Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

जिल्ह्यात निर्माण होणार साडेसहा हजार पोषण परसबागा

    * "माझी पोषण परसबाग विकसन मोहीम" ची अंमलबजावणी सुरू
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : उमेद अभियानाद्वारे जिल्ह्यात स्वयंसहायता समूहातील महिलांची व त्यांच्या कुटुंबाचे आरोग्य व पोषणाची स्थिती सुदृढ राहण्यासाठी "माझी पोषण परसबाग विकसन मोहिमे"ची अंमलबजावणी 21 जुलैपर्यंत करण्यात येणार आहे. या पंधरवड्यात जिल्ह्यात शासकीय आणि खाजगी व्यक्ती संस्थांच्या समन्वयातून साडेसहा हजार पोषण परसबागा तयार करण्यात येणार आहेत, असे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रीती देशमुख यांनी आज सांगितले.

    मोहिमेद्वारे परसबागांची निर्मिती करून महिलांना उत्पन्नाचे एक नवीन साधन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. ग्रामीण महिलांचे विशेषतः गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, लहान बालके व किशोरवयीन मुली यांच्या आहाराचा दर्जा सुधारणा करण्यासाठी उमेद अभियानात सीटीसीद्वारे (समुदाय स्तरावरील समन्वयक कृतीसंगम) यांच्या मार्गदर्शनात वेळोवेळी ग्राम स्तरावर मार्गदर्शन करण्यात येते. त्यात नव्याने परसबाग विकसन मोहिमेतून परसबागेची निर्मिती करण्यात येणार आहे.

    जिल्हा स्तरावर कृषी, महिला व बालविकास, आरोग्य, शिक्षण विभागाच्या समन्वयाने गावातील अंगणवाडी, शाळा, आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत आणि सार्वजनिक ठिकाणी बागा तयार करण्यात येणार आहेत. त्याशिवाय, वैयक्तिक स्वरूपात घरी शेतात किंवा मोकळ्या ठिकाणी बागा निर्माण होतील. त्यातील ताज्या व पौष्टिक भाजीपाल्याचा वापर मुलांच्या, महिलांच्या आहारात करून कुपोषण आणि ॲनिमियाचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे श्रीमती देशमुख यांनी सांगितले.

    बागांसाठी स्थानिक बियाण्याचा वापर

    या मोहिम कालावधीत परसबागेचे लेआऊट तयार करून गोलाकार पद्धतीने बियाणे (भाजीपाला) लागवड करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग, महिला व बालविकास विभाग, शेतकरी उत्पादन कंपनी आणि इतर शासकीय संस्थेद्वारे बियाणे किट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्थानिक पातळीवरील बियाण्याचा वापर करून या परसबागा निर्माण करण्यात येणार आहेत.

    मोहिमेदरम्यान कृषी विज्ञान केंद्र, आहार तज्ज्ञ व पोषणातील इतर तज्ज्ञ व्यक्तींमार्फत ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. आहारात हिमोग्लोबिनचे महत्व पटवून देण्यात येऊन यामुळे वैयक्तिक लाभार्थी परसबाग बनविण्यात प्रोत्साहित करण्यात येणार आहे. तयार केलेल्या परत बागेतून किमान दोन सायकल पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. तयार केलेल्या पोषण परसबागेची नोंद जिओ टॅग फोटोग्राफीद्वारे नियमितपणे करण्यात येणार आहे.मोहिमेबाबत अधिक माहितीकरिता संबंधित प्रभाग समन्वयक तसेच, जिल्हा व्यवस्थापक अमोल देवलसी, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन देशमुख यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code