Header Ads Widget

जिल्हाधिकाऱ्यांकडून शोध व बचाव पथकाकडील साहित्याची तपासणी यंत्रणा अधिकाधिक अद्ययावत करण्याचे निर्देश

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी राज्य राखीव पोलीस दल परिसराला शुक्रवारी भेट देऊन जिल्हा शोध व बचाव पथकाकडील साहित्याची तपासणी केली. यावेळी त्यांनी पथकाशी संवाद साधून प्रत्येक बाबीची माहिती घेतली. यंत्रणा सुसज्ज असून, ती अधिकाधिक अद्ययावत करण्यासाठी निधी दिला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

    उपजिल्हाधिकारी राम लंके, तहसीलदार संतोष काकडे, पोलीस निरीक्षक मारुती निवारे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर उपस्थित होते.जिल्हा शोध व बचाव पथकाकडील साहित्य सुस्थितीत असल्याबाबत खातरजमा जिल्हाधिकाऱ्यांनी तपासणीत केली. मान्सून कालावधीत आपत्ती उदभवल्यास सामना करण्यासाठी आवश्यक तयारीचा आढावा त्यांनी यावेळी घेतला.

    राज्य राखीव पोलीस दलातील वाहने, पोलीस लाईट व्हॅन, सुरक्षा बोट व इतर साहित्याची तपासणी त्यांनी केली. जिल्हा शोध व बचाव पथकाकडील सर्व साहित्य सुस्थितीत असून बचाव पथक सुसज्ज आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास सज्ज असल्याचे पथक सदस्यांनी यावेळी सांगितले. पथकास यापुढेही आवश्यक असल्यास साहित्य खरेदी करण्यासाठी निधी देण्यात येईल. यंत्रणा अद्ययावत व तत्पर ठेवावी, असे आदेश जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी दिले.

    जिल्हा शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक डोळस, सचिन धरमकर, देवानंद भुजाडे, दीपक पाल, गजानन वाडेकर, उदय मोरे, भूषण वैद्य ,अर्जून सुंदरडे ,गणेश जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या