Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

संवेदनशील अनुभव देणारा काव्यसंग्रह "या निर्णायक काळात "

  लोकशाहीर वामनदादा कर्डक म्हणतात, "मी चातुर्वर्ण्याची चौकट मोडली, तसाच मी काव्यशास्त्राच्या चौकटीतून मुक्त आहे. मी माणसाचं गाणं लिहीत आलो, मी वाड:मयीन मूल्यांची पर्वा करीत नाही तर आंतरिक उर्मीतून लिहितो" कवी रविंद्र साळवे लिहितात, बालपणी मी वामनदादांची अनेक गाणी पाठ केली होती...सहाजिकच वामनदादांच्या प्रेरणेतून त्यांच्या 'या निर्णायक काळात' या काव्यसंग्रहाची निर्मिती झाली. बुद्धीप्रामाण्य या संकल्पनेनुसार देव या कल्पनेपेक्षा माणसाला किंमत देणे, धर्म स्वतःपुरता मर्यादित ठेवणे, जातीपातीच्या पलीकडे विचार करणे.. ही पुरोगामी व्यक्तीची लक्षणे आहेत. म्हणून कवी रवींद्र साळवे म्हणतात,

  जे जे पटेल ते खा
  विनंती एवढीच की
  जातीसाठी माती खाऊ नका माणुसकीला काळीमा लावू नका..

  पुरोगामी विचारसरणीचे लोक सुधारणावादी, प्रगतिवादी आणि वैज्ञानिक दृष्टीचे असतात. दैववादी अथवा मनुवादी नसतात. तर आपल्या वागण्या-बोलण्यातून समस्त मानव जातीच्या कल्याणाचा विचार मांडतात. त्यामुळे साळवे यांची कास्तकारांना उभारी देणारी कविता चिंतनीय आहे. ते म्हणतात,

  माझ्या शेतकरी भावा
  तू देत राहिलास दक्षिणा
  मंदिर मठांना अणि ढेरपोट्या भटांना
  असा हताश होऊ नको
  ज्योतिषाला हात दाखवू नको..

  साळवेंच्या कवितेतून चार्वाक, गौतम बुद्ध, ब्राह्मणी व्यवस्थेला हादरा देणारे संत तुकाराम, आणि समतेचा मंत्र देणारे बाबासाहेब आंबेडकर दृष्टीस पडतात. बाबासाहेबांनी बुद्ध कबीर, फुले यांना गुरु मानले, शिवरायांना वंदन केले, पण अजून काही लोकांना बाबासाहेबांच्या आगेमागे कोणाचे नाव जोडलेले मान्य नाही, इतके लोक संकुचित झाले आहेत. याची जाणीव कवी करून देतात. चार भिंतीत राहून केवळ बायका पोरात रमणाऱ्या आणि फेसबुकवर फोटो टाकणाऱ्या लोकांना लाईक करण्याची कवीची इच्छा होत नाही. ते लिहितात,

  तुम्ही कायम दिसता फेसबुकवर
  बायकोच्या कमरेला विळखा घालून
  पण तुम्ही कधीच कसे दिसला नाहीत व्यवस्थेने निर्माण केलेल्या प्रश्नावर
  चार शब्द बोलताना ?

  २०१४ नंतर अंधभक्त झालेल्या तथाकथित लोकांवर त्यांनी कवितेतून कोरडे ओढले आहेत. एवढेच नाही तर कळप या कवितेमध्ये संकुचित लोकांनी बनवलेल्या जातीपातीच्या कळपावर आसूड ओढले आहेत. कविता कशी असावी? हे सांगताना ते म्हणतात,

  तू झाडावर लिहितोस
  वाऱ्यावर लिहितोस
  एखादवेळी आमच्या डोळ्यातल्या
  अश्रूंवर लिहून बघ
  मग तुला नक्की कळेल
  माणसाचे दुःख काय ते...

  यातून जातीधर्माच्या पलीकडे जाऊन माणसाने एकमेकावर केलेली माया जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे असे कवीला सुचवायचे आहे. सगळ्या धर्मग्रंथांचा सार माणूस आणि माणुसकी आहे हे त्यांच्या कवितांमधून दृष्टीस पडते. कवीला बुद्धाच्या अहिंसेवर भरवसा आहे. ते म्हणतात, शब्द हेच माझे शस्त्र आहे, शब्दांचा मारा करून मी वैचारिक लढाई जिंकणार आहे.

  काळ कोणताही असू देत
  गांधी आणि नत्थ्याच्या वैचारिक लढाईत मी असेल गांधीच्याच बाजूला...
  आताच्या काळातील माणसामाणसातील
  व्देष पाहून कवीला यातना होतात.
  घर जळणे, माणसे मारणे
  द्वेष करणे, ट्रोल करणे
  राहिले नाही नवे
  आता तरी सर्वांनी जागे व्हायला हवे..

  निरिक्षण,अभ्यास आणि आकलन यातून कविता सफूरत असते. त्यातूनच कविचा दृष्टिकोन तयार होतो. रवींद्र साळवे यांचे व्यक्तिमत्व व्यापक आहे, आप -परका असा भेदभाव न ठेवता ते रोखठोक लिहितात. सनातनी वृत्तीवर प्रहार करतात. त्याचबरोबर आपल्या कवितेतून सर्वांचे भले व्हावे असा आशावाद सुद्धा बाळगतात.

  -नरेंद्र इंगळे,
  अकोट जि. अकोला
  मो. ९५६१२२६५७२

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code