पुण्यातील शाळकरी मुलीवरील अत्याचाराच्या घटनेबाबत त्वरित चौकशी आणि कार्यवाहीचे निर्देश – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    मुंबई, : कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटनेबाबत कसोशीने तपास करून आरोपींवर कठोर कारवाई होण्यासाठी पावले उचलण्याच्या सूचना पुण्याचे पोलीस आयुक्त यांना आज विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्राद्वारे दिल्या आहेत.

    या अनुषंगाने वाहतूक पोलीस व पुणे परिवहन विभाग यांनी संयुक्तरित्या स्कूल बसेसमध्ये नेमण्यात आलेले परिचारक ,वाहनचालक व मदतनीस यांची चारित्र्य पडताळणी करावी. या नेमणुकाबाबत काय कार्यवाही झाली, याबाबत माहिती सादर करण्याचे निर्देश उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना दिले आहेत.

    भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून राज्यातील सर्व शहरी आणि ग्रामीण भागात व शालेय बस वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे तसेच प्रत्येक बसमध्ये महिला परिचारक नेमणे याबाबत माहिती देण्याचे निर्देश डॉ. गोऱ्हे यांनी या पत्राद्वारे परिवहन विभागाला दिले आहेत. स्त्री आधार केंद्राच्यावतीने या पीडीतेची विचारपूस करण्यासाठी सामाजिक कार्यकत्यांनी तिची आज रुग्णालयात जाऊन भेट घेतली. पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये बलात्कारासह पोक्सो अॅक्टअंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.