• Mon. May 29th, 2023

‘हर घर तिरंगा’ उपक्रमात सर्व नागरिकांना सहभागाचे आवाहन

  गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

  अमरावती (प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दि. 11 ते 17 ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ उपक्रमात घरे, कार्यालये, आस्थापनांवर राष्ट्रध्वज फडकावा यासाठी सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्र. विभागीय आयुक्त तथा जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे केले.

  ‘हर घर तिरंगा’ उपक्रम, कोविड प्रतिबंधक लसीकरण व इतर विषयांबाबत महसूलभवनात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. जि. प. सीईओ अविश्यांत पंडा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे, महावितरणचे अधिक्षक अभियंता दिलीप खानंदे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण सिनारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले आदी उपस्थित होते.

  ध्वजसंहितेचे पालन व्हावे

  हर घर तिरंगा मोहिमेत ग्रामीण भागात ध्वज उपलब्ध करून देण्यासाठी व्यापारी बांधव, विविध संस्था-संघटनांची मदत मिळविण्यात येत आहे. उपक्रमात ध्वजाची प्रतिष्ठा राखण्यासाठी ध्वजसंहितेचे पालन व्हावे. ध्वज स्पष्ट दिसेल अशा ठिकाणी लावावा. सूत, लोकर, पॉलिस्टर, सिल्कचा ध्वज लावता येईल. प्लास्टिकचा असू नये. त्याचा आकार तीन बाय दोन असावा. ध्वज मळलेला किंवा फाटलेला नसावा, आदी नियमांचे पालन व्हावे. हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी नागरिकांना सहभागाचे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.

  पात्र व्यक्तींनी तत्काळ बुस्टर डोस घ्यावेत

  अठरा वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी 15 जुलैपासून पुढील 75 दिवस सरकारी लसीकरण केंद्रांत विनामूल्य बुस्टर डोस देण्यात येत आहे. लसीची दुसरी मात्रा घेऊन सहा महिने पूर्ण झालेल्या नागरिकांनी बुस्टर डोस घ्यावा. जिल्ह्यात 14 लाख 23 हजार व्यक्तींचे दुस-या मात्रेचे लसीकरण झाले आहे. बुस्टर डोससाठी 10 लाख व्यक्ती पात्र आहेत. त्यांनी डोस घ्यावा. दुसरी मात्रा न घेतलेल्या पाच लाख व्यक्ती आहेत. त्यांनी लसीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले. वयोगट 12 ते 18 मधील लसीकरण वाढविण्यासाठी शालेय स्तरावर शिबिरे आयोजित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

  अतिसार साथ निर्मूलनासाठी कार्यवाही

  दूषित पाणी बाधा प्रकरणी कोयलारी, पाचडोंगरी परिसरात अतिसाराची साथ उद्भवून चार मृत्यू झाले. या परिसरात शाळेत तत्काळ उपचार केंद्रे सुरू करण्यात आली. तपासण्या व सर्वेक्षण होऊन गरजूंना उपचार देण्यात आले. उपचारानंतर बरे झालेल्या व्यक्तींना घरी सोडण्यात आले. सद्य:स्थितीत चार रूग्णांवर चुरणी येथे उपचार होत आहेत. दोन्ही गावांत 50 मोबाईल स्वच्छतागृहे उपलब्ध करून दिली आहेत. परिसरात ब्लिचिंग पावडर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचा वापर, क्लोरिनेशन व स्वच्छताविषयक दक्षतेबाबत अधिकारी व कर्मचा-यांना सूचित करण्यात आले आहे. स्वच्छ पाणीपुरवठ्याबाबत बीडीओंकडून संनियंत्रण होत आहे. अखंडित संपर्क व समन्वयासाठी जिल्हा परिषदेत वॉररुम स्थापण्यात आली आहे, असे श्री. पंडा यांनी सांगितले. हर घर जल, हर घर तिरंगा व कोविड प्रतिबंधक बुस्टर डोस आदी उपक्रमांबाबत जुलैअखेरच्या आठवड्यात ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

  आरोग्य विभागातर्फे ‘डूज अँड डोन्टस्’ जारी

  पावसाळ्यात उद्भवणारे आजार टाळण्यासाठी काय करावे व काय करू नये, याबाबत आरोग्य विभागाने सूचना जारी केल्या आहेत. उकळून गार केलेले पाणी प्यावे. उघड्यावरचे अन्न खाऊ नये. हातांची स्वच्छता, स्वच्छतागृहांचा वापर, जुलाब झाल्यास तत्काळ उपचार आदी बाबींचे कटाक्षाने पालन करण्याबाबत पथकांमार्फत जनजागृती होत असल्याचे डॉ. निरवणे यांनी सांगितले.

  नुकसानीचे पंचनामे

  गत 24 तासांत जिल्ह्यात 31 मंडळांत अतिवृष्टी झाली. या सर्व गावांतील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येतील. त्याचप्रमाणे, दि. 5 ते 10 जुलैदरम्यान झालेल्या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे 50 टक्के पंचनामे झाले आहेत व उर्वरित प्रक्रिया होत आहे. सुमारे 29 हजार हेक्टर शेतीनुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रत्येक बाबीची काळजीपूर्वक व सविस्तर नोंद घेऊन पंचनामे पूर्ण करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *