अमरावती (प्रतिनिधी) : टेंब्रुसोंडा गावात नीलगाय जखमी अवस्थेत आढळून आल्याच्या घटनेबाबत बातम्या काही वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाल्या आहेत. याविषयी विभागीय वनाधिकारी (दक्षता) व्ही. डी. डेहणकर यांनी खुलासा प्रसिद्धीस दिला आहे.
त्यात नमूद केल्याप्रमाणे, या घटनेबाबत अंजनगाव येथील प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडून अहवाल मागविण्यात आला. अहवालानुसार, दि. 18 जून रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास एक नर नीलगाय जखमी अवस्थेत टेंब्रुसोंडा गावात आल्याची माहिती मिळाली. त्यावेळी वनपरिक्षेत्र अधिका-यांकडून तत्काळ वनरक्षक व वनमजूर यांना घटनास्थळी पाठविण्यात आले.
संबंधित कर्मचा-यांना नीलगाय गंभीर जखमी असल्याचे आढळले. त्याच्या कमरेवर वन्यप्राण्याच्या नखाचे ठसे व नाकातून रक्तस्त्राव होत असल्याचे आढळले. या घटनेचा तत्काळ पंचनामा करण्याचे आदेश वनपरिक्षेत्र अधिका-यांनी दिले, तसेच नीलगायीजवळ गावातील कुत्रे येणार नाहीत, तसेच इतरही गर्दी होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आदेशही देण्यात आले. त्याचप्रमाणे, नीलगायीला चारा व पाणी पुरविण्याचेही सूचित करण्यात आले.
वनपरिक्षेत्र अधिका-यांनी ही माहिती वरिष्ठांना देऊन सिपना वन्यजीव विभागाच्या रेस्क्यू पथकाशीही संपर्क साधला. नजिकच्या पशुवैद्यकीय कर्मचा-यामार्फत तत्काळ उपचाराच्याही सूचना देण्यात आल्या. तथापि, सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास नीलगायीचा मृत्यू झाला. पशुधन विकास अधिकारी उपलब्ध न झाल्याने व रात्र झाल्याने मृत नीलगायीचे शव विच्छेदन त्याचदिवशी करता आले नाही. तथापि, ते दुस-या दिवशी दि. 19 जूनला सकाळी 9 वाजता खीरपाणी बीट वनखंड येथील जंगलात करण्यात आले. तेलखार येथील पशुधन विकास अधिका-यांनी हे शवविच्छेदन केले. शवविच्छेदनानंतर विल्हेवाट व इतर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. वनविभागाने संपूर्ण खबरदारी घेऊन वेळीच सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे, असे विभागीय वनाधिकारी श्री. डेहणकर यांनी नमूद केले आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या