• Mon. Jun 5th, 2023

मुलं म्हणजे देवाघरची फुलं

    * त्यांना जसे आकार द्याल तसे ते घडेल

    प्रत्येक पालकांना वाटत असतं, आपल्या पाल्यात इतरांपेक्षा काहीतरी वेगळेपण असावं. तो प्रत्येक गोष्टीत अव्वल असावा. पण ब-याचदा आपल्या मनाप्रमाणे होत नाही. कारण ते आपलं अनुकरण करत असतात. आपल्या अनुकरणातूनच ते घडत असतात. प्रत्येक मुलाचे स्वतंत्र व्यक्‍तिमत्व असते. त्याला त्याच्या नैसर्गिक गुणांना अनुसरून प्रगती करण्यास मदत करायला हवी. प्रत्येक मुलाला त्याच्या नैसर्गिक कला गुणांचा विकास करू दिल्यास त्याला इतर मुलांच्या प्रगतीचा हेवा वाटणार नाही. प्रत्येक मुलावर सारखेच व त्याच्या अनुषंगाने प्रेम दाखवावे. वाईट वर्तन सुधारताना वा त्याला आवर घालताना आपणच ठरविलेल्या गोष्टी शिकण्याची त्याच्यावर सक्‍ती करु नये. त्याऐवजी त्याच्या वैयक्‍तिक गुणांचा सर्वोत्तम विकास कसा होईल याचे मार्गदर्शन करावे.

    मुलं अतिशय निरागस असतात. त्यांचं आयुष्य कोऱ्या पाटीप्रमाणे असतं. तुम्ही जे शिकवाल, जे संस्कार कराल त्यानुसार ते घडत असतात. मातीचा गोळा घडवण्यासाठी जसा कुशल कारागिर लागतो. अगदी तसंच लहान मुलं घडवण्यासाठी पालकांना देखील कुशल बनावं लागतं. पालकांनी काही गोष्टी फॉलो केल्या तर त्यांची मुलं कायमच अव्वल राहतील.

    लहानपणी मुलं खूप लाजाळू, मितभाषी आणि त्यांचं व्यक्तिमत्त्व थोडं वेगळं असतं. अतिशय गोड असलेली मुलं खूप निरागस असतात. बाहेरील जगाची फार ओळख नसताना या मुलांना घडवताना सुरुवातीला पालकांना थोडी मेहनत घ्यावी लागते. पालक म्हणून तुम्ही त्यांना घडवणार आहात. अशावेळी आपलं मुल अतिशय आत्मविश्वासू आणि अव्वल राहावं, असं प्रत्येक पालकांना वाटतं.

    प्रत्येक मुल वेगळं असतं. काही मुलं सुरुवातीपासूनच आत्मविश्वासाने भरलेली असतात. पण काही मुलं खूप शांत असतात. या मुलांवर पालकांना थोडी मेहनत घ्यावी लागते. अशावेळी नेमकं काय करायचं? हा प्रश्न पालकांना पडतो. तेव्हा तुम्हाला काही गोष्टी फॉलो करत मुलांना आत्मविश्वास द्यावा लागेल. यानंतर मुलांमधील बदल हा कौतुकास्पद असेल यात शंकाच नाही. प्रत्येकाकडून तुमच्या मुलाचं कौतुक झाल्याशिवाय राहणार नाही.मुल हे धडपडत शिकत असतं. त्यामुळे त्याच्या प्रत्येक कामाचं कौतुक करत चलावे. त्याच्यासोबत खंबीरपणे उभे राहावे. कारण प्रयत्न हे रत्न अतिशय महत्वाचं आहे. तुमच्या मुलाला बहुदा कोणत्याही गोष्टीत लगेच यश मिळणार नाही, पण त्याचं कौतुक करावे. त्याच्या प्रयत्नांमागे खंबीरपणे उभे राहावे.

    मुलं फार विचार करत नाहीत. ते स्वच्छंदी जगत असतात. परंतु जर त्यांना कोणत्याही गोष्टीशी स्वतःहून तडजोड करावी लागली तर त्यांना ते करू द्यावे. स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवण्यासाठी सोबत उभे राहावे. मग ते प्रश्न शाळेतील असो वा अगदी खेळण्यातील. फक्त पालक म्हणून तुम्ही त्यांच्यासोबत आहात ही भावनाच वेगळी असते. मुलांसाठी त्यांचे पालकच आदर्श असतात. त्यांना पाहूनच ही मुलं घडत असतात. अशावेळी तुम्ही तुमच्यासमोर काही ध्येय ठेवावे. जी ध्येय पाहून तुमची मुलं शिकतील. या ध्येयामध्ये तुमच्या मुलांचाही हातभार असू द्यावे. उदाहरणार्थ सकाळी लवकर उठणे, चालायला जाणे, छान गप्पा मारणे… या अगदी हलक्या फुलक्या ध्येयांनी मुलांना सवय लावावी. ही ध्येय वास्तववादी असल्यामुळे ती गाठताना मुलांना सत्याची जाणीव होईल.

    अपयश ही यशाची पहिली पायरी असते. लांब उडी घेण्यासाठी दोन पाऊलं मागे जावं लागतं. या दोन गोष्टी मुलांच्या मनावर बिंबवा. अपयश आलं म्हणजे संपल असं होत नाही. जी गोष्ट तुमच्यासाठी बेस्ट आहे, ती तुम्हाला मिळणारच. अशावेळी मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची नितांत गरज असते.लहान मुलं स्वच्छंदी असतात. मात्र आपणच अनेकदा त्यांच्यावर कळत नकळत चुकीचे संस्कार करत असतो. आनंद हा कोणत्याही गोष्टीत नसून तो त्यांच्यात लपला आहे. याची जाणीव त्यांना करून द्यावी. कारण आपला आनंद हा आपल्याच हातात आहे, याची जाणीव त्यांना खूप लहानपणापासूनच करून द्याल.

    शब्दस्पर्शी-सुनील शिरपुरे
    >कमळवेल्ली,यवतमाळ
    भ्रमणध्वनी-७०५७१८५४७९
    (Images Credit : Webdiuniya)

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *