• Fri. Jun 9th, 2023

पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करा – माजी राज्यमंत्री तथा आमदार प्रवीण पोटे पाटील

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. नवे जलशुद्धीकरण केंद्र अद्याप सुरू झाले नाही. त्याबाबत कार्यवाही व्हावी. शहराची भविष्यात वाढती लोकसंख्या पाहता शहरात अमृत योजनेतून नवीन टाक्या प्रस्तावित कराव्यात, असे निर्देश माजी राज्यमंत्री तथा आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे दिले.

    अमरावती शहरातील पाणीपुरवठा व जिल्ह्यातील विविध विषयांबाबत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी पवनीत कौर, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल, उपजिल्हाधिकारी राम लंके, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, मनपा उपायुक्त हर्षल गायकवाड व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.आमदार श्री. पोटे पाटील म्हणाले की, जलवाहिन्या वारंवार फुटून पाणीपुरवठ्यात अडथळे येतात. त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा. आवश्यक निधीबाबत प्रस्ताव सादर करावा. भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण करावे. शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांची माहिती सादर करावी. आपण शासन स्तरावर त्याचा पाठपुरावा करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

    शहरातील स्वच्छतेचा आढावाही त्यांनी घेतला. ते म्हणाले की, शहरात ठिकठिकाणी कच-याचे ढीग आढळतात. कंटेनरच्या बाजूला मोठ्या प्रमाणात कचरा आढळतो. पावसाळ्यात त्यामुळे रोगराई पसरते. त्यामुळे धूरफवारणी, नियमित स्वच्छता करावी. झोननिहाय नियोजन करून स्वच्छता कामे नियमित राबवा. ‘महावितरण’नेही वीजेची वाढती मागणी व शहराचा विस्तार लक्षात घेऊन नवीन फीडर, जास्त क्षमतेची यंत्रणा कार्यान्वित करावी.जिल्ह्यातील कृषी कर्जवाटपाचा आढावा त्यांनी घेतला. खासगी बँका शेतक-यांना कर्ज देत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्याबाबत कार्यवाही व्हावी. एकही पात्र शेतकरी कर्ज मिळण्यापासून वंचित राहता कामा नये. अतिवृष्टीने जिल्ह्यात पीकांचे नुकसान झाले आहे. त्याचे व्यवस्थित पंचनामे करून शेतकरी बांधवांना मदत मिळवून द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

    ते पुढे म्हणाले की, शेतकरी बांधवांना अर्ज करूनही शेतनकाशे वेळेत मिळत नाहीत. त्यामुळे त्यांना येरझारा कराव्या लागून वेळ व पैसा खर्च होतो. शेताच्या मोजणीच्या प्रकरणांचा निपटारा लवकर होत नाही. पीआर कार्ड नसल्याने अनेक व्यक्तींना घरकुलाचा लाभ मिळत नाही. भूमी अभिलेख कार्यालयाबाबत अनेक तक्रारी येत असतात. याबाबत तत्काळ कार्यवाही व्हावी. नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करावे.अमरावती, बडनेरा, यवतमाळ व अकोल्याकडे जाणा-या रस्त्यावरील रेल्वेलाईनवरील पूलाच्या बांधकामाबाबत प्रस्ताव पाठवावा. मनरेगातून पांदणरस्ते निर्मितीची कामे राबवावीत. जलसंधारणाची कामे गतीने व्हावी. अनुकंपा तत्वावरील पदभरती वेळेत व्हावी. नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांचे वय झाल्याने नोकरीत प्राधान्य मिळत नाही. कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर असते. हे लक्षात घेऊन अनुकंपा पदावरील भरती वेळेत व्हावी, असे निर्देश त्यांनी दिले.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *