Header Ads Widget

"जागल "

मी एक भारतीय जागल्या
मी जागल करतोय ...
सत्याची , नितीमत्तेची , सत्विचाराची , 
कास्तकारांच्या हक्काची,
आया -बहीणीच्या,लेकी- सुनाच्या इभ्रतेची !

मी जागल करतोय ...!
व-हाडी बोलीभाषेची, मायबोलीची ,
अहिंसेच्या तत्वाची , विज्ञानवादी विचाराची, समता ,स्वातंत्र्य , बंधुता ,न्यायाची अस्मितेची, अस्तीत्वाची, स्वाभिमानाची, देशाच्या संविधानाची, भ्रष्टाचारमुक्त भारताची ..!

मी जागल करतोय ..!
वावरातल्या जेवारीच्या कणसांची,दाण्याची
कापसाची, सोयाबीनची, तुरीची, 
माझी भूक भागवणा-या तमाम सात्वीक पिकांची ,भाकरीची ,
विहीरीच्या पाण्याची , बैलांच्या मेहणतीची , गाई-म्हसी, बक-या-मेंढरायची , मजुरांच्या कष्टाची ,सुपीक- नापीक मातीची ..!

मी जागल करतोय ..!
दिल्लीतून गल्लीत येणा-या प्रत्येक योजनांची , 
सरकारी तिजोरीतल्या प्रत्येक खडकूची, 
फायद्याची- तोट्याची, आल्या-गेल्या  पैस्याची ...!

मी जागल करतोय ...!
विदेशी संस्कृतीपासून -देशी संस्कृतीची, 
चांगल्या -वाईट घटनांची नोंद घेणा-या पेनाची , 
शोषीत , वंचीत, उपेक्षितांच्या अधिकाराकरीता लढणा-या तमाम हातांची ,
अंधारापासून उजेडाची... !

मी जागल करतोय...!
दुर्जनापासून-सज्जनांची ,
हिंसेपासून-अहिंसेची ,
असत्यापासून-सत्याची ,
अनीतीपासून -नीतीची !
अंधा-या रात्री कंदीलाच्या उजेडात
मी रांगडा गडी रानडुकरांना हेरतो ,
ये सी बीच्या जाळ्यात पक्क घेरतो ,
कायद्याच्या गदेघाटात नेऊन कोंडतो !
कास्तकारांना वाकुल्या दाखवणा-या वान्नेरांना गोफणगोटा हाणतो ,
मी माझ्या कष्टाचं, घामाचं ,रगताचं खातो,
हवा पाहून तीवा मांडना-यांची
मी मतदानातून हवा जिरवतो ,

जागल मंजे काय हो ?

जागल म्हंजे...सिमेवर राखण करणं 
जागल म्हंजे...संविधानाची सोकारी करणं 
जागल म्हंजे...जागं राहून आरोळी ठोकणं 
जागल म्हंजे...उपद्रवी जणावरांना घालवनं, लोकशाहीची राखण करणं 
जागल म्हंजे...तमाम पिकांची काळजी घेणं ,
जागल म्हंजे..अन्यायाविरोधात रस्त्यावर लढणं .

आता जागल करायची वेळ आलेली आहे
म्हणून मी रात्रंदिवस चेता राहतो 
होय मी एक भारतीय  ' जागल्या '
मी  ' जागल ' करतोय , आणि तुम्ही ? 
करून बघाना जागल !
तुमच्यासाठी, लेकरांसाठी, समाजासाठी, आणि आपल्या देशासाठी उपद्रवी जणावरांपासून !

अरुण विघ्ने

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या