संपूर्ण राज्यात पावसाचा हाहाकार..!

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
    * हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्या अचूक अंदाजानुसार उद्या होणार सूर्यदर्शन

    सध्या सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर राज्यात पूर्वेपासून दक्षिणेपर्यंत आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सर्वत्र बघायला मिळत आहे. यामुळे राज्यात जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.राज्यात मान्सूनचे आगमन उशिराने झाले असले, तरी गेल्या काही दिवसांत बहुसंख्य भागांमध्ये पावसाने कहर करायला सुरुवात केली आहे. राज्यभरात पावसामुळे आत्तापर्यंत ८४ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळाली. यापैकी नऊ जणांचा मृत्यू गेल्या २४ तासांत झाला आहे.

    मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. या पावसामुळे राज्यात आत्तापर्यंत ८३८ घरांचे नुकसान झाले असून पाच हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. पूरग्रस्तांसाठी राज्यात ३५ ठिकाणी मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत. याशिवाय सुमारे १२५ जनावरेही पावसामुळे दगावली आहेत. मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीने किमान १३० गावे बाधित झाली असून २०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे गडचिरोलीतील १२८ गावांचा संपर्क तुटला आहे.

    दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील अर्धशक्तिपीठ म्हणून ओळखल्या जाणा-या सप्तशृंगी गडावर काल ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. यामुळे गडावरील दगड-गोटे दर्शन रांगेत आले. परिणामी, दर्शनासाठी आलेल्या ४-५ भाविकांना दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

      चार-पाच दिवसांपूर्वी निम्म्याहून अधिक खाली असलेले धरण आता ओव्हर-फ्लो होऊ लागल्याने पावसाची तीव्रता किती असेल? हे आपल्याला समजते. आता या धरणातून पाण्याचा विसर्ग होणार आहे. अशा परिस्थितीत नदीकिनारी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीकिनारी असलेल्या लोकांनी वेळेत सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे असे आवाहन देखील नदीकिनारी वसलेल्या गावांना केले जात आहे. सध्या राज्यातील जनता पाऊस उघडण्याची आतुरतेने वाट पाहत आहे.

      गेल्या काही दिवसांपूर्वी पावसाची आतुरतेने वाट पाहणारा बळीराजा देखील सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धास्तावून गेला आहे. अशा परिस्थितीत आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात परिचित असणारी व्यक्ती म्हणजेच परभणी भूमीपुत्र हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी आपला मान्सून अंदाज सार्वजनिक केला असून राज्यात सूर्यदर्शन केव्हा होईल याची तारीख देखील त्यांनी डिक्लेअर केलेली आहे.

      हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्या मते, हवामानात अचानक बदल झाल्यामुळे १२ तारखेपासून १४ तारखेपर्यंत राज्यात मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळणार असल्याचा अचूक अंदाज जाहिर केला होता. म्हणजेच सध्या सुरू असलेला पाऊस १४ तारखेपर्यंत उघडणार नसल्याचे पंजाबराव यांनी स्पष्ट केले होते.

      यामुळे शेतकरी बांधवांची काळजाची धडधड वाढली असून खरिपात पेरलेल्या पिकांची नासाडी होणार असल्याचे शेतकरी बांधव नमूद करत आहेत. आधी पावसाअभावी दुबार पेरणी करावी लागते की काय? अशी परिस्थिती शेतक-यांच्या पुढ्यात उभी राहिली होती. मात्र आता जास्त पावसामुळे दुबार पेरणी करावी लागते की काय? अशी चिंता शेतक-यांना भेडसावत आहे.

      पंजाबराव यांनी वर्तवलेल्या सुधारित अंदाजानुसार १२ ते १४ जुलै दरम्यान, राज्यात कोकण किनारपट्टी, मुंबई, नाशिक, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ सर्वत्र जोरदार पाऊस कोसळणार होता आणि तो कोसळला. पंजाबराव यांनी सांगितले की, राज्याला आता सूर्याचे दर्शन १५ तारखेलाच म्हणजेच आज होणार आहे. निश्चितच सूर्यदेवाची आतुरतेने वाट पाहणा-या जनतेसाठी अजून काही काळ पावसाच्या विक्राळ रूपाचा सामना करावा लागणार होता.

      शब्दस्पर्शी-सुनील शिरपुरे
      कमळवेल्ली,यवतमाळ
      भ्रमणध्वनी-७०५७१८५४७९

      (Images Credit : Lokmat)