• Mon. Jun 5th, 2023

‘कभी’ ना जाओ छोडकर…

    प्रतिभा अथवा कुठलीही कला ही अंगीभूत असायला हवी. शिक्षण, प्रशिक्षणातून तिला पैलू पाडता येतील, पण ती निर्माण करणं निव्वळ अशक्यच. हे निसर्गाच वाण असतं. सरसकट सर्वांनाच ते मिळत नसतं. अमृतसर जिल्ह्यातल्या कोटरा सुलतान सिंग गावात 24 डिसेंबर, 1924 रोजी जन्मलेल्या बालकाला मात्र, निसर्गाची ही कृपा भरभरून लाभली. बालपणी घरा समोर येणाऱ्या फाकिराच्या गायकी वर फिदा झालेला छोटा ‘फिको’ दूर पर्यंत त्याच्या मागे मागे जात असे. पुढे परिवार लाहोरला स्थानांतरित झाल्यावर बारा – तेरा वर्षांचा फिको मोठ्या भावाला केशकर्तनालयात मदत करता करता गाणी गुणगुणत ग्राहकांचं मनोरंजन करीत असे. त्या काळी लोकप्रिय असलेले गायक अभिनेता कुंदनलाल सहगल त्याच्या आदर्श स्थानी होते. योगायोगाने त्यांचे एका कार्यक्रमा निमित्त आकाशवाणी लाहोर इथं येणं झालं. आपल्या मोठ्या भावा मागे लाकडा लावून फीको सहगल यांचं गायन ऐकायला गेला आणि गायन सादर करून परतला. कारण ऐनवेळी वीज गेल्यानं सहगल यांनी गायला नकार दिला. इथेच फिकोच भाग्य फळफळलं. परिस्थिती सांभाळण्यासाठी आयोजकांनी त्याला गाण्याची संधी दिली. फीको नी उपस्थित रसिकांची मनं तर जिंकलीच खुद्द सहगल साहेबही प्रसन्न होऊन एक दिवस खूप मोठा गायक होशील असा आशीर्वाद देऊन गेले. याच कार्यक्रमाला संगीतकार श्यामसुंदर पण उपस्थित होते. त्यांनीच संगीत दिलेल्या ‘गुल बलोच’ या पंजाबी चित्रपटासाठी फिकोनं पहिलं गीत गायलं. हा फिकोच चित्रपट सृष्टीत पुढे मोहम्मद रफी म्हणून अजर झाला. बॉलीवूड संगीतविश्वात आपलं नाव अजरामर करून गेला.

    मोहम्मद रफींच्या गळ्याला अष्टपैलूत्व लाभलं होतं. कुठल्याही मानवी भावनेचा आविष्कार रफी सहजतेने आकारायचे. प्रेम कूजन, विरह व्याकुळता, सौंदर्य वर्णन असो किंवा प्रभुभक्ती, देशभक्ती असो तसच गीत, गझल, नज्म अथवा कव्वाली किंवा भजन, भाव संगीत वा शास्त्रीय संगीत, रफी अश्या बहुविधतेला आपल्या गळ्यानं नटवण्यात, सालंकृत करण्यात तरबेज होता. गीताचे शब्द आपल्या स्वर सूत्रात ओवून, मोतियाचा सुंदरसा गोफ रफी अलवारपणें रसिकांना सुपूर्द करायचा.

    ‘मधुबन मे राधिका नाचें रे’, ‘अजहुन आये बालामा सावन बिता जाये’, ‘मन तडपत हरी दरशन को आज’ या सारखी शास्त्रीय संगीतावर आधारित चित्रपट गीतं एखाद्या ख्याल गायकाच्या अंदाजात रफी नी गायली. प्रेम, छेडछाड, नर्मशृंगार अश्या भावना आपल्या विशेष शैलीत सादर केल्या. ‘याद न जाये बीते दिनों की’, ‘आज मौसम बडा बईमान हैं’, ‘अभी ना जाओ छोड कर, ‘तुझे क्या सूनाऊ मैं दिलरुबा’,’चौदवी का चांद’, ‘खोया खोया चांद’, ‘नि सुलताना रे’, ‘आप के पहेलु मे आकर रो दिये’, ‘तुम ने पुकारा’, ‘आज कल तेरे मेरे प्यार की चर्चा’, ‘रिमझिम के गीत सावन गाये’, ‘आने से उसके आए बहार’, ‘इतना हैं तुमसे प्यार मुझे मेरे राजदार’, ‘तुझे देखा तुझे चाहा’ अशी कितीतरी गीतं याचं प्रमाण आहेत.

    1948 साली गांधीहत्ये नंतर हुस्नलाल भगतराम यांच्या संगीत निर्देशनात रफींनं ‘सुनो सुनो ए दुनियावालों बापू की ये अमर कहानी’ ह्या गीतामुळे रफी लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ झाला. ह्या गीता मुळे रफी देशातल्या घराघरात पोहोचला. एका महिन्याच्या आत ह्या गाण्याच्या 10 लाख रेकॉर्डस विकल्या गेल्या. त्यानंतर वर्षभरात आलेल्या ‘दुलारी’ चित्रपटातल्या शकील बदयुनी यांचं संगीतकार नौशाद यांनी संगीत केलेल्या ‘सुहानी रात ढल चुकी’ ह्या गाण्यानं पार्श्वगायन क्षेत्रात रफीसाठी सोनेरी पहाट उजाडली. त्याला अधिक ओळख मिळवून दिली. या गीतावर कुंदनलाल सहगल यांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. 1956 ते 1965 हा काळ बॉलीवूड मध्ये रफीचा सुवर्ण काळ होता. संपूर्ण करिअर मध्ये एकूण सोळा वेळा फिल्म फेअर साठी नामांकन मिळालं आणि या पुरस्कारांचा षटकार नोंदवण्यात रफी यशस्वी झाला. लाहोरच्या सलून पासून संगीत जत्रा सुरू करणाऱ्या ह्या गायकानं, रेडिओ सिलोन च्या लोकप्रिय ‘बिनाका गीतमाला’ वर 20 वर्ष निर्विवाद अधिराज्य गाजवलं.

    रफी बहुतेक सर्व अभिनेत्यांसाठी आणि आघाडीच्या सर्व संगीत दिग्दर्शकांकडे गायला आहे. नौशाद तर त्याच्या साठी गुरुस्थानी होते. ओ.पी. नय्यरशी त्याची घट्ट मैत्री होती. कुणी विश्वास ठेवणार नाही पण ओ.पी. साठी रफी, चक्क त्याला एक ही शब्द नसलेला कोरस गायला आहे. संगीतकार रवी यांनी रफी कडून अनेक भावोत्कट प्रणय गीतं गावून घेतली. सचिनदा यांनी रफीचा आवाज मुख्यत्वे गुरुदत्त आणि देवानंद यांच्यासाठी घेतला. या जोडीच्या ‘प्यासा’, ‘आराधना’, ‘नौ दो ग्यारह’, ‘काला बाझार’, ‘गाईड’, ‘तेरे घर के सामने’ अश्या कित्येक म्युझिकल हिट फिल्म्स आहेत. गाण्याची शब्दकळा, संगीत रचना कितीही आकर्षक असली तरीही, गायक जोपर्यत मुळाशी जाऊन ती आकळून घेत नाही, तोपर्यंत ती दिलकश होऊ शकत नाही. रफी हे मर्म नीट जाणून होता. त्याच्यासाठी गाणं हे निव्वळ कलाकर्म नव्हतं तर ती मानसपूजा होती. ‘ये दुनिया ये महफिल मेरे काम की नही’ या गाण्याचे रफीला कदाचित सर्वाधिक टेक द्यावे लागले असावेत. हे गाणं वरच्या स्वरात आहे. आणि संगीतकार मदन मोहन यांना प्रत्येक वेळी काही ना काही खटकत होत. सात मिनिटांच्या अवधीच्या ह्या गाण्याचे टेक मदन मोहन यांचं पूर्ण समाधान होई पर्यंत रफी देत राहिले. ‘दिवाने हैं दिवानों को घर चाहिए’ ह्या जंजीर चित्रपटातल्या गीताचं ध्वनिमुद्रण संपवून रफी स्टुडिओच्या बाहेर पडले. त्याचवेळी गीतकार गुलशन बावरा यांच्याशी त्यांची अचानक भेट झाली. त्यावेळी त्यांनी हे गाणं आपल्यावर चित्रित होणार असल्याचं सांगताच रफी लगेच परत स्टुडिओत गेले आणि गाणं न कंटाळता पुन्हा रेकॉर्ड केलं. कारण पहिले त्यांनी हे गीत अमिताभ बच्चन यांना नजरे समोर ठेवून गायलं होत. दुसऱ्यांदा ते गुलशन बावरा यांना समोर ठेवून त्यांनी रेकॉर्ड केलं. या दक्षते मुळेच ज्या कुणा अभिनेत्यावर रफीच गीत चित्रित होत असे, तो अभिनेता स्वतः ते गात असल्याचा आभास निर्माण होत असे.

    शंकर जयकिशन यांच्या संगीत निर्देशनात 1965 मध्ये गुमनाम चित्रपटा साठी रफ़ी पहिल्यांदा रॉक अँड रोल गीत गायला. हे गीत 2001 च्या हॉलिवूड फिल्म ‘घोस्ट वर्ल्ड’ मध्ये घेण्यात आलं आहे. 1957 मध्ये प्रदर्शित ‘नया दौर’ चित्रपटानी प्रचंड यश मिळवल. त्यामुळे या चित्रपटातल्या कलाकारांनी भविष्यात फक्त आपल्या बॅनर साठीच काम करावं असा प्रस्ताव बी. आर. चोप्रा यांनी प्रथम रफी समोर ठेवला. रफीन त्यास नम्र नकार दिला. कारण आपला आवाज म्हणजे लोकांची अमानत आहे असं ते मानीत असत. त्यामुळे जो कुणी संगीतकार गाण्याच्या माध्यमातून जनतेसाठी त्याचा उपयोग करेल त्याच्या साठी आपण गायलं पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. चोप्रांना अर्थातच ती रुचली नाही. त्यांनी रफी ला काम देणं बंद करून नवा रफी शोधण्याचं ठरवलं. रफीला काम न देण्याविषयी अन्य निर्मात्यांना ही सांगितलं. रफ़ी ची गाण्यांची संख्या ही कमी झाली. मात्र लवकरच सर्वांनाच हे लक्षात आलं की रफ़ी शिवाय काम चालू शकत नाही. बी आर. चोप्रांना ही अखेरीस माघार घ्यावी लागली. मात्र रफ़ी ने एका शब्दानं ही चोप्रांना दुखावलं नाही.

    ‘जिस रात के ख्वाब आए वह रात आई’ हे ‘हब्बा खातून’ चित्रपटाचं गाणं नौशाद यांच्या संगीत निर्देशनात गायलेलं रफ़ी च अखेरचं गीत ठरलं. रेकॉर्डिंग नंतर रफ़ी भावुक झाले होते आणि अनेक वर्षांनी एक चांगलं गाणं गायला मिळाल्याची भावना व्यक्त केली. आता जग सोडायला हरकत नाही अशा आशयाचं वक्तव्य केलं. या गाण्यासाठी रफ़ी ने मानधन ही घेतलं नाही. काही काळातच नौशाद ना रफ़ी गेल्याची बातमी मिळाली. आता हा योगायोग म्हणावा की या महान गायकाला परतीचे संकेत मिळाले होते कोण जाणे! 31 जुलै ला मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत होता. आकाशालाही जणू शोक आवारात नव्हता. लाखों रसिकांनी आपल्या या लाडक्या गायकाला भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी रत्यावर गर्दी केली होती. त्यांच्या मनातल्या मनात कदाचित त्याच्याच गाण्याच्या ओळी तरळत असणार…’अभी ना जाओ छोड कर ये दिल अभी भरा नही’.

    -नितीन सप्रे
    nitinnsapre@gmail.com
    8851540881

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *