• Mon. Jun 5th, 2023

भविष्य की अंतर्वस्त्र-नीट परीक्षेत विद्यार्थिनींचे मानसिक खच्चीकरण..!

    * ब्रा काढणार नसाल तर परीक्षेला बसता येणार नाही..!

    नुकतीच १७ जुलैला देशभरात वैद्यकिय प्रवेशासाठीची नीट परीक्षा पार पडली आणि या परीक्षेदरम्यान घडलेल्या एका घटनेमुळे देशभरात सध्या एकच कल्लोळ सुरू झाला आहे. ही घटना केरळमध्ये घडली आहे. केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील मार थोमा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या एका खाजगी शैक्षणिक संस्थेत नीट परीक्षा देण्यासाठी गेलेल्या विद्यार्थिनींना चक्क त्यांच्या ब्रा काढायला लावल्या गेलं.

    ही बाब समोर आली तेव्हा परीक्षेसाठी गेलेल्या १७ वर्षाच्या एका मुलीच्या वडिलांनी याबाबतीत पोलिसांत तक्रार केली. गोपाकुमार सुरनाड असं तक्रार दाखल करणा-या व्यक्तीचं नाव आहे. सुरनाड यांची १७ वर्षाची मुलगी पहिल्यांदाच नीट परीक्षेला बसली होती. जेव्हा ते परीक्षा केंद्रावर पोहोचले, तेव्हा खूप आत्मविश्वासाने त्यांच्या मुलीने केंद्रात प्रवेश केला. त्यानंतर गोपाकुमार आणि त्यांची पत्नी जेवन करण्यासाठी म्हणून निघाले असता त्यांना ‘माहिती तंत्रज्ञाना’चा कॉल आला आणि त्यांनी गेटवर त्यांना बोलावलं.

    जेव्हा ते जोडपं गेटवर पोहोचले, तेव्हा त्यांची मुलगी गेटवर दिसली आणि ती रडवेली झाली होती. मात्र, तिने स्वत:ला आवरत सांगितलं की, सेंटरमध्ये प्रवेश करताना जेव्हा तपासणी केली जात होती, तेव्हा सगळ्या विद्यार्थिनींना त्यांच्या ब्रा काढून टाकायला सांगितलं गेलं. म्हणून पेपर सोडवताना तिला अंगावर ओढण्यासाठी शाल हवी होती. गोपाकुमार यांच्या पत्नीने लगेच मुलीला शाल दिली आणि विद्यार्थिनी परत आत गेली. तिच्या पालकांना वाटलं की सर्व ठिक होईल.

    पण जसा पेपर संपला आणि त्यांची मुलगी बाहेर आली, तशी ती आईच्या कुशीत शिरून रडायला लागली. तिने सांगितलं की ब्रा नसल्यामुळे तिला खूप अस्वस्थ वाटत हातं. एकतर तिची ब्रा काढून घेण्यात आली होती, त्यात परीक्षा केंद्रावर सुपरव्हिजनसाठी बहुतांश पुरुष होते. ३ तास ब्रा शिवाय बसणं, त्यातही आजूबाजूला परीक्षा देणारे मुलं देखिल होते. त्या सर्वांच्या नजरा मुलगी चुकवत होती. त्यामुळे विद्यार्थिनीला पेपरकडे लक्ष केंद्रित करता आलं नाही, असं विद्यार्थिनीने पालकांना सांगितलं.

    विद्यार्थिनींनी ब्रा काढण्यास नकार दिला होता. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जो ड्रेसकोड निश्चित केला आहे त्यात याचा उल्लेख नव्हता, असं त्या म्हणाल्या. मात्र, त्यांच्या ब्राला मेटलचे हुक असल्याने मेटलची कोणतीही गोष्ट आत नेण्यास नियमानुसार मनाई आहे, असं त्यांना सांगितल्या गेलं. जर ब्रा काढणार नसाल तर परीक्षेला बसता येणार नाही, असं देखील म्हटल्या गेलं. शिवाय त्यांनी सांगितलं की, सेंटरच्या दोन रूमांमध्ये त्यांच्या ब्रा एकमेकांवर रचण्यात आल्या होत्या. म्हणजे कोविड-१९ प्रोटोकॉलचं उल्लंघन करण्यात आलं होतं.

    ही घटना फक्त गोपाकुमार सुरनाड यांच्या मुलीसोबतच घडलेली नाही, तर इतर अनेक विद्यार्थिनी अशाच रडत, अस्वस्थ मनस्थितीत पेपर देऊन बाहेर आल्या होत्या. अनेक मुली चेहरा देखील वर करत नव्हत्या आणि काहीच बोलत नव्हत्या. मुलींची अवस्था बघून आणि झालेला प्रकार ऐकून संतापलेल्या गोपाकुमार यांनी कोट्टारक्कारा पोलीस उपअधिक्षक कार्यालयात जाऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी कार्यवाही करत भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ आणि ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसंच मानवी हक्क आयोगाने कोल्लम ग्रामीण एसपींना या प्रकरणाची चौकशी करून १५ दिवसाच्या आत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

    एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी म्हणजे नीट सारख्या देशपातळीवरील परीक्षेदरम्यान घडणारी अशी घटना खूप निंदनीय ठरते. म्हणून नक्की अशा परीक्षांसाठी ड्रेस कोड का देण्यात येतो? ड्रेस कोडचा नियम काय असतो? आपण शाळेत पेपर द्यायला जायचं, तेव्हा शिक्षक खूप तपासणी करून वर्गात पाठवायचे. अशात देशपातळीवरील परीक्षांसाठी खूप कडक नियम असतात. कुठल्याही प्रकारे चीटिंग सारखे गैरप्रकार होऊ नये म्हणून दक्षता घेतली जाते. म्हणून विशेष प्रकारचा ड्रेस कोड विद्यार्थ्यांना दिला जातो. हा पोशाख असा ठरवण्यात येतो, ज्याद्वारे कुठलीही चिठ्ठी, मायक्रोफोन लपवायला जागा राहणार नाही. नीट २०२२ साठी देण्यात आलेल्या ड्रेस कोडमध्ये विद्यार्थ्यांना लांब बाह्यांसह हलके कपडे घालण्याची परवानगी नाही. शूज घालता येणार नाही. त्याऐवजी कमी टाच असलेल्या चपला आणि सँडल घालता येतील, असं नमूद आहे.

    कागद, पेन्सिल बॉक्स, प्लास्टिक पाउच, पेन, कॅल्क्युलेटर, स्केल, रायटिंग पॅड, पेन ड्राइव्ह, इरेझर्स आणि लॉग टेबल या सारख्या गोष्टी आत घेऊन जाता येत नाही. मोबाइल फोन, इअरफोन, पाकीट, गॉगल्स, घड्याळ, ब्रेसलेट, कॅमेरे अशा सगळ्यांवर बंदी आहे. कोणत्याही प्रकारच्या मेटल वस्तूंना आत प्रवेश दिला जात नाही. कारण याद्वारे मायक्रोफोन विद्यार्थी सोबत आणू शकतात, असं सांगण्यात येतं. पण मेटल हुक्स असलेले अंतर्वस्त्र, ब्रा घालता येतील की नाही, याबद्दल कुठलाच उल्लेख या ड्रेस कोडच्या नियमांमध्ये दिसत नाही.

    जेईई मेन्स, जेईई ॲडव्हान्स्ड आणि सीयूईटी-यूजीसाठी ब-याच प्रमाणात सारखेच नियम आहेत. पण जेईई मेन्स आणि सीयूईटी साठी लॉंग स्लीव्ह्ज आणि शूजचं बंधन नाही. जेईई ॲडव्हान्स्डसाठी विद्यार्थ्यांना तावीज, अंगठी, ब्रेसलेट, इअररिंग्स, नोज पिन, नेकलेस, पेंडंट, बॅज, ब्रोच, मोठी बटणं असलेले कपडे अशा मेटल असलेल्या वस्तू घालण्यास मनाई करण्यात आली आहे. तर शूज ऐवजी चप्पल आणि सँडल घालण्यास सांगितलं जातं.

    अशाप्रकारे मेटल हुक असल्याचं सांगून विद्यार्थिनींना ब्रा काढून टाकायला सांगितल्या गेलं. डेक्कन हेराल्ड या वृत्तसंस्थेला काही विद्यार्थिनींनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहे. “आम्हाला ब्रा काढून वर्गात बसावं लागलं. वर्गात प्रवेश करताना खूप विचित्र वाटत होतं. तिथं मुलं सुद्धा होते. अनेक मुली आपल्या केसांच्या मदतीने छाती लपवण्याचा प्रयत्न करत होत्या. आमच्या ब्रा काढून त्या एका टेबलवर ठेवण्यात आल्या होत्या. परीक्षा संपल्यानंतर तिथे जाऊन प्रत्येकाला आपली ब्रा शोधून घ्यायची होती. ही खूप जास्त लाजिरवाणी गोष्ट होती. घरी सुद्धा आम्ही ब्रा घालून राहतो. बाहेर जाताना तर जास्त दक्षता घेतली जाते. अशाप्रकारे अचानक ब्रा काढायला लावणं आमच्यासाठी भयानक होतं. आम्ही अगदी काहीच घातलं नाही असं वाटत होतं. त्यामुळे पूर्णवेळ लक्ष या गोष्टीकडे होतं की, कुणी बघत तर नाही ना. या विचाराने खूप भीती वाटत होती.”

    या प्रकरणावरून मार थॉमस इन्स्टिट्यूट ऑफ इन्फार्मेशन ॲन्ड टेक्नॉलॉजी या परीक्षा केंद्राच्या वतीने स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. ‘संस्थेचा यात कुठलाही सहभाग नाही. एनटीएने ज्या एजन्सीला विद्यार्थ्यांची झडती घेण्याचं काम दिलं होतं, त्या एजन्सीचे कर्मचारी जबाबदार आहेत’, असं केंद्राच्या प्रवत्यांनी सांगितलं आहे. तर एनटीएने देखील निवेदन जारी केलं आहे. त्यात म्हटलं आहे की, त्यांनी परीक्षा केंद्राचे अधीक्षक, स्वतंत्र निरीक्षक तसंच नीटचे कोल्लम जिल्ह्यातील शहर समन्वयक यांच्याकडून या प्रकाराबद्दल माहिती मागवली आहे. त्यांच्याकडे परीक्षेच्या वेळी किंवा त्यानंतर लगेचच कोणतीही तक्रार दिल्या गेली नाही, असं म्हटलं आहे. तर एनटीएला देखील या संदर्भात कोणताही ईमेल किंवा तक्रार प्राप्त झालेली नाही, असं सांगण्यात आलं आहे.

    केरळच्या उच्च शिक्षणमंत्री आर बिंदू यांनी “एजन्सी आणि त्यांच्या कर्मचा-यांकडून गंभीर चूक झाली आहे. मुलींच्या मूलभूत मानवी हक्कांचा विचार न करता त्यांच्याविषयी असा दृष्टिकोन बाळगण्यात आला आहे, हे अत्यंत निंदनीय आहे.” असं म्हणत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना एक पत्र लिहून विद्यार्थिनींना त्यांच्या ब्रा काढण्यास भाग पाडणा-या एजन्सीच्या विरोधात कार्यवाही करण्याची जोरदार मागणी केली आहे.

