शेंडेमर व संत्रा गळतीमुळे संत्रा उत्पादकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान !

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
  • संशोधकांच्या दुर्लक्षितपणामुळे मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी संकटात !
  • रुपेश वाळके यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन !

  मोर्शी तालुका प्रतिनिधी : बदलत्या वातावरणाने अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील संत्रा झाडांचे शेंडे पिवडे पडून संत्रा झाडे मोठ्या प्रमाणात वाळत असून संत्राच्या आंबिया बहाराला गळती लागल्याने संत्रा उत्पादक शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त झाले आहे. संत्रा गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने या संकटातून कसे सावरायचे? असा प्रश्न संत्रा उत्पादकांपुढे उभा ठाकला आहे. या नुकसानीचे सर्वेक्षण करून संशोधकांनी व कृषी विभागाने तातडीच्या उपाययोजना सुचविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी केली आहे.

  मोर्शी तालुका हा संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर सतत संकटांची मालिकाच सुरु आहे अवकाळी पाऊस, गारपीट, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, अज्ञात रोगाची लागण, मोठ्या प्रमाणात खर्च करूनही संत्राला मिळणारा अत्यल्प भाव, अश्या दृष्ट्चक्रात संत्रा उत्पादक शेतकरी भरडल्या जात आहे त्यामुळे मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे मात्र कृषी विभागाच्या व संशोधकांच्या उदासीनतेमुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारचे मार्गदर्शन वेळेवर मिळत नाही.

  शेंडे मर रोगामुळे संत्रा बागा उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे तरीही संशोधक व कृषी विभाग अजूनही कुंभाकर्णी झोपेतच असल्याचे चित्र दिसत असून संशोधकांकडून व कृषी विभागाकडून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारचे मार्गदर्शन वेळेवर केल्या जात नसून साधी संत्रा बागांची पाहणी करण्यासाठी सुद्धा त्यांना वेळ मिळत नसल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी या अज्ञात रोगापासून अनभिज्ञ आहे. मोर्शी तालुक्यातील लाखो संत्राझाडावर संत्रा गळती, कोलत्या (शेंडे मर, पायकूज व मुळकूज) या रोगाने आक्रमण केल्याने झाडांचे शेंडे वाळू लागले आहे.त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे.अर्थसंकल्पात कोट्यावधी रुपयांची तरतूद करण्यात आलेल्या मोर्शी तालुक्यातील सिट्रस इस्टेट कागदावरच असल्याने तो प्रत्यक्षात पूर्ण करण्यात यावा, संत्रावर प्रक्रिया करणारा संत्रा प्रकल्प उभारण्यात यावा व संत्रा रोगावर उपाययोजना करून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

  मोर्शी तालुक्यात यावर्षीप्रथमच संत्रा झाडावरील शेंडे अचानक वाळू लागल्याने हिरव्या फांद्यांसह आंबिया बहराची हिरवी संत्री गळून जमिनीवर पडत आहेत. संत्रा उत्पादक शेतकर्‍यांची सर्वाधिक मदार आंबिया बहरावर असतांना शेंडेमर रोग, संत्रा गळती मोठ्या सुरू असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी त्याची माहिती तालुका कृषी अधिकारी यांना दिली असून सुद्धा आजपर्यंत कोणत्याच प्रकारची दखल घेतली नसल्याची चर्चा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सुरु असून कृषी विभागाबद्दल शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत असून जिल्हा कृषी अधिकारी, संत्रा संशोधक, यांनी मोर्शी तालुक्यातील परिसरातील संत्रा बागांना भेटी देवून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानचे सर्वेक्षण करून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणार का? याकडे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

  • कृषी विभाग व संशोधकांची उदासीनता ?

  संत्रा फळगळ रोखण्यासाठी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही, ही शोकांतिका आहे. संत्र्याच्या बाजार व्यवस्थापनासाठी सरकारने मदत केली पाहिजे, फळबागा वाचवण्यासाठी शास्त्रज्ञांनी सखोल मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. संत्रावर सध्या शेंडेमर, संत्रा गळती, पानगळ, यांसारख्या अनेक रोगांची लागण झाल्यामुळे मोर्शी वरुड तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. याला शासनाचे उदासीन धोरण, संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान व प्रक्रिया उद्योगांचा अभाव तसेच केंद्रीय लिंबूवर्गीय फळ अनुसंधान संस्था, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, कृषी विभाग यांचा नकारात्मक दृष्टीकोन कारणीभूत आहे.

  -रुपेश वाळके
  उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोर्शी तालुका.