- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : सुसर्दा गावात खवल्या मांजराची (पॅंगोलिन) शिकार करणा-या आरोपींना तीन तासांत जेरबंद करण्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या पथकाला यश मिळाले.
परतवाड्याच्या मेळघाट प्रादेशिक वनविभागाच्या उपवनसंरक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यातील बुधवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास धारणी येथील वनपरिक्षेत्र अधिका-यांना मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडून संदेश प्राप्त झाला. सुसर्दा गावात खवल्या मांजराची शिकार झाल्याची गोपनीय माहिती मिळाली असून, त्याची शहानिशा करण्याचे आदेश वनसंरक्षक कार्यालयातर्फे देण्यात आले. या माहितीचा तपास धारणी वनपरिक्षेत्र अधिका-यांनी सुरू केला व माहितीत तथ्य असल्याचे परिसरातील गोपनीय सूत्रांकडून निश्चित झाले.
दरम्यान, याबाबत एक छायाचित्रही तपास पथकाला प्राप्त झाले. या छायाचित्रात दिसत असलेले ठिकाण सुसर्दा गावात कुठे आहे किंवा कसे, याचा तपास पथकाने सुरू केला. त्यानंतर तशी जागा एका घरामागे आढळली. त्यानुसार पथकाने तेथील रहिवाशी झनकलाल बाट् कास्देकर यांना ताब्यात घेतले. चौकशीत झनकलाल कासदेकर यांनी कबुली दिली. तीनजणांनी मिळून खवल्या मांजर मारले व मेलेले खवले मांजर घरी घेऊन गेले व नंतर शेतात जाऊन काही लोकांनी वाटून ते खाल्ले असल्याचे चौकशीदरम्यान समोर आले.
आरोपीच्या बयाणानुसार, त्याच्या घरापासून एक किलोमीटर दूर असलेल्या शेतात दर्शविलेल्या जागेवर जाऊन शोध घेण्यात आला. तेथील बांधावर दगडांच्या खाली प्लास्टिकच्या पिशवीत मांजराचे खवले ठेवल्याचे आढळले. ते तत्काळ जप्त करण्यात आले. याबाबत आरोपी झनकलाल बाट् कासदेकर व झनकलाल मुन्शी कासदेकर यांनी कबुलीजवाब दिला. हा गुन्हा दि 19 जूनला घडल्याचे आरोपींनी सांगितले. त्यांच्याविरुद्ध वनगुन्हा जारी करून त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना धारणी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. पुढील तपास व कार्यवाही सुरु आहे.