच वाद||
  शेगावीचे गजानन येई
  नित्य खापर्डे कडे
  स्वागता लोटे अमरावती सारी
  शिंपुनी मार्गी सडे ||
  राजकमल आहे अमरावतीला
  परंतु नाही “कमल-राज”
  आमदार-खासदार स्वाभिमानचे
  निमूट चाले कामकाज ||
  आमदार राणा खासदार राणा
  स्वाभिमान हे त्यांचे सूत्र
  चालीसा न म्हणताच पाठविले
  घरीच बसवले पिता-पुत्र ||
  अमरावतीच्या वसतिगृहात
  मिळणार नाही वार्डन
  मात्र सदैव भरले असते
  बांबू, वूड्स अन वढाळी गार्डन ||
  १५ ऑगस्ट ४७ ला स्वतंत्र झाला भारत
  मनामनात जागली खुशी
  भुसारी गेटवर तिरंगा फडकला
  धन्य वीर वामनराव जोशी ||
  तमाम भारतवासीयांनी
  आदर्श हा नक्की घ्यावा
  शिवाजीराव पटवर्धनांची
  तपोवनची कुष्ठसेवा ||
  सोमेश्वर चौक जैन मंदीर
  स्थापिले १०९७ साली
  सव्वा नऊशे वर्ष तारतोय
  आपला आदीनाथ वाली ||
  स्वामी जनार्दनाने घडविली
  आईची मुलांशी गाठ
  एकविरेची मूर्ती स्थापिली
  वर्ष सोळाशे साठ ||
  खापर्डे बगीचाचा पत्ता
  कुणीच नाही विसरले
  पाठकांच्या प्रसुतिगृहात
  कित्येक जीव अंकुरले ||
  अमरावतीचा देव हा
  अनेकांना पावला
  सोमवारी जातात ते
  कोण्डेश्वर महादेवला ||
  कुणालाही विचारा, कुठेही शोधा,
  आख्खा देश फीरा
  भारतात कोठेच मिळणार नाही
  इथला चपराशीपुरा ||
  अमरावतीला मोक्याचे ठिकाणी
  वसलंय कॉंग्रेस नगर
  अन्य पक्षांचे लीडर मात्र
  रहातात इधर-उधर ||
  नगरवाचनालयाची व्याख्यानमाला
  बौद्धीकांचा थाटमाट
  शरीर सौष्ठवासाठी धरा
  ह व्या प्र ची वाट ||
  भानखेड्याला हरीणं आहे
  खोटा आहे हा दावा
  सकाळ-सायंकाळी मालटेकडीवर
  फीरतो त्यांचा ‘थवा’ ||
  अमरावतीच्या प्रगतीने आता
  पकडली आहे गती
  आम्हास ते लागू नाही
  अति तेथे माती ||
  शेकडो कॉलेज, शेकडो शाळा
  अमरावतीला आता काय उणे?
  उगाच नाही सगळे मानतात
  अमरावतीला विदर्भाचे पुणे ||
  विद्यादानाचे व्रत आहे
  येथील गुरुजनांचे
  विद्या दान करता करता
  शतक उलटले व्ही एम व्ही चे ||
  अमरावतीचा इतिहास जुना
  एकदा करुनच पहा वारी
  शांत, स्वच्छ अन् सोज्वळ भासे
  ही आमची “इंद्रपुरी” ||
  रहिवासी मी अमरावतीचा
  अभिमान बाळगतो उराशी
  एका प्राचीन संस्कृतीची
  हीच मथुरा, अन् हीच काशी.||
  -गणेश जोशी

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *