Header Ads Widget

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी करण्याचे आवाहन

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : राज्य सामायिक प्रवेश परीक्षेद्वारे नव्या शैक्षणिक वर्षात आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. त्यामुळे इच्छूक विद्यार्थ्यांनी तत्काळ पडताळणी समित्यांकडे अर्ज करावेत, असे आवाहन ‘बार्टी’च्या महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.

    जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी नियमानुसार समितीकडे अर्ज केल्यानंतर सामान्यत: तीन महिन्यांच्या आत वैधता प्रमाणपत्रांबाबत समिती निर्णय घेते. वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा, तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी तत्काळ अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्याप वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी अर्ज सादर केलेला नाही, त्यांनी ज्या जिल्ह्यातून जातीचा दाखला प्राप्त केलेला आहे, तेथील जात पडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी त्वरित अर्ज करावा, असे आवाहन अमरावती जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या सदस्य व समाजकल्याण उपायुक्त जया राऊत यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या