बचत गटाच्या उत्पादनांना योग्य बाजापेठ मिळवून द्या – खासदार नवनीत राणा

    * जिल्हा परिषद, उमेद व स्त्री सन्मान फाऊंडेशनच्या उपक्रमाचा शुभारंभ
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) :बचत गटाच्या महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी व त्यांच्या उत्पादित मालाला योग्य व्यासपीठ मिळणे गरजेचे आहे. जेथे गरज तेथे उपलब्धता हे धोरण ठेवल्यास बचत गटाच्या मालाला निश्चितच बाजारपेठेत मागणी राहील, असे प्रतिपादन खासदार नवनीत राणा यांनी आज येथे केले.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त महिलांच्या सबलीकरणासाठी स्त्री सन्मान हा एक नाविण्यपूर्ण व सर्व समावेशक उपक्रम जिल्हा परिषद, उमेद व स्त्री सन्मान फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाळे, प्रकल्प संचालक प्रिती देशमुख, संभव वि. इंगोले व सारंग विधळे व उमेदचे सचिन देशमुख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

    समाजातील गरजू, उद्योजक महिला व महिला बचत गट यांना आर्थिक, सामाजिकदृष्ट्या भक्कम करणे काळाची गरज आहे, असे सांगून श्रीमती राणा म्हणाल्या की, बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या उत्पादित मालाला योग्य व्यासपीठ मिळण्यासाठी रेल्वे स्टेशन तसेच एस.टी. स्टँड डेपोचा विचार होणे आवश्यक आहे. अशा सार्वजनिक वाहतूकीच्या ठिकाणी नागरिकांना जागेवरच वस्तूची खरेदी करता येईल. यामुळे बाहेरगावावरून येणाऱ्या प्रवाशांना बाजारपेठेत जाण्याची आवश्यकता राहणार नाही. तसेच आठवडी बाजाराच्या ठिकाणीही जेथे जास्त प्रमाणात नागरिकांची ये-जा असते अशा ठिकाणी बचत गटाच्या मालाला विक्री केंद्र उभारण्यासाठी पाठपुरवठा करण्यात येईल. बचत गटांमुळे स्त्रियांमध्ये आर्थिक निर्भरता येऊन कुटुंबातील निर्णय प्रक्रियेतही त्यांचा सहभाग वाढतो. ही बाब निश्चितच प्रशंसनीय असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.

    विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे म्हणाले की, महिलांच्या सबलीकरणासाठी स्त्री सन्मान हा एक नाविण्यपूर्ण व सर्वसमावेशक उपक्रम आहे. यामुळे स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्यासह मानसिक स्वातंत्र्यही मिळाले आहे. स्त्री सन्मान ही चळवळ असून यातून महिलांना सन्मान प्राप्त झाला आहे. स्वत:च्या पायावर उभे राहिल्यामुळे या महिला मानसिक दृष्ट्याही सक्षम बनल्या आहेत. यामुळे खऱ्या अर्थाने महिलांचे सक्षमीकरण या उपक्रमामुळे होत आहे. यासाठी जास्तीत जास्त स्त्रियांनी या उपक्रमामध्ये सहभागी होऊन स्वावलंबी व्हावे. घरातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यास तिचा घरात तसेच समाजातही सन्मान वाढतो. स्त्रियांमध्ये असणारे कला, गुण, संपन्नता आणि अद्भूत क्षमता या गुणांचा योग्य प्रकारे वापर केल्यास आर्थिक उन्नतीसाठी नवीन संधी उपलब्ध करता येते. अशा महिला बचतगटांचे, उद्योजक महिलांचे गुणवत्तापूर्ण उत्पादन, वस्तू गाव-खेड्या पासून ते शहरापर्यंत आणि शहरापासून विदेशापर्यंत पोहचवण्यात स्त्री सन्मान हे मॉडेल उपयुक्त ठरणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

    स्त्री सन्मान फाऊंडेशनच्या वतीने ‘बचत गट ऑन व्हील्स’ या चित्ररथाला मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ करण्यात आले. या चित्ररथामुळे प्रत्येक घरापर्यंत बचत गटाच्या वस्तू पोहचणार आहेत. उमेद अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा तसेच आवास योजनेंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायत समितींचा यावेळी सत्कार करण्यात आला. ‘स्त्री सन्मान’ या पुस्तिकेचे मान्यवरांच्याहस्ते यावेळी विमोचन करण्यात आले.

    स्त्री सन्मान उपक्रमामध्ये बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तू विक्रीस उपलब्ध आहेत. हे प्रदर्शन उद्याही सुरु राहील. या प्रदर्शनामध्ये बांबूपासून तयार केलेल्या आकर्षक वस्तू, सुपे, टोपल्या, गाईच्या शेणापासून तयार केलेली जपमाळ, सेंद्रीय शेतीसाठी निंबोळी अर्क, सेंद्रीय औषधे व खते, दशपर्णी अर्क, गांडूळ खत, निंबोळी पेंड इत्यादी सेंद्रीय औषधे व खते उपलब्ध आहेत. याशिवाय सेंद्रीय हळद, तिखट पावडर, पापड, हातसडीचे तांदूळ, वरईचे तांदूळ, मेळघाटातील मोहापासून तयार केलेले मोहाचे लाडू आदी आकर्षक व चविष्ट खाद्यपदार्थांची विक्री येथे होत आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमाला भेट देण्याचे आवाहन स्त्री सन्मान फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.