    तसं बघितलं तर केरळमध्ये अशा प्रकारची घटना काही पहिल्यांदाच घडलेली नाही. मे २०१७ मध्ये म्हणजे ५ वर्षापूर्वी केरळच्या कन्नूरमध्ये एक विद्यार्थिनी सकाळी ८ वाजता परीक्षा केंद्रावर पोहोचली. तिने स्लीव्हलेस टॉप आणि काळ्या रंगाची ट्राऊजर घातली होती. तेव्हा डार्क कलर चालत नाही म्हणत तिला आत प्रवेश दिला नाही. रविवार असल्यामुळे सगळे दुकान बंद होते. वेगळ्या रंगाची पॅन्ट शोधण्यासाठी तिच्या आईला जवळपास २ किलोमीटर पायपीट करावी लागली. शेवटी पॅन्ट चेंज केल्यानंतर ती आत गेली. मात्र त्यावेळी मेटल डिटेरेक्टर वाजलं. तिच्या ब्राला मेटल हुक होतं हे समजल्यावर तिला ती सुद्धा काढायला लावली. त्या विद्यार्थिनीने वर्गाच्या एका कोप-यात जाऊन ब्रा काढली आणि गेटवर उभ्या असलेल्या आईकडे दिली. तिच्या आईच्या चेह-यावरील भाव बघून विद्यार्थिनी अजूनच निराश झाली होती. त्यावेळी चार शिक्षकांना सस्पेंड करण्यात आलं होतं.

    २०१८ साली देखील केरळमध्येच पल्लकड जिल्ह्यात एका मुलीला परीक्षा केंद्रावर ब्रा काढण्यास सांगण्यात आलं. पेपर लिहिताना सुपरवायजर सातत्याने तिच्याकडे पाहत होता. म्हणून तिचं लक्ष लागलं नाही, असं सांगण्यात आलं होतं. म्हणजेच अशाच प्रकारची ती तिसरी घटना केरळमध्ये घडल्याचं दिसत आहे. गेल्या दोन वेळा ठोस कार्यवाही झाली असं दिसत नाही. मात्र, यावेळी कार्यवाही केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे. पोलिसांनी त्या परीक्षा एजन्सीच्या लोकांचा तपास देखील सुरू केला आहे.

    मात्र, यातून एक महत्त्वाचा मुद्दा राहतो की, ज्या विद्यार्थिनींचं यामुळे नुकसान झालं आहे, त्यांचं काय? एकतर घडलेल्या प्रकारामुळे त्यांना निट पेपर सोडवता आला नाही. म्हणून या परीक्षेच्या निकालावर त्याचा परिणाम होणार आहे. तर दुसरं म्हणजे मुलींच्या मानसिकतेवर जो परिणाम झाला आहे, त्याचं काय? त्या मेंटल ट्रामा मधून बाहेर यायला अनेकांना वेळ लागू शकतो. कदाचित पुढच्या वेळी परीक्षेला जाताना अनेकजणी घाबरू शकतात. महिलांसाठी ब्रा ही खूप खाजगी गोष्ट असते. ब्रा काढून घेणं अनेकांसाठी आत्मविश्वास काढून घेण्यासारखं झालं असेल. त्यात या सर्व विद्यार्थिनी १७ ते २३ वयोगटातील होत्या. म्हणजे कमी वयात अशा प्रकारच्या वागणुकीमुळे त्यांच्यात असुरक्षिततेची भावना बळावू शकते. केरळमधील या घटनेने मुलींचं मानसिक खच्चीकरण केलं आहे. एक प्रकारे त्यांचा छळ करण्याचाच हा प्रकार आहे, म्हणून यासंदर्भात कठोर पाऊल उचललं जावं अशी देशभरातून मागणी केली जात आहे. तेव्हा हे प्रकरण आता कोणतं वळण घेईल? हे बघणं गरजेचं आहे.

    शब्दस्पर्शी-सुनील शिरपुरे
    कमळवेल्ली,यवतमाळ
    भ्रमणध्वनी-७०५७१८५४७९
    (छाया : संग्रहित)

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *