Header Ads Widget

कपिल वस्तू नगरातील विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

  * बिकट परिस्थितीवर मात करीत मिळविली गुणवत्ता
  * पंचशील युवा मंडळाच्या वतीने सत्कार व शुभेच्छा
  गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

  अमरावती (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे च्या वतीने वर्ष २०२१-२२ मधील शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला . या निकालामध्ये स्थानिक कपिल वस्तू नगरातील दहावीच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करीत घवघवीत यश संपादन केले आहे.

  या यशवंताचा स्थानिक पंचशील युवा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यासह त्यांचे अभिनंदन करीत भावी वाटचालीकरिता शुभेच्छा देण्यात आल्या. कपिल वस्तू नगरातील रितेश सुनील पाटील याने दहावीची परीक्षा ९१.८० टक्के गुण संपादित करून उत्तीर्ण केली. तो सिंधी हिंदी हायस्कुल चा विद्यार्थी असून त्याने घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असतांना सुद्धा हलाखीच्या परिस्थितीत यश प्राप्त केले. तर विकास विद्यालय शाळेतील विद्यार्थिनी कु. आरती अनिल मेश्राम हिने दहावीत ८२ टक्के गुण घेऊन प्रथम प्राविण्य श्रेणीत येऊन नेत्रदीपक यश मिळविले आहे. घरात कुठलेही शैक्षणिक वातावरण नसतांना तसेच डिजिटल संसाधनांचा देखील अभाव असतांना तिने मनात जिद्द बाळगून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तर वेदांत किशोर भोवते याने दहावीच्या निकालात ८० टक्के गुण प्राप्त करून उत्युंग भरारी घेतली आहे. कुठल्याही प्रकारची शिकवणी न लावता स्व-अध्ययनातून तसेच दहावीच्या अभ्यासक्रमातील अनेक पुस्तकी व छापील संदर्भ संकलित करून त्याने दहावीच्या परीक्षेला सामोरे जाऊन जिद्दीने यश संपादन केले.

  कपिल वस्तू नगरतील विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक कामगिरीबद्दल त्यांचे पंचशील युवा मंडळाचे अध्यक्ष राहुल तायडे, पत्रकार अमित तायडे, सामाजिक कार्यकर्ता गौतम मोहोड, सुधीर भले, अनिल मेश्राम आदींनी पुष्पगुच्छ व मिठाई देऊन सत्कार केला . त्याच बरोबर दहावीच्या निकालात ७५ टक्केहुन अधिक गुण घेऊन प्रथम प्राविण्य श्रेणी प्राप्त करण्याला विद्यार्थ्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. दहावीच्या निकालात यश संपादन करणाऱ्या या गुणवंत विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षण घेऊन करियर घडविण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी पत्रकार अमित तायडे यांनी शुभेच्छापर संबोधनात म्हटले की दोन वर्ष कोरोनाचा काळ होता, शाळा कधी ऑनलाईन कधी ऑफलाईन सुरु असतांना दहावीच्या परीक्षेबाबतही संभ्रम निर्माण झाला होता. याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र शिक्षण मंडळाने प्रचलित पद्धतीने दहावीची परीक्षा ऑफलाईन घेण्याचे नियोजन केले. व विद्यार्थी सुद्धा तितक्याच जोमाने या परीक्षेला सामोरे गेले.यात अनेक शाळांनी निकालाची गुणवत्ता कायम राखली असून उच्च व मध्यमवर्गातील मुले गुणवत्ता यादीत आले आहे. मात्र कपिल वस्तू नगरासारख्या सामान्य व श्रमजीवी घटकातील पालकांच्या मुलांनी मिळविलेले यश त्याहून अधिक वाखाळण्याजोगे असून दहावीच्या परीक्षेतील सुयश हे विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रम,जिद्द, मेहनत, धैर्य, संयम यांचे फलित आहे.

  दहावीच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणीक जीवनाला नवे वळण मिळत असल्याने त्याने आगामी काळातही आपली गुणवत्ता कायम ठेवून उत्युंग भरारी घ्यावी अशा शुभेच्छया पत्रकार अमित तायडे यांनी व्यक्त केल्या. यावेळी विनोद गवई, गजानन थोरात, मिलिंद तायडे, वेदांत तंतरपाळे, भूषण बोरकर, ऋतिक बरडे,किशोर सरदार यांच्या सह पंचशील युवा मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या