अमरावती (प्रतिनिधी) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सहकार्याने आयटीआय परिसरातील एनएसएस सभागृहात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा सोमवारी (11 जुलै) सकाळी 10 वाजता आयोजिण्यात आला आहे. त्यात 351 विविध पदांसाठी मुलाखती होणार असून, सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सुशिक्षीत उमेदवारांना शासकीय नोकरीच्या पुरेशा संधी उपलब्ध नसल्यामुळे खासगी क्षेत्रात असलेल्या रोजगाराच्या संधीचा शोध घेऊन बेरोजगारांना त्या उपलब्ध करुन देण्याचे दृष्टीने हा उपक्रम राबवला जात असल्याचे सहायक रोजगार आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी सांगितले.
उमेदवारांची मुलाखतीद्वारे प्राथमिक निवड होणार आहे. औरंगाबाद येथील धुत ट्रान्समिशनमध्ये ईपीपी ट्रेनी 100 पदे उपलब्ध आहेत. तिथे 18 ते 28 वयोगटातील दहावी, बारावी, पदवीधरांना अर्ज करता येईल. अमरावतीच्या नवभारत फर्टीलायझर्समध्ये सेल्स ट्रेनीची 51 पदे असून, 18 ते 45 वयोगटातील दहावी, बारावी, पदवीधरांना अर्ज करता येईल. अमरावतीतील थिंजी एचआर सर्व्हिसेस ॲन्ड स्कील डेव्हलपमेन्ट या कंपनीतील सेव्हिंग मशिन ऑपरेटरच्या 50 पदांसाठी 18 ते 35 वयोगटातील दहावी, बारावी, आयटीआय उत्तीर्णांना अर्ज करता येईल.
अमरावतीच्या गोल्डन फायबरमध्ये ट्रेनी ऑपरेटरची पुरूषांसाठी 50 व महिलांसाठी 50 उपलब्ध आहेत. दहावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्णांनाही तिथे संधी मिळेल. तिथे 20 ते 30 वयोगटातील पुरूषांना व 20 ते 28 वयोगटातील महिलांना अर्ज करता येईल. पुण्यातील टॅलेनसेतू सर्व्हिस या कंपनीत असेम्ब्ली ऑपरेटरची महिलांसाठी 30 व पुरूषांसाठी 20 पदे आहेत. दहावी, बारावी किंवा डिप्लोमा आवश्यक आहे. या पदासाठी 18 ते 30 वयोगटातील पुरूषांना व 18 ते 28 वयोगटातील महिलांना अर्ज करता येईल.
इच्छूक उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा. ज्या कंपनीकडे मुलाखत द्यावयाची आहे, तिची निवड करुन ऑनलाईन माहिती भरावी. सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असून, त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. शेळके यांनी केले आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या