Header Ads Widget

श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती येथे चतुर्थ पदवी प्रमाणपत्र वितरण विद्यार्थी गुण गौरव सोहळा संपन्न

  गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

  अमरावती (प्रतिनिधी) : श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती येथे चतुर्थ पदवी प्रमाणपत्र वितरण व विद्यार्थी गुण गौरव सोहळा दिनांक १९ जुलै २०२२ रोजी महाविद्यालयाच्या सर सी. व्ही. रमन सभागृहात आयोजित करण्यात आला. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावतीच्या गुणवत्ता यादीत झळकलेल्या पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमातील गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना या प्रसंगी प्रमाणपत्रे व सुवर्ण पदके देवून गौरविण्यात आले. तसेच महाविद्यालयातील विविध विषय विभागांच्या प्राध्यापकांनी प्रायोजित केलेल्या सुवर्ण पदकांचे वितरण या प्रसंगी केल्या गेले.

  श्री. शिवाजी शिक्षण संस्था अमरावती चे सचिव माननीय श्री शेषरावजी खाडे या सोहळ्याला अध्यक्ष पदी लाभले होते. या सोहळ्याला संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे प्र- कलगुरू माननीय डॉ. व्ही. एस चौबे प्रमुख अतिथी म्हणुन लाभले तसेच विशेष अतिथी म्हणन श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे उच्च शिक्षण संचालक तसेच महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.व्ही.जी. ठाकरे उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी.व्ही. कोरपे यांनी व्यासपीठावरून प्रास्ताविक केले तसेच प्रमुख अतिथी, विशेष अतिथी व सोहळ्याच्या अध्यक्षांचे स्वागत रोपटे व 'डॉ. पंजाबराव देशमुख गौरव ग्रंथ' देवून केले.

  या प्रसंगी डॉ. चौबे यांनी मानवी मुल्यांची जपणुक करून चिकित्सक व्हा, विविध कौशल्ये आत्मसात करून आपले जीवन समुद्ध करा. 'प्रात्यक्षिकांद्वारे शिक्षण' या संकल्पने द्वारे स्वत:ला घडवून स्वावलंबी बना असे आवाहन विद्यार्थ्यांना केले तसेच डॉ. व्ही. जी ठाकरे यांनी ज्ञानसमृद्ध करणारे विविध कोर्सेस करून आपल्या पायावर उभे राहून उज्ज्वल भवितव्य घडविण्याचे तसेच नविन शैक्षणीक धोरण २०२० अन्वये मुल्य शिक्षणातून कौशल्यविकासाची संकल्पना साकारण्याकरीता अथक प्रयत्न करण्याचे आवाहन केले. माननीय श्री. शेषरावजी खाडे यांनी सुक्ष्मनिरीक्षणातून ज्ञानी होवून त्या ज्ञानाचा उपयोग समाज घडविण्यासाठी करा तसेच महान विचारवंताच्या, शास्त्रज्ञांच्या चारित्र्याचे वाचन, मनन करून अनुकरण करा, प्रयत्नांची पराकाष्ठा करून अखंड यश आणि असंख्य पुरस्कार मिळवा असे विद्यार्थ्यांना आवाहन करीत अध्यक्षीय संबोधन केले.

  या सोहळ्याचे सुत्रबद्ध संचालन डॉ.मनिष गायकवाड व डॉ. उज्जवला जुनघरे यांनी केले तसेच डॉ. वामन बरडे, डॉ. रमाकांत इटेवाड, डॉ. उमेश काळे व डॉ. गणेश हेडाऊ यांनी पुरस्कारक म्हणून काम पाहिले. या प्रसंगी एकूण ३६ विद्यार्थ्यांना ४७ सुवर्ण पदके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आलीत. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीतील बी. एस. सी., एम. एस. सी., बी. सी. ए. अभ्यासक्रमाच्या गुणवंत विद्यार्थ्यांना या प्रसंगी सुवर्ण पदके व पदवी प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. तसेच बी. एस. सी. भाग १, बी. एस. सी. भाग २, एम. एस. सी. भाग १, बी. व्होक. भाग १ च्या गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके व पदवी प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.

  या सोहळ्याच्या यशस्वीतेकरीता पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभाच्या समन्वयक डॉ. एस.पी. इंगोले तसेच विविध विभागाच्या विभाग प्रमुखांनी, समन्वयकांनी व प्राध्यापकांनी तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अत्यंत मोलाचे सहकार्य केले. या सोहळ्याला महाविद्यालयातील शिक्षकवृंद , शिक्षकेतर कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी, गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे पालक, संस्थेचे आजीवन सभासद, महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तसेच वृत्तपत्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या