Header Ads Widget

अस्तित्व गमावलेली माणसे : नवी उमेदाची ऊर्जा देणारी कविता

  महेंद्र गायकवाड हे दोन दशकापासून आंबेडकरी कवितेच्या प्रांतात नित्यनेमाने कविता लिहित आहेत. त्यांची राहणी साधी असली तरी कवितेचे शब्द क्रांतीध्वज उंचावणारी आहेत. नुकताच त्यांचा अस्तित्व गमावलेली माणसे हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन...! आंबेडकरी कविता ही क्रांतीच्या ठिणग्या निर्माण करणारी आहे. ही कविता शोषणाच्या सार्‍या मुळांना उघडून फेकते.आंबेडकरी कवी आपल्या मर्म चिंतनातून समाजाचा वेध घेत असतो. कविता ही समाजाला नवे वास्तव सांगत असते. आपले हित व अहीत यांची चर्चा करते.

  आंबेडकरी कवितेत काही कवी सोडले तर बाकीचे कवी हे आपले निरंतरतत्व सोडून बसले आहेत .पण काही कवी अजूनही सूर्यदीपत्वाची नवी ऊर्जा पेरत आहेत. त्यात महेंद्र गायकवाड हे सातत्याने समाजाला सजग करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या दारिद्र्याला ते गोंजारत नाही. आपली समस्याने ते मोडत नाही. तर ते समूह मनाची व्यथा व वेदना आपल्या कवितेतून मांडतात .म्हणून त्यांची कविता मानवतावादी कविता ठरते.

  महेंद्र गायकवाड हे चमकोगिरी करणारे कवी नाहीत, तर अस्वस्थ मनाचा वेध घेऊन स्वतःचे जीवन जगणारा सत्यनिष्ठ कवी आहेत. अस्तित्व गमावलेली माणसं यातील कविता वर्तमानाचे प्रतिबिंब रेखाटत असताना विषमतामुलक जुलूम व्यवस्थेचा निषेध करते. करोना काळातील वैज्ञानिक व अंध भक्तांनी जो धुमाकूळ घातला तो नक्कीच धोकादायक होता.कर्णधाराच्या नेतृत्वाने जो सोशणकारी मार्ग निवडला तो मानवाला उध्वस्त करणारा ठरला आहे. ते आपल्या पहिल्या कवितेत लिहितात की,

  आत्मनिर्भर होण्याच्या नादात
  मान कापून घेतली बोकडासारखी स्वतःचं अस्तित्व गमावून बसलेल्या माणसांनी
  कधी उठाव केलेला नाही....

  कविता छोटी पण आशय महासागरएवढा.. माणसालाच सीमा बंद करून माणुसकी समाप्त केली आहे. अस्तित्व गमावलेल्यांनी उठाव केलाच नाही. कवी हे चळवळीतून पुढे आलेले आहेत.कामगारांची वेदना व दुःख त्यांनी स्वतः पाहिलेले आहे. सरकारी कामगार कायदे शोषणाचे अड्डे झाले आहेत.संविधानात्मक व्यवस्था समाप्त होत आहे. मजुरी ही कविता विचार वेदनांचा आशयप्रयूक्त करते. ते या कवितेत म्हणतात की,

  आमच्या देशात आम्ही निर्वासित
  अशी कशी ही एकाधिकारशाही ...
  तर निषेध कविता कामगारांच्या अन्यायाला वाचा फोडली आहे.

  रहीमचाचाला कामावरून बंद केले म्हणून अस्वस्थता पसरली अशा यांत्रिकी जागतिकीकरणाचा निषेध केलाच पाहीजे...असे म्हणत हा कवी आपला लढा चालूच ठेवतो ते लढा कवितेत म्हणतात की,

  शासक/शोषक व्यवस्थेवर
  आणि आजार बरा करतो
  कुस्तित मनसुब्याचा..

  अस्तित्व गमावलेली माणसे यातील कवितेची शब्द छोटी आहे. पण मार्मिक व उद्बोधकच्या पातळीवर सरस ठरली आहे. प्रत्येक कवितेचा विषय गहन आहे. सामान्य वाचकाला कोणत्याही गोधळात न अडकवता साधा व सरळ अर्थ व्यक्त करणारी ही कविता नव्या मूल्यसमाजाची निर्मिती करते. आज माणुसकी समाप्त होत आहे. आपली माणसे आपल्यालाच सोडून जात आहे. दुसऱ्याच्या घरात तूप रोटी खाता आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपली झोपडी सोडू नका...आपली मीठ भाकरी सोडू नका.. म्हटल्यावर ही आमची माणसं मूलतत्वांच्या कळपात जमा होतात...दंगलीतील सरकारी कामात भारतीय एकात्मतेला खिंडार पाडतात .....सरकारने केलेल्या काळा कायदा माणुसकीचे शोषण करणारी आहे. ते माणुसकी शोधतोय या कवितेत पूर्णतः अस्वस्थ झाले आहेत. त्यांना भीती आहे या देशाची, भारतीय माणसाची... ते लिहितात की,

