मुंबई : राज्यात सत्तापरिवर्तनाची हालचाल खर्या अर्थाने राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांवेळीच सुरू झाली होती. राज्यसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवाराचा झालेला पराभव अनेक आमदारांच्या जिव्हारी लागला. त्यामुळे, विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राज्यात शिवसेनेतील मोठा गट विभक्त झाला आणि राज्यात सत्तांतर घडून आले. या सत्तांतराचे किंगमेकर हे भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरले, तर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदेही मुख्यमंत्री बनले. त्यानंतर, भाजप आमदार मुक्ता टिळक यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अभिनंदन केले. त्यामुळे, फडणवीस यांनी भावनिक पोस्ट लिहून मुक्ता टिळक यांचे आभार मानले आहेत.
राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत भाजपच्या मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांनी दोन्हीवेळेस रुग्णावाहिकेतून विधिमंडळ गाठत भाजपला मतदान केले. त्यामुळे, भाजप नेत्यांकडून त्यांच्या पक्षप्रेमाचे आणि कर्तव्याचे उदाहरण सातत्याने दिले गेले. तसेच, हा विजयही त्यांनाच सर्मपित करण्यात आला. आता, राज्यात सत्तांतर झाल्यानंतरही मुक्ता टिळक यांनी देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली. सद्यस्थितीतही आजारी असताना त्यांनी ही आपुलकी आणि कर्तव्य निभावल्याने देवेंद्र फडणवीसही भावूक झाल्याचे त्यांच्या ट्विटमधून पाहायला मिळत आहे.ह्यया आपुलकी, जिव्हाळ्याबद्दल मन:पूर्वक आभार. प्रकृती ठीक नसतानाही पक्षासाठी सर्वोच्च भावना राखत राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत मतदानाला येऊन आपल्या ध्येयसर्मपित जीवनाचे दर्शन तर घडविले होतेच. पण, आवर्जून घरी येत माझे अभिनंदन केलेत. आभार मानू तरी कसे मुक्ताताई.. अशा शब्दात भावनिक पोस्ट लिहून देवेंद्र फडणवीस यांनी मुक्ता टिळक यांचे आभार मानले आहेत.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या