‘अस्वस्थतेच्या डायरी’स मसाप दामाजीनगर राज्य वाड्:मय पुरस्कार जाहीर

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, दामाजीनगर (ता.मंगळवेढा, जि. सोलापूर) यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची घोषणा शाखेचे अध्यक्ष प्रकाश जडे यांनी नुकतीच केली आहे. पुर्स्कार्थ्यांमध्ये नाशिक जिल्ह्यातील साहित्यिक, वक्ता, एकपात्री कलाकार डॉ. प्रतिभा जाधव यांच्या ‘अस्वस्थतेची डायरी’ ह्या बहुचर्चित वैचारिक लेखसंग्रहाचा समावेश आहे. मारोतीराव पंडित स्मृती पुरस्कार ‘अस्वस्थतेची डायरी’ ह्या लेखसंग्रहास जाहीर झाला आहे. येत्या ऑगस्टमधील पहिल्या आठवड्यात सदर पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. ‘अस्वस्थतेची डायरी’ ह्या लेखसंग्रहास यापूर्वी अमरावती येथील प्रतिष्ठेचा पोटे राज्य पुरस्कार, नांदेड येथील मानाचा बन उत्कृष्ट वाड्:मयनिर्मिती पुरस्कार, नागपूर येथील पद्मगंधा प्रतिष्ठानचा राज्य पुरस्कार, हिंगोली येथील श्रीचक्रधरस्वामी राज्यपुरस्कार, अहमदपूर येथील महात्मा फुले राष्ट्रीय पुरस्कार इ. महत्वाच्या वाड्:मय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

    पुरस्कार्थी साहित्यिक डॉ.प्रतिभा जाधव सामाजिक अंगाने वर्तमानावर विचारप्रवृत्त करणारे परखड वैचारिक स्तंभलेखन विविध नामांकित वृत्तपत्रात नियमितपणे करत असतात. त्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र, मुक्त विद्यापीठातील कुसुमाग्रज अध्यासनाच्या सल्लागार समिती सदस्य आहेत. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सदस्य आहेत. त्यांची ललित, नाट्य, काव्य, वैचारिक, समीक्षा या साहित्य प्रकारात आजवर आठ पुस्तके प्रकाशित असून त्यांच्या ‘संवाद श्वास माझा’ हा काव्यसंग्रह दिल्ली येथील नामवंत प्रकाशन संस्थेने ‘डायलॉग माय लाईफ’ हा इंग्रजी व ‘संवाद मेरा संजीवन’ हा हिंदी भाषेतील अनुवाद पुस्तकरुपात नुकताच प्रकाशित केलेला आहे.