  क्रौर्य नाचते माणुसकी नागवली जावी म्हणून
  नैतिक प्रतिकारही दुबळा ठरतो शाहिनबागेत

  माणसाचे जीव नाल्यात फेकताना शोधतोय,सैरभैर झाली माणुसकी..शाहिनबाग आंदोलन भारतीय इतिहासातील शांततेचे मिनार निर्माण करणारे ठरले आहे. पण सत्ताधाऱ्यांनी आपल्या फायद्यासाठी त्याचा उपयोग केला आणि आमचा भोळा समाज त्याच्यात फसला.पण भारतीय संविधान महाऊर्जेची ताकद इतकी मोठी आहे की, भारतीय शेतकरी, एनआरसी, सीएए आंदोलनाला ते उद्ध्वस्त करू शकले नाहीत. आम्ही जिंकलो की हरलो याला अर्थ नाही. आम्ही मरू पण पराभूत होणार नाही.... ही ऊर्मी भारतीय संविधानाने दिलेली आहे.हा आशावाद देशातील लोकांना मिळाला आहे . तुमच्याविरुद्ध ही कविता नव्या तुतारीची गाज ऐकवणारी नवी आहे.

  अजूनही आमच्या शरीरावरील घामाच्या लाटा उसळताहेत
  अन् तुतारीही सज्ज आहे तुमच्याविरुद्ध ...

  अस्तित्व गमावलेली माणसे हा कवितासंग्रह कामगार, शेतकरी, गरीब, शोषित, वंचित, आदिवासी यांच्या जगण्यातील वास्तव चित्र रेखाटत आहे जागतिकीकरणाने समाजाला शोषणाच्या चक्रव्यूहात फसवले आहे. आपले सत्व गमावत चाललेला हा समाज कुठे जाईल हे सांगता येत नाही. देशातील जनता दरिद्री,अंगावर कपडा नाही,तर जागतिकीकरण स्वीकारलेले हैवान निर्लज्जपणे अंगप्रदर्शन करीत आहे. त्याचे काय हा उपरोधात्मक गंभीर प्रश्न कवीने उपस्थित केला आहे. देशातील शहराचे चेहरे बदलत चालले आहेत. नशा होऊन माणसे स्वतःचं अस्तित्व हरवत आहेत की,त्याला हरवण्यासाठी व्यवस्था काम करत आहे. सारेच योगी, भोगी ,योगी. आणि छिनाल अड्डे, गुप्तधनासाठी बळी, सिमेंट काँक्रीटचे जंगल, माॅलची नशा, धर्मांचे अतिक्रमण, पुतळ्यासाठी पावतीबुक, नोकरीला जपणारे मास्तर, मायबाप वृद्धाश्रमात,सारेच कसे अनाकलनीय शहर हरवत चालले आहे ...सारेच मशगुल स्वतःच्या कोशात या कवितेचा पोत अत्यंत गहन आहे.ते म्हणतात की,

  मी मात्र
  चेहरा नसलेल्या शहराची कविता लिहतोय....

  कवीने या कवितासंग्रहातून एक ज्वलंत वास्तव समाजापुढे मांडले आहे. ही कविता श्रीमंताच्या बंगल्यावर वाचली जाणार नाही. सौंदर्याचे नटलेली नाही. पण ही कविता चळवळीचे नीतिशास्त्र आहे. अनेक कवितेने लोकशाही मूल्यांची पायाभरणी केली आहे. हे घडत आहे, बेरोजगार, जुन्या पुस्तकाची आत्मकथा, प्रश्न, हतबल,मध्यम मार्ग, प्रथम ,माती या कवितांमधून नवीन मने तयार होत आहेत. भाषाशैलीचा जो वापर या कवितेत केला आहे तो दैनंदिन जीवनातला आहे .मोठ्या शब्दजंजाळात ही कविता गुरफटत नाही. तर दिसते तेच मांडते. ही कविता अस्तित्व गमावलेल्या माणसाला नवी उमेदची ऊर्जा देणारी आहे .आंबेडकरी बाण्याचे क्रांतीतेज प्रस्फोटीत करणारी आहे. ही कविता वर्तमानातील व भविष्यातील वाचकाला विचारमंथन करायला लावणारी माणुसकीची पाठशाला आहे. या कवितेचे यश नक्कीच धवलमय आहे. याकरीता मी कवीला पुढील काव्यसंग्रहासाठी मंगलकामना चिंतितो .....!

  -प्रा.संदीप गायकवाड
  नागपूर
  ९६३७३५७४००
  * अस्तित्व गमावलेली माणसे(कवितासंग्रह)
  * कवी: महेंद्र गायकवाड
  * संघर्ष प्रकाशन, नागपूर
  * मुल्य:१०० रूपये
  * मो.क्र. ९८५०२८६९०५

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या