अमरावती (प्रतिनिधी) : रमाई शहरी आवास योजनेत अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांसाठी एकूण साडेआठ कोटी रूपये निधी सामाजिक न्याय विभागातर्फे वितरित करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक समाजकल्याण उपायुक्त सुनील वारे यांनी दिली.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील कुटुंबांच्या निवा-याचा प्रश्न सुटावा म्हणून शहरी भागात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने रमाई आवास योजना राबवली जाते. आर्थिक अडचणींमुळे स्वत:च्या घराचे बांधकाम न करू शकणा-या गरीब व्यक्तींसाठी ही योजना मोलाची ठरली आहे. ग्रामीण भागात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, तर शहरी भागात महापालिका क्षेत्रासाठी आयुक्त व नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रासाठी जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत कार्यवाही होते.
शहरी आवास योजनेत 323 चौरस फूट क्षेत्रफळ बांधकामासाठी प्रतिलाभार्थी अडीच लाख अनुदान महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात दिले जाते. त्यासाठी उत्पन्नाची मर्यादा तीन लाख रु. आहे. योजनेत अमरावती विभागास 8 कोटी 50 लाख रूपये प्राप्त आहेत. त्यात अमरावती जिल्ह्यासाठी 4 कोटी रू., अकोला व यवतमाळ जिल्हा प्रत्येकी 1 कोटी रू., वाशिम 50 लक्ष रू. व बुलडाणा जिल्ह्यासाठी 2 कोटी रू. निधी वितरित करण्यात आला आहे, असे श्री. वारे यांनी सांगितले.
राज्यात रमाई शहरी आवास योजनेसाठी 70 कोटी रू. निधी वितरित झाला असून, नियोजित कामे पूर्णत्वास जाणार आहेत. राज्यात 48 हजार 424 घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. गरजूंच्या स्वत:च्या घराचे स्वप्न याद्वारे साकार होणार आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या