Recent in Technology

Advertisement

Breaking News

प्राणी क्लेश प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा - जिल्हाधिकारी पवनीत कौर

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : जास्तीत जास्त गोवंशाना टॅग करुन जनावरांसाठी सुरक्षितता निर्माण करण्यात यावी. गोवंशाच्या रक्षणासाठी पोलीस प्रशासन व पशुसंवर्धन विभागाने समन्वयाने काम करावे. प्राणी क्लेश प्रतिबंध कायद्याची जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सुचना जिल्हाधिकारी श्रीमती पवनीत कौर यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी सभागृहात प्राणिक्लेश प्रतिबंधक समीतीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली त्यावेळी त्या बोलत होत्या.

    पोलिस अधिक्षक(ग्रामीण) अविनाश बारगळ, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. संजय कावरे, सहायक आयुक्त डॉ. राजीव खेरडे, महापालिकेचे पशु वैद्यकिय अधिकारी डॉ.सचिन बोंद्रे, सहायक पोलिस आयुक्त प्रशांत राजे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पुरुषोत्तम सोळंके, प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गिते, विस्तार अधिकारी(शिक्षण) अशोक रामटेके आदी उपस्थित होते.

    येत्या रविवारी बकरी ईद हा सण येत असुन जिल्हा पशुसंवर्धन विभागाने मनुष्यबळाचे नियोजन करुन जिल्ह्यातील अधिकृत पशुवधगृहामध्ये जनावरांची तपासणी करावी. जनावरे विक्री बाबतची माहिती पोलीस प्रशासनाने घेऊन त्यावर तात्काळ कार्यवाही करावी. प्राणी क्लेश प्रतिबंध कायद्यानुसार अधिकाधिक कारवाया व्हाव्यात. याबाबत जनजागृती करण्यासाठी शहरी तसेच ग्रामीण भागातील स्थानिक नागरिंकाचा सहभाग घ्यावा व उपक्रम राबविण्यात यावे असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

    प्राणी निवारण केंद्रात सुविधा निर्माण कराव्या

    महापालिका क्षेत्रामध्ये प्राणी क्रुरता अधिनियम व प्राणी संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिकेमार्फत प्राणी निवारण केंद्राची उभारणी करण्यात येत आहे. यासाठी अतिरीक्त निधी जिल्हा नियोजनमधुन देण्यात येईल. तसेच या प्राणी निवारण केंद्रात दाखल करण्यात आलेल्या प्राण्यांना औषधोपचार, लसीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. जास्तीत जास्त मोकाट कुत्र्यांवर नसबंदीची शस्त्रक्रिया करण्याबाबत नियोजन करण्यात यावे असे श्रीमती कौर यांनी सांगितले.

    ग्रामीण पोलीस विभागाने नाकाबंदी व मिळालेल्या माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत ४५८ जनावरांना गोशाळेत दाखल करण्यात आले. जखमी व आजारी जनावरांवर त्वरीत उपचार करण्यात आले. अशी माहिती संबंधितांनी दिली. अशा कारवाईंबाबतची माहिती पोलीस प्रशासनाने पशुसंवर्धन कार्यालयाला देण्यात यावी. या अहवालाच्या आधारे पशुसंवर्धन विभागाने पोलीस प्रशासनाशी समन्वय साधण्याच्या सुचना श्रीमती कौर यांनी दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code