पंढरपूर : आषाढीवारीच्या निमित्ताने होणार वाढती गर्दी लक्षात घेता. आलेल्या भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे दर्शन सुलभ व तत्पर होण्याच्या दृष्टीने आज शुक्रवार दिनांक १ जुलै पासून श्री चे दर्शन २४ तास सुरु ठेवण्यात आले असल्याची माहिती मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली.
आषाढी शुद्ध एकादशी सोहळा १0 जुलै २0२२ रोजी होणार असून, आषाढी वारी निमित्त पायी पालखी सोहळ्यासोबत परराज्यातील तसेच राज्यातील विविध जिल्ह्यातून मोठय़ा प्रमाणात भाविक येत असतात. या यात्रा कालावधीत पंढरपूरात सुमारे १0 ते १२ लाख भाविक येतात. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेवून, मंदीर प्रशासनाकडून चांगला दिवस मुहर्त पाहून श्रीचा पलंग काढून भाविकांसाठी १ ते १८ जुलै २0२२ या कालावधीत २४ तास दर्शन सुरु ठेवण्यात आले आहे.
सकाळी देवाच्या शेजघरातील चांदीचा पलंग परंपरेनुसार काढण्यात आला. श्री विठ्ठलास मऊ कापसाचा लोड तर रुक्मिणीमातेस तक्या लावण्यात आला आहे. आजपासून श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती इत्यादी राजोपचार प्रक्षाळपुजेपयर्ंत (दि.१८ जुलै) बंद राहतील. या कालावधीत श्रीची नित्यपुजा, महानैवद्य, गंधाक्षता हे नित्योपचार सुरु राहतील. नित्योपचाराची वेळा वगळता श्रीचे पददर्शन २२.१५ तास सुरु राहील तर मुखदर्शन २४ तास सुरु राहील असे गुरव यांनी सांगितले.