Header Ads Widget

अमरावती विभागात पीएम- कुसुम योजनेत 10 हजारहून अधिक नोंदणी - ‘मेडा’चे विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : पीएम- कुसुम योजनेत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत 10 हजार 839 लाभार्थी नोंदणी झाली असून, त्यापैकी 4 हजार 975 पात्र लाभार्थ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी एसएमएस पाठविण्यात आले आहे. उर्वरित अर्जांवरील प्रक्रियाही गतीने सुरू आहे, असे ‘महाऊर्जा’चे विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे यांनी सांगितले.

    उपक्रमात 3 हजार 610 लाभार्थ्यांना हिस्सा जमा केला असून, 2 हजार 296 ठिकाणी सर्वेक्षण पूर्ण केले आहे. प्रत्यक्षात सौर कृषी पंप बसविण्याच्या कामालाही गती देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे व पारंपरिक पद्धतीने कृषी पंप जोडणीसाठी लागणाऱ्या खर्चात बचत व्हावी, यासाठी पारंपरिक पद्धतीने वीज जोडणी उपलब्ध नसलेल्या ठिकाणी पारेषणविरहित सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

    या योजनेसाठी केंद्र शासनाचे 30 टक्के अर्थसाह्य आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांचा हिस्सा 10 टक्के आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांचा हिस्सा 5 टक्के आहे. उर्वरित 60 ते 65 टक्के हिस्सा राज्य शासनाचा असतो. योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘महाऊर्जा’च्या स्वतंत्र ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करावा. अधिक माहितीसाठी ‘मेडा’च्या विभागीय क्रीडा संकुलातील कार्यालयात किंवा www.mahaurja.com या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन श्री. तायडे यांनी केले.

    त्याचप्रमाणे, या योजनेचा लाभ देण्याचे आमिष दाखवून काही फसव्या संकेतस्थळ व सोशल मीडियाद्वारे शेतकरी बांधवांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा बनावट संकेतस्थळांवरील आवाहनाला प्रतिसाद देऊ नये, तसेच कोणतेही शुल्क भरू नये, असेही आवाहन त्यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या