अमरावती (प्रतिनिधी) : येथील वन प्रादेशिक विभागातर्फे पाच परिक्षेत्रात 2 लाखांहून अधिक वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, त्याचा शुभारंभ वनसंरक्षक (भावसे) जी. के. अनारसे यांच्या हस्ते झाला.
वनविभागातर्फे 1 ते 7 जुलै दरम्यान वन महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यात अमरावती प्रादेशिक कार्यालयांतर्गत वडाळी, मोर्शी, वरूड, परतवाडा, चांदूर रेल्वे या परिक्षेत्रांत वृक्षारोपणासह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. वडाळी परिक्षेत्रात वृक्षारोपणाचा शुभारंभ झाला. वनसंरक्षक श्री. अनारसे यांच्यासह विभागीय वनाधिकारी (दक्षता) व्ही. जी. डेहणकर, सहायक वनसंरक्षक लीना आदे, वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे आदी यावेळी उपस्थित होते.
वनमहोत्सवानिमित्त वृक्षारोपणाबरोबरच वनांचे महत्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी प्रात्यक्षिकांचे कार्यक्रमही घेण्यात येत आहेत. अमरावती प्रादेशिक वनवृत्तातर्फे 239 हेक्टरमध्ये 2 लाख 66 हजार झाडे लावण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे, कुरण विकास कार्यक्रमही हाती घेण्यात आला आहे, असे वनसंरक्षक श्री. अनारसे यांनी यावेळी सांगितले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकातून वनांचे महत्व व वनमहोत्सव उपक्रमाबाबत माहिती देण्यात आली.
वृक्षारोपणात कडूलिंब, पिंपळ, वड, सागवान, बेहडा, शिसव, पापडा, बांबू अशा विविध प्रजातींचा समावेश आहे. वनवृत्तातील पाचही परिक्षेत्रात बहुविध वृक्ष प्रजातींचे वनक्षेत्र या उपक्रमातून निर्माण होणार आहे. या कार्यक्रमाला अधिकारी, कर्मचारी, विविध शाळांच्या विद्यार्थ्यांसह नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या