अमरावती (प्रतिनिधी) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यात समाजकल्याण विभागाच्या 75 शाळा ‘हायटेक’ करण्यात येणार असल्याचे समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी येथे सांगितले.विभागातर्फे श्री शिवाजी महाविद्यालयात नुकत्याच झालेल्या विभागीय शिक्षण परिषदेत ते बोलत होते. प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे, प्राचार्य रामेश्वर भिसे यांच्यासह विभागातील पाचही जिल्ह्यांतील अधिकारी, गृहप्रमुख, गृहपाल, मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.
डॉ. नारनवरे म्हणाले की, विद्यार्थ्यांची जडणघडण करण्यात शाळांइतकेच महत्व वसतिगृहांचेदेखील आहे. त्यामुळे शाळा आणि वसतिगृहांत संस्कारक्षम वातावरण निर्माण करणे, नवनवे उपक्रम राबवणे आवश्यक आहे. शाळांनी शिक्षणाबरोबरच क्रीडा, संगीत, कला अशा विविध क्षेत्रांचे ज्ञान विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्या सर्वांगीण विकासाचा प्रयत्न करावा. स्पर्धा परीक्षांची माहिती, तज्ज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळवून द्यावे. राज्यात ७५ शाळा अद्ययावत तंत्रज्ञान व सुविधांद्वारे हायटेक करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आयुक्त डॉ. नारनवरे यांच्या लोकाभिमुख व उत्कृष्ट प्रशासकीय कामकाजाबाबत पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार विभागातर्फे श्री. वारे यांच्या हस्ते, तर महाविद्यालयातर्फे श्री. मिरगे यांच्या हस्ते करण्यात आला. श्री. वारे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. मनोज जोशी यांनी आभार मानले. डॉ. राजेश मिरगे यांनी सूत्रसंचालन केले.कार्यशाळेनंतर सामाजिक न्यायभवनाच्या परिसरात आयुक्तांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आयुक्तांनी ‘बार्टी’तर्फे चालवल्या जाणा-या अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांशी संवादही साधला.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या