- * विभागप्रमुखांनी प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल देण्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश
- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : मेळघाटातील पाचडोंगरी आणि कोयलारी गावात दूषित पाण्याने अनेकांना बाधा झाल्याप्रकरणी कोयलारी येथील ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आले असून, चिखलद-याच्या गटविकास अधिका-यांसह विस्तार अधिकारी व सरपंच यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. या क्षेत्रात साथरोग नियंत्रणासाठी विभागप्रमुख, तसेच अधिकारी-कर्मचा-यांच्या पथकाने गावांना प्रत्यक्ष भेट देऊन व्यक्तीश: समक्ष अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले आहेत.
- संबंधितांवर कारवाई
जि. प. सीईओ श्री. पंडा यांनी स्वत: कोयलारी येथे जाऊन पाहणी केली. याप्रकरणी जबाबदार असलेल्यांवर जि. प. प्रशासनाने केलेल्या कारवाईत कोयलारी येथील ग्रामसेवक विनोद सोळंके यांना तत्काळ निलंबित करण्यात आले. विस्तार अधिकारी (पंचायत) रमेश मेश्राम यांना नोटीस देण्यात आली आहे. चिखलद-याचे गटविकास अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावून 24 तासांच्या आत स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे. तसेच कोयलारीचे सरपंच यांना 39 (1) अंतर्गत कारवाई का करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावण्यात आली आहे.
- गावात स्वतंत्र कक्षात उपचार सुरू
या दोन्ही गावांत व परिसरात वैद्यकीय अधिकारी व आरोग्य पथक दाखल होऊन जिल्हा परिषद शाळेत एकलन कक्ष उघडण्यात येऊन रूग्णांवर तातडीने उपचार करण्यात आले. आरोग्य कर्मचा-यांद्वारे घरोघरी पाण्याचे शुद्धीकरण, रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींवर औषधोपचार, विहिरीच्या पाण्याचे शुद्धीकरण व पाण्याच्या नमुन्यांची तपासणी सुरू आहे. पाचडोंगरी येथे 265 व कोयलारी येथे 45 सहवासितांवर औषधोपचार करण्यात आले. गावांमध्ये रिंगल लॅक्टेड, नॉर्मल सलाईन, फ्युराझोलाडियन टॅबलेटस् व सिरप, टेट्रासायक्लिन कॅप, सेप्ट्रॉन गोळ्या व सिरप, ओआरएस आदी पुरेसा औषधसाठा ठेवण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन आहे. धारणी येथे पाणीपुरवठा अभियंत्याच्या उपस्थितीत ग्रामसेवकांची बैठक होऊन परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे.
- विभागप्रमुखांना प्रत्यक्ष भेटी देण्याचे निर्देश
साथरोग नियंत्रणासाठी विभागप्रमुखांनी विस्तार अधिकारी व इतर अधिकारी- कर्मचा-यांसह गावांना पुढील काही दिवस प्रत्यक्ष भेटी देऊन आवश्यक उपाययोजना, आरोग्यविषयक बाबींचा आढावा, पाणी व स्वच्छता याबाबत आवश्यक दक्षता यासंबंधीचा अहवाल व्यक्तीश: समक्ष अहवाल सादर करण्याचे आदेश सीईओ श्री. पंडा यांनी दिले आहेत. गावांना प्रत्यक्ष भेटी देण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) तुकाराम टेकाळे, उप मु. का. अ. (नरेगा) प्रवीण सिनारे, उप मु. का. अ. (पावस्व) श्रीराम कुळकर्णी, उप. मु. का. अ. (मबाक) कैलास घोडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परिस्थितीचा वेळोवेळी आढावा घेतला जात असून, आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.