“मी घडलो असा ” : भाष्करराव अरबट यांच्या जीवनकार्याचा आकृतीबंध !”

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    “मी घडलो असा ..! ” हे पाथ्रोट, ता.अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती येथील मुळ रहिवासी व आता अमरावतीच्या विद्युत नगरात वास्तव्यास असलेले.म.रा.वि.मंडळात 37 वर्षे कार्यकारी अभियंता म्हणून नोकरी करून सेवेतून सेवानिवृत्त झालेले प्रतिभावान साहित्तिक भाष्करराव जयरामजी अरबट यांचे आत्मचरीत्र आहे. माझी त्यांची आभासी दुनीयेतल्या फेसबुकवरून मैत्री झाली. तसे ते पुर्वीपासूनच त्यांच्या लेखन कार्यावरून मला परीचित होते.मागील वर्षी आँगष्ट महिण्यातच मी अमरावती येथील त्यांच्या घरी भेटीसाठी व माझे पुस्तक देण्यासाठी गेलो असता त्यांनी मला हे व इतर पुस्तके भेट दिले होते. विविध विषयावर बरीच चर्चा झाली. ब-याच दिवसाचे लिहायचे राहून गेले होते.

    भाष्करराव अरबट यांचे “मी घडलो असा” या आत्मचरीत्राचे प्रकाशन मुक्ता प्रकाशन, अकोला यांनी केले आहे . 286 पानाचे हे पुस्तकाची स्वागतमूल्य 250/- रुपये आहे. अरबटसाहेबांनी आजपर्यंत विविध प्रकारात साहित्य लिहिले आहे. “विश्वाचे आर्त “(कवितासंग्रह), “आयुष्यावर बोलू काही” (कथासंग्रह), “आयुर्रंग”(कथा)., “अंतर्नाद” (कथा), झपुर्जा (कविता) , अग्नीपथ (कादंबरी), बारोमास (कविता), “अर्थ वादळात समाजव्यवस्था, औष्णिक ऊर्जा आणि पर्यावरण नाश “(लेखांक संग्रह), “अखेरचा निरोप “(ललितबंध ), ” राष्ट्रसंत, मानवधर्म व भजनबोध “(लेखांकसंग्रह), “ओम सुर्याय नमः एक ऊर्जा जागर “(लेखांकसंग्रह), “स्त्री युगाची नांदी” ( लेखांकसंग्रह), ” जागतिकिकरणातील कृषक आत्महत्या(लेखसंग्रह) आणि “मी असा घडलो”( आत्मचरीत्र ). इत्यादी विविध प्रकारचं साहित्य त्यांनी प्रसविलं आहे . एक विज महामंडळात नोकरी करणारा माणूस एवढं साहित्य लिहू शकतो ? मला ही बाब खरच कौतुकास्पद वाटते. ते आठव्या वर्गात असतांना त्यांनी पहिली कविता लिहिली असल्याचं सांगतात. हा वारसा बहुतेक त्यांच्या वडीलांकडून आला असावा. त्यांचे वडील जयरामजी अरबट यांनी माँरीस काँलेज, नागपूर येथे शिक्षण घेतले होते . आणि राष्ट्रसंत तुकडोजी महारांजाच्या चळवळीत काम करायचे .ते प्रबोधनकारी होते. लहानपणापासूनच घरी धार्मीकवृत्तीचे वातावरण जोपासले गेले असल्याने बरेचशे संस्कार त्यांना कुटुंबाकडूनच प्राप्त झाले.

    भाष्करराव अरबट यांचा जन्म दि. 24/8/1942 ला पाथ्रोट, जि. अमरावती येथील जयरामजी अरबट व शांताबाई अरबट यांच्या पोटी झाला. त्यांचा विवाह पुष्पाताईसोबत 12 मे 1966 साली झाला. त्यांना तीन मुले व एक मुलगी आहे. दि. 4 एप्रील 1964 साली त्यांची अंजनगाव सुर्जी येथे सहायक अभियंता म्हणून म.रा.वि.म. विभागामध्ये नियुक्ती झाली होती. त्यांच्या मुळ गाव पाथ्रोटपासून सहा कि.मी. अंतरावरच अंजनगाव सुर्जी होते. त्यांना घरूनच ये-जा करता येत असल्याने ते आनंदात होते.

    पत्नी पुष्पाताईंनी त्यांना पावलोपावली भरपूर साथ दिली. ते त्यांच्याविषयी भरपूर लिहीताना दिसतात. परंतु त्यांच्या संसारातील हा गोडवा नियतीला कदाचित अधिक मान्य नसावा आणि पत्नी पुष्पाताई यांचे 2014 साली दुःखद निधन झाले. पत्नी गेल्यावर त्यांनी स्वतःला लेखन कार्यात गुंतवून घेतले. ते पुर्वीपासूनच वृत्तपत्रातून विविध सामाजीक प्रश्नावर लिहू लागले. अनेक समस्यांना ते वाचा फोडू लागले . सरकारी नोकरीत असतानाही त्यांनी कशाचीच तमा केली नाही. कोणी काहीही म्हणो ते झपाटल्यासारखे लिहित होते. 37 वर्षाच्या सेवेनंतर ते 31 आँगष्ट 2000 साली आपल्या नोकरीतून सेवानिवृत्त झाले . या काळात त्यांनी अंजनगाव सुर्जी, पुसद, अमरावती, उमरखेड, चंद्रपूर इत्यादी ठिकाणी सेवा दिली. या काळात त्यांना अनेक अनुभव आले. ते प्रामाणीक व भ्रष्टाचारमुक्त जीवन जगत असतांना समाजातील घटनांवरून जे अनुभवलं आले त्यांना शब्दबद्ध करीत गेले. आयुष्यातील अनेक घडामोडींचा आढावा घेत विविध पैलूंचा या पुस्तकात उलगडा केला आहे. ते पुरोगामी विचाराचे असून अंधश्रद्धाळू मुळीच नाहीत. ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांच्या वैचारीक चळवळीत कार्यरत असतात. त्यांनी नोकरी काळात बघितलेले ढोंगी बुवा बाबांचे प्रसंग आपल्या आत्मचरीत्रात लिहिलेले आहेत. वाठोडा (शुक्लेश्वर ) येथील एका ढोंगी बुवाचा प्रसंग त्यांनी फार चांगल्या प्रकारे शब्दबद्ध केला आहे.

    त्यांनी अनेक साहित्य संमेलनास हजेरी लावली. दुबईतील शब्द साहित्य संमेलन असो की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असो . व-हाडी साहित्य संमेलन असो आणखी कोणतेही तेथे आवर्जून जातात. अनेक साहित्तिकांशी त्यांची मैत्री झाली. प्रसिद्ध गझलकार सुरेश भट, देविदास सोटे, मधुकर केचे यांच्या साहित्तिक आठवणींना त्यांनी उजाळा दिला आहे .सुरेश भटसाहेबांचा “एल्गार” हा काव्यसंग्रह ज्या अरविंद पाटील ढवळे यांना अपर्ण केला ते पाथ्रोडचे आहेत असे ते सांगतात. अलीकडची साहित्तिक मंडळीशीही ते चांगले परिचित आहेत. डाँ.सतीश तराळ, प्रतिमाताई इंगोले यासारखे अनेक साहित्तिकांशी जिव्हाळ्याचे संबंध जुळलेले आहेत.

    या पुस्तकात एकूण 95 प्रकरणे आहेत . प्रेरणा, अर्धागिनी, पिताश्री, माय, बालपण, माझे गाव, सखा, जीवनमृत्यू, पसायदान, कायदे नियम, प्रयण रंग, गणगोत, कर्मयोग, अतृप्तता, कारागृही, राष्ट्रसंतांचे अखेरचे दर्शन, हिमालयाच्या कुशीत, बालाजी दर्शन, दार्जीलींग, उल्फा उत्पात, हावडा ब्रीज, आभाळमाया, राष्ट्रपिता, सापुतारा, बहिरमची यात्रा, राणी पद्मावती, अरण्य रुदन अशी भरपूर स्थळांची माहितीचाही आढावा त्यांनी यात घेतला आहे. व-हाडी बोलीभाषेचीही त्यांना फार आवड आहे. ते आपले अनुभव, कविता, कथा, गोष्टी, अभंग मोबाईलवरील फेसबुक, व्हाट्स अँप या आभासी दुनीयेतून वाचकांपर्यत पोहचवित असतात . आणि तेवढ्याच प्रेमाने दुस-यांच्या लेखणालाही भरभरून दाद देत असतात. त्यांना या लेखन कार्यासाठी अनेकदा विविध संस्थाकडून पुरस्कृत केले आहे. व-हाडी कट्टा या साहित्य समूहाद्वारे त्यांना पुष्पराज गावंडे लिखीत ” यलाई पुरस्कारानेही ” मागील वर्षी सन्मानीत करण्यात आले आहे .त्यांचे भरपूर साहित्य विविध वृत्तपत्रातून, साप्ताहीकातून,मासीकातून, दिवाळी अंकातून, प्रकाशीत झाले आहे. त्यांनी भारतभर सहा वेळा भारतभ्रमणाचे दौरे केले आहेत. त्यांचं लेखन हे आजही सामाजीक, राजकीय विषयावर सुरूच असते . त्यांना समाजातील कोणत्याही घटकावर झालेला अन्याय, अत्याचार सहन होत नाही . त्यावर आपले परखड व सडेतोड मत ते नोंदवित असतात. ते निडर व कणखर स्वभावाचे धनी आहेत. ते शिस्तबद्ध स्वभावाचे आहेत. नोकरी काळात त्यांनी नियमानुसारच कामे केली आहेत.

    त्यांनी लिहिलेल्या ” मी घडलो असा ” हे आत्मचरीत्र वाचताना एक विशेष बाब लक्षात येते ती ही की, प्रत्येक प्रकरणाचे शीर्षक हे सिनेमातील असो वा भावगीत मराठी, हिंदी गाण्यातील ओळीचे दिलेले आपल्याला आढळून येथे . जसे, ” मेंदीच्या पानावर मन अजून झुलते ग “, “छोटासा घर हो बादलोकी छाँंव में “, गंगा यमुना, प्रयण रंग, युर नर्तन, कोई लौटा दे मुझे प्यारे प्यारे दिन, जय मातादी, गीत गाया पत्थरोने, जिंदगी के सफर में, चंद्रपुरची आठवण सांगताना, “खोया खोया चाँंद खुला आसमान “, चुपके चुपके, चल चल मेरे साथी, हम पंच्छी एक डालके, गाडी बुला रही है . इत्यादीसह अनेक मजेशीर शीर्षक या पुस्तकातील प्रकरणांना दिले आहेत . प्रत्येक आठवण लिहितांना तेथे गीताच्या किंवा कवितेच्या चार ओळी आपल्याला लिहिलेल्या दिसतात. यावरून 78 वर्षीय अरबटसाहेबांना सिनेमाची, गीतांची, कवितेची, साहित्याची किती आवड आहे..! हे आपल्या लक्षात येते . त्यांनी नोकरी काळात विविध गावात राहून आयुष्याचा खरतड प्रवास केलेला आहे. पण मनाने ते खंबीर आहेत. मोठमोठ्या दुर्रधर आजारावरही त्यांनी मात करून आजही सुखरुप आहेत.

    त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक आठवणींमध्ये गीत, भक्तीसंगीताचा, साहित्याचा रंग भरलेला दिसतो. अमरावती येथील विविध संघटनांशी ते जुडलेले असून पदाधिकारी आहेत. त्यांच्या लेखनातील विचार भावी पिढीला मार्गदर्शक ठरणारे आहेत. दरवर्षी त्यांचा काहीना काही समाजोपयोगी उपक्रम सुरूच असतो . यावर्षी मात्र कोरोणाच्या संकटामुळे साहित्य संमेलने आयोजीत न करता आल्याने भेटीगाठी मंदावल्या आहेत. पण घरबसल्या त्यांची साहित्य चळवळ अविरत सुरू आहे. त्यांची साहित्य संपदा ही प्रेरक आहे. आज ते आपल्यात नाहीत. दि.8/7/2022 रोजी 3 वाजता त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली…!

    -अरूण विघ्ने
    आर्वी, जि.वर्धा