• Sun. Jun 11th, 2023

‘हर घर तिरंगा’ उपक्रम दि. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान ध्वजसंहितेचे पालन व्हावे – जिल्हाधिकारी पवनीत कौर

  गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

  अमरावती (प्रतिनिधी) : ‘हर घर तिरंगा’ उपक्रम दि. 13 ते 15 ऑगस्ट या काळात राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक घरावर तिरंगा डौलाने फडकावा, यासाठी सर्वांनी उपक्रमात सहभागी होण्याचे, ध्वजसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

  अशी आहे ध्वजसंहिता

  ध्वजसंहितेनुसार, आपला राष्ट्रध्वज हा हाताने कातलेला किंवा विणलेला अथवा मशीनद्वारे तयार केलेला असावा. सूत, पॉलिस्टर, सिल्क, खादी किंवा लोकरीपासून तयार केलेला तिरंगा चालेल. प्लास्टिक किंवा कागदी झेंडा फडकवू नये. राष्ट्रध्वजाचा अर्थात तिरंगाचा आकार हा आयताकृती असेल. तसेच त्याची ठेवण 3:2 या प्रमाणात असावी.

  ध्वज फडकविताना हवामान कसेही असले तरी तो सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकावा. म्हणजेच दि. 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या तीनही दिवशी रोज सकाळी फडकवावा आणि सूर्यास्ताच्या वेळी रोज उतरावा. घरी लावलेल्या झेंड्याबाबतही हे आवश्यक आहे.राष्ट्रध्वज उतरवल्यानंतर व्यवस्थित आणि सुरक्षित ठिकाणी ठेवावा. तिरंगा फडकवताना नेहमी झेंड्यातील केशरी रंग हा वरच्या बाजूने आणि हिरवा रंग हा जमिनीच्या बाजूने राहील, याची काळजी घ्यावी. यात चूक केल्यास तो तिरंग्याचा अवमान समजण्यात येतो. राष्ट्रीय ध्वज लावताना स्तंभाच्या वरच्या टोकावर लावावा. त्याला स्तंभाच्या मध्ये अगर खाली किंवा इतरत्र लावू नये.राष्ट्रध्वज लावताना, इतर सजावटी वस्तू लावू नये, केवळ फडकवण्याआधी त्यात फुले किंवा पाकळ्या ठेवण्यास मनाई नाही, तसेच राष्ट्रध्वज उतरवताना पूर्ण सावधानतेने आणि सन्मानाने हळूहळू उतरवावा.

  ध्वजावर कोणते प्रकारचे अक्षर चिन्ह लावू नये. तसेच ध्वज स्तंभाच्या वर अथवा आजूबाजूला काही लावू नये, ध्वज जमिनीपासून उंचावर लावावा. ध्वज जाणून-बुजून जमिनीवर अगर पाण्यामध्ये बुडणार नाही अशा पद्धतीने लावावा. राष्ट्रीय ध्वजाचा वापर व्यवसायाकरिता करता येत नाही. तसेच त्याची अवहेलनाही करणं दंडनीय अपराध आहे. त्यामुळे ध्वजाचा उपयोग गाडीवर झाकणे, इमारतीवर झाकणे, टेबलवर टेबल क्लॉथ प्रमाणे टाकणे, ध्वजाच्या कोणत्याही प्रकारच्या पोशाखाचा अथवा गणवेशाचा भाग म्हणून वापर करणे, ध्वजाचा रुमाल, उशी किंवा शर्ट आदींवर किंवा कोणत्याही पोशाख साहित्यावर भरतकाम किंवा छपाई करणे चुकीचे आहे.

  राष्ट्रध्वज कुठल्याही प्रकारे फाटलेला, मळलेला अथवा चुरगळलेला लावण्यात येऊ नये. तसेच तो एकाच वेळी इतर ध्वजासोबत एकाच काठीवर फडकवू नये. ज्या स्तंभावर राष्ट्रध्वज फडकवायचा आहे, त्या काठीवर वा स्तंभावर ध्वजाच्या टोकावर फुले किंवा हार यासारखी कोणतीही वस्तू, बोधचिन्ह ठेवू नये. राष्ट्रध्वजाच्या कोणत्याही प्रकारे तोरण, गुच्छ अथवा पताका म्हणून किंवा अन्य कोणत्याही प्रकारे शोभेसाठी उपयोग करू नये. राष्ट्रीय ध्वज उभारताना तो कोणत्याही पद्धतीने फाटणार नाही, याची काळजी घ्यावी.आपला राष्ट्रध्वज तिरंगा हा आपला अभिमान आहे. आपली अस्मिता आहे. त्याचा कुठल्याही प्रकारे अनादर होईल अशा प्रकारे कृत्य करू नये. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपल्या घराघरात हा ध्वज लावायचा आहे. त्यामुळे ही ध्वज संहिता पाळण्यात यावी,असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *