मुंबई : योग म्हणजे केवळ शारीरिक आसने नाही तर योग म्हणजे शारीरिक, मानसिक व भावनिक स्वास्थ्य देणारी परिपूर्ण जीवन पद्धती असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
परराष्ट्र मंत्रालयाच्या विभागीय कार्यालयातर्फे राजभवन येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. राजभवनाच्या दरबार हॉल येथे आयोजित योग दिन कार्यक्रमाला 30 देशांचे राजनैतिक व व्यापार प्रतिनिधी तसेच भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या शिष्यवृत्तीवर भारतात शिक्षण घेत असलेले विविध देशांचे विद्यार्थी उपस्थित होते.
राज्यपालांनी विविध देशांच्या वाणिज्यदूतांशी संवाद साधला तसेच उपस्थित मार्गदर्शकांचा सत्कार केला. यावेळी फिटनेस गुरु मिकी मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली योगासने करण्यात आली. विभागीय पारपत्र अधिकारी राजेश गवांडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.यावेळी वास्तुरचनाकार अनुजा सावंत यांचे 'वास्तू शास्त्र' या विषयावर, डॉ श्वेता भाटिया यांचे 'आहारातील मेद' या विषयावर तसेच त्वचा विशेषज्ञ डॉ. श्रुती बर्डे यांचे 'नैसर्गिक त्वचेसाठी गुंतवणूक' या विषयावर भाषण झाले. संगीत जुगलबंदीने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला आयसीसीआरच्या विभागीय संचालिका रेणू प्रिथियानी देखील उपस्थित होत्या.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या