• Mon. May 29th, 2023

‘अनादिसिद्धा ‘ भूपाली निसळ यांची वास्तवाच्या कॅनव्हासवर काल्पनिक शब्दशिल्प असणारी अनादि सर्वांगसुंदरता ल्यालेली कादंबरी

    अहमदनगर येथील युवा लेखिका भूपाली निसळ यांच्या ‘कल्लोळतीर्थ’ या पहिल्या कादंबरीचे प्रकाशन ८ मार्च २०२० ला झाले आणि अल्पकाळातच ती उच्चांकी विक्री असणारी कादंबरी ठरली. अपेक्षेप्रमाणे ‘कल्लोळतीर्थ’ या कादंबरीची दुसरी आवृत्ती वर्षाच्या आत प्रकाशीतही झाली. ही घटना मराठी साहित्यविश्वातील आश्चर्यकारक आणि अभिमानास्पद अशीच घटना म्हणावी लागेल. वाचकच नाहीत असे म्हटले जात असताना ‘कल्लोळतीर्थ’ ला मिळालेल्या या यशाचे जाणवलेले कारण एकच ‘कल्लोळतीर्थ’ च्या विषयाचे वेगळेपण आणि दर्जेदारपणा. याचा अर्थ एकच ‘साहित्यात आपण काहीतरी वेगळे दिले, वेगळ्या विषयावरील दिले तर त्याचे उत्स्फूर्त स्वागत हे होतेच.’ हे यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे.

    कल्लोळतीर्थ ही ‘शिल्पकलेवरील’ मराठीतील अपवादात्मक ( कदाचित एकमेव ) कादंबरी. *’कल्लोळतीर्थ ‘* नंतर लेखिका भूपाली निसळ यांच्याकडून वाचकांच्या अपेक्षा वाढलेल्या होत्या. त्या अपेक्षांची पूर्ती करणारी आणि लेखिकेकडून आणखी अपेक्षा निर्माण करणारी *’अनादिसिद्धा ‘* ही दुसरी कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली आहे.

    खरेतर आपल्याला सर्वच कलांचा समृद्ध असा वारसा लाभलेला आहे. त्यातही लेणी आणि शिल्पांचा तर खूप प्राचीन काळापासून वारसा लाभला आहे पण काही ठराविक लेणी आणि शिल्पे वगळता याची माहिती अभ्यासक वगळता फारच अल्प लोकांना आहे असे खेदाने म्हणावे लागते. लेणी-शिल्पकला केंद्रस्थानी ठेवून मराठी ललितसाहित्यात म्हणावे असे लेखन झालेले नाही, ते वाचकांपर्यंत आलेले नाही असे म्हणले तर ते जास्त संयुक्तिक ठरेल. अशा पार्श्वभूमीवर भूपाली निसळ ही युवा लेखिका लेण्यांचा, शिल्पांचा अभ्यास करते, त्यावर मराठीत कादंबरी लिहिते हे खूपच कौतुकास्पद आहे.

    चालुक्यकालीन वातापी येथील लेण्यांच्या, शिल्पांच्या निर्मितीचा अभ्यासपूर्ण मागोवा घेऊन लेखिका भूपाली निसळ यांनी ‘अनादिसिद्धा ‘ही कादंबरी लिहिली आहे. एखाद्या विषयावर अभ्यासपूर्ण लेखन म्हणले की ते बोजड शब्दांतील, कंटाळवाणे असते किंवा असणार हा सर्वसामान्य वाचकांचा असणारा समज लेखिकेच्या ‘कल्लोळतीर्थ ‘ आणि ‘अनादिसिद्धा ‘ या दोन्ही कादंबरींनी खोडून काढला आहे.

    ‘अनादिसिद्धा’ चा काळ आहे तो साधारण सोळाशे वर्षांपूर्वीचा, साधारण सहाव्या शतकातील. आजच्या बदामी आणि तत्कालीन चालुक्यशासीत प्रदेशातील लेण्यांच्या निर्मितीवरील या कादंबरीत आज रूढ नसणारे काही शब्द येतात पण त्या शब्दांचा अर्थ तळटीप लिहून देण्यात आला आहे हे या कादंबरीचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ठ्य आहे. कादंबरीची सुरवात होते तीच मुळी नाटकासारखी पात्र परिचयाने आणि तिथूनच रसिक वाचक कादंबरीशी जोडला जातो. तो जसजसा कादंबरी वाचत जातो तसतसा तो वाचक न उरता त्यातील घटनांचा साक्षी बनत जातो, दर्शक बनत जातो.. आणि हे लेखिकेचे शब्दसामर्थ्य आहे.

