अमरावती (प्रतिनिधी) : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आवक झालेल्या शेतमालाचे शनिवारी पावसाने नुकसान झाले. त्याचे तात्काळ पंचनामे करून शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, तसेच खरेदी प्रक्रिया खुल्या जागेत न घेता शेडमध्येच करावी, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.
जिल्ह्यात काल झालेल्या पावसाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकरी बांधवांकडून आवक झालेल्या शेतीमालाची हानी झाली. याची तात्काळ दखल घेत पालकमंत्र्यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. शेतीमाल खरेदी प्रक्रिया खुल्या जागेत न राबवता शेडमध्ये राबविण्यात यावी. तसे न करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल. यापुढे पावसाळ्यात खुल्या जागेत खरेदी प्रक्रिया राबवता कामा नये. शेतकरी बांधवांचे नुकसान झाल्यास कुणाचीही गय करणार नाही. संपूर्ण मालाचे सविस्तर पंचनामे करावेत. ही प्रक्रिया गतीने राबवावी. प्रत्येक शेतकरी बांधवाला न्याय मिळवून द्यावा, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.
याबाबत माहिती देताना जिल्हा उपनिबंधक राजेश लव्हेकर म्हणाले की, शेतकरी बांधवांचे नुकसान होऊ नये यासाठी आवक मालाची संपूर्ण खरेदी करण्यासाठी व्यापारी, अडते यांना बाजार समितीमार्फत सूचना देण्यात आली व बहुतांश खरेदी पूर्ण होईल असा प्रयत्न करण्यात आला. त्यानुसार बहुतांश खरेदी पूर्ण झाली. यापुढे मालाची खरेदी प्रक्रिया शेडमध्ये राबविण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आली आहे. संबंधितांना समितीमार्फत नोटिसाही जारी करण्यात आल्या आहेत. पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार पंचनाम्याची प्रक्रियाही तत्काळ पूर्ण करण्यात येत आहे. शेतकरी बांधवांच्या मालाचे नुकसान झाल्यास भरपाई मिळावी यासाठी बाजार समितीमार्फत १४ कोटी रू. चा विमा काढण्यात आला आहे. त्याद्वारेही भरपाई मिळवून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या