Header Ads Widget

पानपिंपरी व पानवेली औषधी उत्पादक शेतकरी विकास समिती शासन स्तरावर स्थापन

    * आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या पाठपुराव्याला यश
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : शासन स्तरावर पानपिंपरी व पानवेली औषधी उत्पादक शेतकरी विकास समिती स्थापन करण्यास मान्यता मिळाली असून, माजी राज्यमंत्री तथा आमदार बच्चूभाऊ कडू यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.राज्य शासनाने ही समिती स्थापन केल्यामुळे पान पिंपरी व पानवेली या नष्ट होत चाललेल्या महत्त्वपूर्ण पिकाची शासन दरबारी नोंद होणार असून ह्या पिकाला नवसंजीवनी मिळणार आहे. अमरावती विभागातील हजारो शेतकरी बांधवांना याचा लाभ मिळणार आहे.

    अमरावती विभागीय पानवेली, पानपिंपरी, औषधी उत्पादक शेतकरी विकास अभियानच या माध्यमातून राबवले जाणार आहे. अमरावती विभागातील अंजनगाव सुर्जी, अचलपूर, अकोट, हिवरखेड , तेल्हारा व जळगांव जामोद, वरवट बकाल तसेच जळगाव खानदेशातील काही भागात पानवेली व पानपिंपरी हे पीक या भागात मोठ्या संख्येने वसलेल्या बारी समाज बांधवांकडून पारंपरिकरित्या घेतले जाते.गेल्या काही दिवसात या पिकांवरील रोग तसेच बाजारभावातील अनियमितता, रखडलेले शासकीय अनुदान यामुळे पानपिंपरी, पानवेली व एकूणच औषधी वनस्पती उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणींचा सामना करत आहेत. त्यामुळे या भागातील पानपिंपरी व पानवेली हे पीक नष्टप्राय होण्याच्या मार्गावर आहे.

    या भागातील औषधी वनस्पती उत्पादक शेतकऱ्यांची ही परिस्थिती लक्षात घेऊन आमदार श्री. कडू यांनी आपल्या राज्यमंत्री पदाच्या कार्यकाळात विभागीय आयुक्त कार्यालय येथे विभागीय आयुक्त व कृषि विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली होती. बैठकीत पानपिंपरी व पानवेल या पिकांची शासनदरबारी नोंद करून, औषधी वनस्पती व त्याकरिता असलेले अनुदान तसेच उत्पादक शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ व इतर सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला होता. या बैठकीतच श्री. कडू यांनी पानपिंपरी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांचा अभ्यास करून शासनाला शिफारशी सादर करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्देश सदर बैठकीत दिले होते. त्या अनुषंगाने विभागीय आयुक्त यांनी पानपिंपरी उत्पादक तालुक्यातील शेतकरी प्रतिनिधी व आयुक्त तसेच कृषी विभागाचे अधिकारी आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे तज्ञ, यांचा समावेश असलेली एक समिती स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. या समितीस मान्यता मिळविण्यासाठी श्री. कडू अनेक दिवसांपासून प्रयत्नरत होते, मंत्रालयात याबाबत अनेक बैठका त्यांनी आयोजित केल्या व वेळोवेळी पाठपुरावा केला.

    या प्रस्तावास कृषि विभागाने मान्यता दिली असून पानपिंपरी व पानवेली औषधी उत्पादक शेतकरी विकास समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. समिती स्थापन केल्यामुळे पान पिंपरी व पानवेली ह्या, नष्ट होत चाललेल्या महत्त्वपूर्ण पिकाची शासन दरबारी नोंद होईल. गेले अनेक वर्ष प्रलंबित असलेले शासकीय अनुदान, संशोधन व इतर शासकीय योजना यांचा लाभ पान पिंपरी उत्पादक शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा प्रश्न परिसरातील बारी समाजाच्या विकासाच्या संबंधात अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न असून तो प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आ. कडू यांचे सर्व शेतकऱ्यांकडून अभिनंदन होत आहे.

    ही समिती पानपिंपरी व पान वेलीच्या संशोधन तसेच पिकावरील इतर रोग व शेतकऱ्यांना कराव्या लागणाऱ्या समस्यांचा सामना, राष्ट्रीय या आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, याबाबत शासनाला प्रस्ताव व शिफारशी सादर करेल व त्या अनुषंगाने शासनाने कारवाई करायची आहे. असे ह्या समितीचे स्वरूप आहे औषधी वनस्पती शेतकरी उत्पादक यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या