खादी उत्सवाला उत्साहात प्रारंभ खादी उद्योगातून शहरी व ग्रामीण महिलांना रोजगाराच्या संधी – जिल्हाधिकारी पवनीत कौर

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
  गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

  अमरावती (प्रतिनिधी) : खादी निर्मितीच्या उद्योगातून शहरी व ग्रामीण भागातील गरजू महिलांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध होऊ शकतो. खादीचा प्रचार व प्रसार केल्यास, तसेच खादी वापराला प्रोत्साहन दिल्यास या क्षेत्रात उद्योग व रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण करता येतील. या माध्यमातून महिला सक्षमीकरण व ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे केले.

  स्वातंत्र्याच्याअमृतमहोत्सवानिमित्त महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ व कस्तुरबा सौर खादी महिला समितीतर्फे आजपासून बडनेरा रस्त्यावरील तापडिया सिटी सेंटरच्या तिसऱ्या मजल्यावर खादी उत्सव प्रदर्शन सुरू झाले, त्याचा शुभारंभ करताना त्या बोलत होत्या. हे प्रदर्शन दि. १५ ऑगस्टपर्यंत सुरू राहील. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक शिवकुमार मुत्तेमवार, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदिप चेचरे, तापडिया सिटी सेंटरचे कार्यकारी संचालक मधुर लढ्ढा, कस्तुरबा समितीच्या पदाधिकारी रुपाली खडसे, प्रणिता किडीले, कल्पना शेंडोकार, वर्षा चौधरी व वर्षा जाधव आदी उपस्थित होते. प्रारंभी जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याला पुष्प वाहून वंदन केले.

  हा संपूर्णतः महिलांनी महिलांसाठी राबविण्यात आलेला देशातील एकमेव प्रकल्प आहे.

  कस्तुरबा सौर खादी महिला समिती जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करून त्यापासून कच्चा माल तयार करते. हा कच्चा माल घेऊन विविध गावातील बचत गटातील महिलाभगिनींकडून चरख्यावर सूतकताई करण्यात येते. त्यानंतर त्यापासून सौर खादी कापड व विविध सौर खादी उत्पादनांची निर्मिती होते.

  या प्रकल्पात अमरावती जिल्ह्यातील ३०० पेक्षा जास्त महिलांना कायमस्वरूपी रोजगार प्राप्त झाला आहे. त्यामध्ये अमरावती जिल्हयातील धारणी तालुक्यातील १०० आदिवासी महिलांचा समावेश आहे. तसेच धारणी तालुक्यातील मांडू या गावी विणकाम केंद्र स्थापन केले असून तेथील १५ पेक्षा जास्त युवक- युवतींना उदरनिर्वाहाकरिता कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती श्री. चेचरे यांनी यावेळी दिली.

  या प्रदर्शनात खादीपासून तयार करण्यात आलेली महिला, बालके, ज्येष्ठ, युवक आदी सर्वांसाठीची सर्व प्रकारची वस्त्र प्रावरणे विक्रीस उपलब्ध आहेत. खादी सर्वदूर पोहोचावी यासाठी नवनव्या बाजारपेठांचा शोध घेऊन ब्रँड डेव्हलप करण्याचा प्रयत्न होत आहे, असे श्रीमती खडसे यांनी यावेळी सांगितले.