- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : धर्मादाय योजनेत रूग्णालयांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना वैद्यकीय सुविधा विनामूल्य व उपचार सवलतीच्या दरात मिळणे आवश्यक आहे. या योजनेची सर्व रूग्णालयांनी काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश धर्मादाय सहआयुक्त संभाजी ठाकरे यांनी आज येथे दिले.
धर्मादाय योजनेत रूग्णालयांकडून होणा-या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी विविध रूग्णालयांच्या प्रतिनिधींची बैठक धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखाली डॉ. हेडगेवार आयुर्विज्ञान संस्थानमध्ये झाली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पी. आर. पाटील, निरीक्षक संतोषकुमार राऊत, संस्थेचे अध्यक्ष अजय श्रॉफ आदी उपस्थित होते.
सहआयुक्त श्री. ठाकरे म्हणाले की, प्रत्येक धर्मादाय रुग्णालयाने ‘निर्धन रुग्णांचा निधी’ असा स्वतंत्र कक्ष निर्माण करावा. या कक्षाच्या माध्यमातून गरजूंना लाभ द्यावा व त्यांच्या वैद्यकीय गरजा पूर्ण कराव्यात. रुग्णालयांत गरजू रुग्णांना वैद्यकीय सेवा, प्रत्येक विभागातील वैद्यकीय तपासणी उपचार व आदी सुविधा मोफत व उपचार सवलतीच्या दरात द्यावे. तातडीच्या वेळी अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबतच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.
धर्मादाय रुग्णालयांना प्राप्त होण्याऱ्या देणग्या रुग्णांच्या निधी खात्यात जमा करावा. धर्मादाय रुग्णालयांना सर्व रुग्णांच्या देयकाच्या दोन टक्के रक्कम प्रत्येक महिन्याला गरजू रुग्णाच्या निधी खात्यामध्ये जमा करावी. रुग्णालयांनी आपले लेखापरीक्षण पूर्ण करून अहवाल तातडीने सादर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.
मातृसदन धर्मार्थ होमीओपॅथीक स्पेशालिटी हॉस्पीटल व अनुसंधान केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख रूग्णालय, विदर्भ आयुर्वेद महाविद्यालय, श्री गुरूदेव आयूर्वेदीक महा. व रूग्णालय, श्री अंबादेवी संस्थान व डॉ. जोशी ट्रस्ट हॉस्पीटल, दयासागर, श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पीटल, कॅन्सर हॉस्पीटल, दंत महाविद्यालय व रूग्णालय तखतमल श्रीवल्लभ होमी. मेडीकल कॉलेज, महाराज रूपभजन चॅरीटेबल हॉस्पीटल, अलमिना चॅरीटेबल हॉस्पीटल, डॉ. राजेंद्र गोडे आयुर्वेद कॉलेज व हॉस्पीटल, डॉ. हेडगेवार ट्रस्ट हॉस्पीटल, श्री. राणीसती नेत्र रूग्णालय यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
0 टिप्पण्या