• Mon. Jun 5th, 2023

बाल व युवा गायकांसाठी स्वरवैदर्भी गीतगायन स्पर्धा

    * दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेचे विदर्भस्तरीय आयोजन
    * तब्बल १ लाखाचे रोख पुरस्कार
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या सांस्कृतिक महोत्सवानिमित्त सावंगी (मेघे), वर्धा येथे बालकुमार आणि युवा गायकांसाठी ‘स्वरवैदर्भी’ विदर्भस्तरीय सिनेगीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेची निवड फेरी रविवार, दि. २८ ऑगस्ट रोजी आयोजित असून विजेत्या स्पर्धकांना एकूण १ लाख रुपयांचे रोख पुरस्कार देण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या प्रवेशिका स्थानिक बडनेरा मार्गावरील निंभोरा खुर्द येथील स्कूल ऑफ स्कॉलर्स येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

    स्वरवैदर्भीच्या द्विदशकीय वाटचालीनिमित्त यावर्षी ६ ते १६ वयोगटातील बालकुमार आणि १६ ते ३५ युवा वयोगट अशा दोन गटांमध्ये ही हिंदी सिनेगीत स्पर्धा घेण्यात येणार आहे. प्राथमिक फेरीतून महाअंतिम स्पर्धेसाठी ११ स्पर्धकांची निवड केली जाणार असून दोन्ही गटातून सर्वोत्कृष्ट ठरलेल्या महाविजेत्याला २२ हजार रुपयांचा रोख पुरस्कार दिला जाईल. तसेच, दोन्ही गटात प्रत्येकी प्रथम १५ हजार, द्वितीय ११ हजार, तृतीय ७ हजार आणि प्रोत्साहनपर प्रत्येकी ३ हजार असे स्वतंत्र पुरस्कार स्वरवैदर्भी सन्मानचिन्हासह देण्यात येणार आहे. स्पर्धेकरिता प्रवेश शुल्क केवळ २०० रुपये असून ही संपूर्ण रक्कम सावंगी मेघे रुग्णालयाच्या रुग्ण सहायता निधीला देण्यात येते.

    या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता स्पर्धकाने दि. २६ ऑगस्टपर्यंत प्रवेशपत्र भरावयाचे आहे. प्रवेशपत्रासोबत स्पर्धकाने वयाचा दाखला जोडणे अनिवार्य आहे. रविवार, दि. २८ ला सकाळी ९ वाजता सावंगी येथील दत्ता मेघे सभागृहात ही स्पर्धा सुरू होणार असून प्रथम सत्रात बालकुमार स्पर्धक आणि द्वितीय सत्रात दुपारी २ नंतर युवा स्पर्धक गीत सादर करतील. निवड फेरीत हिंदी चित्रपट गीताचे धृपद आणि केवळ एक कडवे सादर करावयाचे आहे. स्पर्धकांसाठी संवादिनी, तबला व अन्य वाद्यांची आणि वादकांची व्यवस्था आयोजकांद्वारे करण्यात येईल. स्पर्धेतील सर्वच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्वरचाचणी स्पर्धेतून निवडण्यात आलेल्या ११ स्पर्धकांची महाअंतिम स्पर्धा मेघे अभिमत विद्यापीठाच्या सांस्कृतिक महोत्सवात शुक्रवार, दि. २ सप्टेंबर रोजी सायंकालीन सत्रात होणार आहे. ही महाअंतिम स्पर्धा तीन फेऱ्यांमध्ये होणार असून ‘मेरी पसंद’ या पहिल्या फेरीत स्पर्धक आपल्या आवडीचे सिनेगीत गातील. गायक भूपिंदर सिंग यांना आदरांजली म्हणून ‘यादे भूपिंदर’ ही द्वितीय फेरी होणार असून यात भूपिंदर सिंग यांनी गायलेले गीत स्पर्धक सादर करतील. तर ‘आझादी का अमृत महोत्सव’ या तिसऱ्या फेरीत हिंदी, मराठी किंवा अन्य कोणत्याही भारतीय भाषेतील देशभक्तीपर गीत स्पर्धकांना सादर करता येईल.

    स्पर्धा प्रवेशपत्र स्थानिक स्कूल ऑफ स्कॉलर्स येथे उपलब्ध असून सहभागी होऊ इच्छिणाऱ्या गायकांनी स्वरवैदर्भीचे संयोजक संजय इंगळे तिगावकर (९७६५०४७६७२) अथवा सहसंयोजक सुनील रहाटे (९९२१२८७४०८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सांस्कृतिक महोत्सवाचे संयोजक तथा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजीव बोरले यांनी केले आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *