Recent in Technology

Advertisement

Breaking News

ऊर्जेबाबत 2047 पर्यंतच्या नियोजनासाठी ‘उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य’ उपक्रम- जिल्हाधिकारी पवनीत कौर

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : पारंपरिक व अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील ठळक कामगिरीचा वेध, तसेच सद्य:स्थितीतील आव्हाने व 2047 पर्यंतच्या नियोजनाच्या उद्देशाने जिल्हा प्रशासन व ऊर्जा विभागातर्फे दि. 25 ते 31 जुलैदरम्यान ‘उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य’ महोत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. जि. प. सीईओ अविश्यांत पंडा, ‘महावितरण’चे अधिक्षक अभियंता दिलीप खानंदे व इतर अधिकारी उपस्थित होते.

    जिल्हाधिकारी श्रीमती कौर म्हणाल्या की, महोत्सवाद्वारे ऊर्जा क्षेत्रात गत आठ वर्षांत झालेल्या उत्कृष्ट कामांची माहिती, पारंपरिक व अपारंपरिक ऊर्जेबाबतची ठळक कामगिरी, केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची उद्दिष्ट्यपूर्ती यावर प्रकाश टाकतानाच, ऊर्जा क्षेत्रातील आव्हानांच्या निराकरणासाठी उपाययोजना व 2047 पर्यंतचे नियोजन करण्यात येणार आहे. महोत्सवाच्या समोराप दि. 30 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीत होईल. त्याचे प्रक्षेपण स्थानिक स्तरावरील महोत्सवात करण्यात येईल. पंतप्रधानांच्या हस्ते ऊर्जा विभागाच्या वितरण प्रणाली सुधारणा व बळकटीकरण (RDSS) या नव्या योजनेची सुरूवात होणार आहे. त्याचबरोबर, ‘नॅशनल पोर्टल फॉर सोलर रूफटॉप’चे अनावरणही होणार आहे. महोत्सवात जिल्ह्यात 27 जुलै रोजी सकाळी 11 वाजता नियोजनभवनात आणि दुपारी 4 वाजता मोर्शी रस्त्यावरील परशुरामभवनात कार्यक्रम होणार आहे. विविध लोकप्रतिनिधी व मान्यवर यावेळी उपस्थित राहतील.

    त्या पुढे म्हणाल्या की, केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचे काही लाभार्थी महोत्सवात उपस्थित राहून मनोगत व्यक्त करणार आहेत. खेडोपाडी विद्युतीकरण, घरोघर वीजपुरवठा, वितरण प्रणाली बळकटीकरण, क्षमतावृद्धी, वन नेशन वन ग्रीड, नवीकरणीय ऊर्जा, ग्राहक हक्क आदी विविध विषयांवर माहितीपट महोत्सवाद्वारे दाखवले जाणार आहेत. मेळघाटातील दुर्गम गावांतील वीजपुरवठ्याबाबतही सादरीकरण केले जाणार आहे. योजनांच्या लाभामुळे झालेल्या बदलांचा वेध घेणा-या नाटिका व स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सादर होतील, असेही त्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code