बैल, पोळा आणि बंड ..!

    वर्षभर ढोर कष्ट करणारे आम्ही
    आज आमचा असा नवरदेव झालाय
    कष्टातून उतराई व्हावं म्हणून
    मालकानं नवा साज पांघरलाय
    सदैव मालकासमोर मान हलविणारे आम्ही
    आज डोळ्यातून आनंदाश्रू ढाळतो
    कृतज्ञता व्यक्त करीत सदैव
    त्याच्या बरोबर एकनिष्ठ राहतो
    आयुष्यभर पिचले जातोय
    पण कधीच तक्रार केली नाही
    पण म्हातारपणी आमच्या वाट्याला
    सन्मानाचं मरण कधीच आलं नाही
    आजचं जग प्रामाणीक राहीलं नाही
    आहेत जू झुगारून उठाव करणारे
    स्वत:च्या क्षणीक सुखासाठी
    मालकाशी बेईमानी करणारे
    पण आम्हालाही वाटतं बोललं पाहिजे
    का होऊन जगावं आम्ही नित्य षंढं ?
    आम्हालाही भावना अन् पुरुषार्थ आहे
    त्यासाठी आम्ही कधीच करू नये का बंड ?
    पण आम्ही तसं करणार नाही
    पाठीत वार करणार नाही
    तुमचेच खायचे वांदे होतील
    म्हणून आम्ही बंड करणार नाही
    पण आम्ही एक तक्रार जरूर मांडणार आहे
    उद्यापासून मालकाशी करार करणार आहे
    कोणतंही नियमबाह्य काम करणार नाही
    करारानुसारच पुढचं काम चालणार आहे
    आमची चर्चा संपते आणि पोळा फुटतो
    सर्व बैल आपापल्या घरी जातात
    उद्यापासून पुढील पोळ्यापर्यंत पुन्हा तेच जगणं
    सालं,उठाव करण्याचं राहूनच जातं
    पुढच्या पोळ्याला पुन्हा चर्चा होईल,
    आवेषात उठावाच्या फैरी झडतील
    पुन्हा एकमेकांना पाय मारून पाडतील,
    विषय संपला
    पुन्हा चिंतन सभा होईल
    सर्वच पश्चाताप करतील,चर्चा करतील,
    पुढच्या पोळ्याची वाट बघत घरी निघून जातील….
    असा नेमेचीच येतो पोळा
    मात्र पुढे काहीच होत नाही !
    -अरुण विघ्ने