    बदामी परिसरात चालुक्यसाम्राट राजा कीर्तिवर्मा याच्या राजवटीत अनेक मंदिरे, लेणी – गुंफा यांची निर्मिती झाली. या निर्मितीचा अभ्यास करून लेखिकेने ही कादंबरी लिहिली आहे. सम्राट कीर्तिवर्मा, त्याचा भाऊ मंगलीश, सेनापती आराभट्ट, वास्तुविशारद, प्रमुख शिल्पी ( शिल्पकार ), शिल्पी या मंदिरे आणि शिल्प निर्मितीत योगदान असणाऱ्या काही ऐतिहासिक पात्रांबरोबर रेवती, हरिदत्त, अम्मा, निषाद यांसारखी काही काल्पनिक पात्रेही या कादंबरीत येतात . रेवती या शिल्पिनी च्या जीवन प्रवासावरील ही काल्पनिक कादंबरी आहे पण वास्तव आणि काल्पनिक यांचे अतिशय सुरेख, मनभावक अद्वैत साधण्यात लेखिका यशस्वी झाली आहे. त्यामुळे ही कादंबरी म्हणजे वास्तवाच्या कॅनव्हास वरील काल्पनिक शब्दशिल्प आहे.

    समर्पितता, आदर, आस्था, प्रेम, अहंकार, द्वेष इत्यादी मानवी भावभावनांचे आणि श्रेयवादाचे चित्रण हे कुठेही बटबटीतपणा येऊ न देता अतिशय संयत रूपात या कादंबरीत येते आणि ते वाचताना वाचकाला त्या काळात घेऊन तर जातेच पण त्याचबरोबर ती समकालाशीही जोडत राहते. हे या कादंबरीचे आणि लेखिकेचे अपूर्व यश म्हणावे लागेल.

    कादंबरी वाचकांच्या मनाची पकड घेते ती तिच्या आरंभापासूनच .. अगदी कादंबरीच्या अर्पणपत्रिकेपासूनच ! कादंबरी तीन प्रकरणात विभागली असून प्रत्येक प्रकरणाला अतिशय सार्थ, सुंदर,मनभावक आणि चिंतनीय अशी वेगळी अर्पणपत्रिका आहे हे ‘अनादिसिद्धा ‘ चे आणखी एक वेगळे वैशिष्ठय आहे.

    कादंबरी वाचताना ‘ स्थिरता निर्माणाची स्वप्ने देते, उत्तुंगता देते.’ अशी वैश्विकसत्य सांगणारी, जीवनार्थ सांगणारी अनेक सुंदर वाक्ये अगदी सहजतेने ,ओघात येतात आणि क्षणभर वाचकाला थबकवतात. काही वाचकांना ती, कादंबरीचे स्वतःचे वेगळेपण अधोरेखित आणि अबाधित ठेवूनही वि.स.खांडेकरांचे आणि त्यांच्या साहित्यातील जीवनचिंतनाचे स्मरण करून देतात. हे लेखिकेच्या लेखनशैलीचे आणि ‘अनादिसिद्धा’ चे वैशिष्ठय म्हणावे लागेल.

    ‘अनादिसिद्धा ‘ कादंबरीत प्रारंभी दिलेला बदामी परिसरातील शिल्पस्थळांचा नकाशा तसेच संजय दळवी यांचे मुखपृष्ठ रंगीत छायाचित्र व प्राजक्ता खैरनार यांची शिल्पांची रंगीत छायाचित्रे लेखिकेच्या अभ्यासाची ग्वाही देतात आणि वाचकाला वाचनप्रवासात सहाय्यभूत ठरतात,भावूनही जातात.

    ‘ अनादिसिद्धा ‘* ही लेणी-शिल्प निर्मितीवरील, वेगळ्या भवतालाचा वेध घेणारी मराठी साहित्यातील मैलाचा दगड ठरावी अशी सर्वांगसुंदर कादंबरी आहे हे निश्चित ! पुन्हा पुन्हा वाचण्यास प्रवृत्त करणाऱ्या ‘ *अनादिसिद्धा* कादंबरीने लेखिका भूपाली निसळ यांच्या साहित्यलेखनाबाबतच्या अपेक्षा आणखी उंचावून ठेवल्या आहेत. *’ अनादिसिद्धा ‘* कादंबरी साठी आणि पुढील साहित्यलेखनासाठी भूपाली निसळ यांना खूप खूप शुभेच्छा !

    * अनादिसिद्धा
    * लेखिका : भूपाली निसळ
    * प्रकाशक : इंकिंग इनोव्हेशन्स, मुंबई
    * पृष्ठे : १३२ किंमत : ₹ ३२०/-
    ◆◆◆
    आनंदहरी
    ८२७५१७८०९९
    इस्लामपूर जि.सांगली

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *